डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
गर्भवती महिलांसाठी लस - टीटी (धनुर्वात) इंजेक्शन आणि गरोदरपणातील इतर लसीकरण

गर्भवती महिलांसाठी लस

गरोदरपणातील लसीकरण

कोणती, कधी आणि संरक्षण

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

गर्भवती महिलांसाठी लस - टीटी (धनुर्वात) इंजेक्शन आणि गरोदरपणातील इतर लसीकरण
गर्भधारणेमुळे स्त्रियांच्या शरीरात आणि प्रतिकारशक्तीत अनेक बदल होत असतात. शरीरात होणाऱ्या या बदलांमुळे बऱ्याचदा आई आणि शिशू या दोघांनाही संसर्गजन्य आजार होण्याची भिती असते. हे बदल गर्भ, गर्भाशय आणि नवजात शिशूवर विपरित परिणाम करणारे ठरतात. त्यामुळेच या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी गर्भवती महिलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. या लशी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून गर्भवती महिला आणि गर्भात वाढणारे शिशू या दोघांचाही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यात मदत करतात. गरोदरपणातील हे लसीकरण आईची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच शिशूच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) निर्माण करून शिशूचे संरक्षण करते. या लेखात आपण टीडॅप (टिटॅनस, डिप्थेरिया अँड पर्टुसिस) लस, टीटी (धनुर्वात) इंजेक्शन, टिटॅनस टॉक्झॉइड लस आणि इन्फ्लुएंझा लस यांचे फायदे, गरज आणि त्या घेण्याचा योग्य काळ याविषयी माहिती घेणार आहोत.
गरोदरपणात स्त्रियांना अनेक प्रकारे स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये निरोगी जीवनशैली निर्माण करण्याबरोबरच संतुलित आणि नियमित आहार घेणे, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे यासारख्या गोष्टी प्रमुख ठरतात. या नियमितपणामुळे आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्याची काळजी घेणे सहज सोपे होते. बाळ आणि आई या दोघांनाही आजाराच्या संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी गरोदरपणातील लसीकरण आवश्यक आहे. गर्भवती महिलांना ही लस आजारांपासून वाचवू शकते. त्याचबरोबर ही लस गर्भाचेही संरक्षण करून नवजात शिशूच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) पोहोचविण्याचे काम करते. या प्रतिपिंडांमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जन्मानंतरही काही महिने शिशूचे स्वतःचे लसीकरण होईपर्यंत संरक्षण करते. त्यामुळेच गरोदरपणात स्त्रियांचे लसीकरण महत्त्वाचे असते. मात्र, गरोदरपणात काही ठराविक लशी घेणे गर्भवती महिलांनी टाळावे किंवा त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आपल्या डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घ्यावा. गरोदरपणात टीडॅप (टिटॅनस, डिप्थेरिया अँड पर्टुसिस) लस, टीटी (धनुर्वात) इंजेक्शन, टिटॅनस टॉक्झॉइड लस, इन्फ्लुएंझा लस यांसारख्या काही लशी सुरक्षित मानल्या जातात. गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांना या लशी देणे गरजेचे आहे.

गरोदरपणातील महत्त्वपूर्ण लशी

आजारानुसार आणि शरीरातील बदलांनुसार गरोदरपणात स्रियांसाठी अनेक लशी आहेत. मात्र, पुढील तीन लशी गर्भधारणेनंतर आवश्यक आणि सुरक्षित मानल्या जातात. गरोदरपणातील निरोगी आरोग्यासाठी बहुतांश डॉक्टर त्या घेण्याचा सल्ला देतात.

धनुर्वात (टीटी)

पहिली सर्वाधिक महत्त्वाची लस म्हणजे टिटॅनस म्हणजेच धनुर्वाताची. ही लस आई, गर्भ तसेच जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शिशुचे संरक्षण करते किंवा टीटी इंजेक्शन म्हणजेच धनुर्वात इंजेक्शनचे दोन डोसही यात चालतात. गरोदरपणात साधारण २८ दिवसांच्या अंतराने हे डोस घ्यावेत किंवा टीटी इंजेक्शनचा एक डोस आणि टीडॅप (धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला) चा एक डोस घेऊ शकतात.

शीतज्वर (इन्फ्लुएंझा)

शीतज्वर हा सामान्यत: ‘फ्लु’ म्हणून ओळखला जातो आणि ‘इन्फ्लुएंझा’ विषाणूमुळे होतो. फ्लुपासून संरक्षण मिळविण्यासाठी आपल्याला इन्फ्लुएंझा लस घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील तीन महिन्यात इन्फ्लुएंझा लस घेण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यातदेखील ही लस घेता येते. या तीन लशी महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. गरोदरपणात आवश्यक असलेल्या इतरही अनेक लशी आहेत. त्याबद्दलची माहिती व त्यांचे फायदे, आरोग्यानुसार गरजा याविषयी माहिती तसेच मार्गदर्शन तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून घेऊ शकता.

टिटॅनस टॉक्सॉइड लस

‘टिटॅनस’ (धनुर्वात) हा एक जीवघेणा आजार असून ‘क्लोस्ट्रिडियम टेटानी’ या जीवाणुमुळे शरीरात पसरतो. एखाद्या उघड्या जखमेतून हा जीवाणू शरीरात प्रवेश करतो. अगदी छोटीशी जखमही या जीवाणूला शरीरात प्रवेशासाठी पुरेशी असते. चावा घेणे, कापणे, जळणे किंवा अल्सर यांसारख्या खोल जखमांमधून धनुर्वाताचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते. टिटॅनस एखाद्या व्यक्तीच्या मज्जासंस्थेवरही परिणाम करतो आणि वेळीच उपचार न केल्याने जीवघेणादेखील ठरू शकतो. त्यामुळेच या आजारापासून संरक्षण होणे आवश्यक आहे.
नवजात शिशुंमधील धनुर्वाताचे प्रमाण अधिक आहे. बहुतांशवेळा प्रसुतिच्यावेळी निर्जंतुक न केलेल्या किंवा असुरक्षित साधनाने नाळ कापली जाते तेव्हा हा संसर्ग शिशुच्या शरीरापर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशा संसर्गजन्य आजारांपासून नवजात शिशूंना वाचविण्यासाठी त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण होणे आवश्यक आहे. आईच्या शरीरातून ही प्रतिपिंडे शिशूपर्यंत पोहोचावी यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे आहे. ‘नॅशनल इम्युनायझेशन शेड्युल’ अंतर्गतदेखील गर्भवती महिलांनी टीटी लस किंवा इंजेक्शनचे दोन डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गरोदरपणात टीटी इंजेक्शन घेण्याचे टप्पे

गरोदरपणात टीटी लसीकरण महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्या गर्भवती महिलेला यापूर्वी टीटी लस देण्यात आलेली नसेल किंवा तिच्या लसीकरणाची पुरेशी माहिती उपलब्ध नसेल अशा महिलेला ही लस घेणे आवश्यक आहे. टीटी/टीडीवॅकचे दोन डोस प्रसुतिपूर्वी दिले जातात. हे दोन डोस एक महिन्याच्या अंतराने घ्यावे. गरोदरपणात टीटी इंजेक्शनचा दुसरा डोस प्रसुतीच्या ४ आठवडे आधी पूर्ण करायला हवा. जर ही तुमची पहिली गर्भधारणा नसेल, तर टीटी इंजेक्शन डोसची संख्या आधीच्या गरोदरपणातील स्थिती आणि दोन गर्भधारणेमधील कालावधीवर अवलंबून असते.
आधीच्या गरोदरपणात तुम्ही कोणतेही टीटी इंजेक्शन घेतले नसेल तर टीटी इंजेक्शनचे दोन डोस घेणे आवश्यक आहे.
आधीच्या गरोदरपणात तुम्ही टीटी इंजेक्शनचे दोन डोस घेतले असतील आणि गर्भधारणेतील अंतर ३ वर्षांपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत टीटी इंजेक्शनचा एकच डोस तुम्ही घेऊ शकता. या डोसला बूस्टर डोस म्हणतात.
आधीच्या गरोदरपणात तुम्ही टीटी इंजेक्शनचे दोन डोस घेतलेले असतील आणि गरोदरपणातील अंतर ३ वर्षांहून अधिक असेल तर अशा परिस्थितीत टीटी इंजेक्शनचे दोन डोस (लसीकरणाचा संपूर्ण कोर्स) घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणातील टीटी इंजेक्शनेचे टप्पे - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी.
गरोदरपणातील टीटी इंजेक्शनेचे टप्पे
या संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी आपण सक्षम आहोत की, नाही याची पुरेशी कल्पना आणि माहिती महिलांना नसते. अशावेळी मार्गदर्शन आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रसुती तज्ज्ञ अथवा स्रीरोग तज्ज्ञांची मदत किंवा सल्ला घ्या. त्यांच्या तपासणीतून तुम्हाला टीटी इंजेक्शन घेण्याबद्दलची माहिती मिळेल. तसेच याविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही आमच्याशीदेखील संपर्क साधू शकतात.

धनुर्वाताचा संसर्ग कसा रोखायचा?

धनुर्वाताचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात. हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेता येईल.
गर्भवती महिलांच्या लसीकरणाला अधिक महत्त्व देणे.
प्रसुतीदरम्यान निर्जंतुक तंत्राचा वापर करावा.
अधिक जोखीम असलेल्या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम किंवा मोहिमांचे आयोजन करणे.

टीटी लस घेतल्यानंतरचे परिणाम

गरोदरपणात टीटी इंजेक्शनचे काही दुष्परिणामही होतात. परंतु हे परिणाम सामान्य असल्या कारणाने घाबरून जाऊ नये. तसेच लस घेतल्यानंतर काही दिवस विशेष काळजी घ्यावी.
इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी दुखणे, त्वचा लाल होणे किंवा सूज येणे.
ताप येणे.
डोकेदुखी किंवा अंगदुखी होणे.
थकवा येणे.
मळमळ, उलटी किंवा अतिसार होणे.
भूक कमी होणे.
लस घेतल्यानंतर असा त्रास जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा.

टीडॅप लस (टिटॅनस, डिप्थेरिया अँड पर्टुसिस)

टीडॅप ही एक एकत्रित लस असून जी तीन जीवाणू संसर्गाविरूद्ध तिहेरी संरक्षण देते. या लसीकरणाचा एकच डोस धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला या तीन आजारांपासून वाचवतो. खालील कारणांमुळे गरोदरपणात टीडॅप लस घेण्याचा सल्ला दिला जातो.
टीडॅप लस डांग्या खोकलापासून नवजात शिशूचे संरक्षण करण्यास मदत करते.
टीडॅप लशीमुळे आईकडून गर्भात प्रतिपिंडे पोहोचतात. ही प्रतिपिंडे जन्मापासून पहिल्या काही महिन्यांत नवजात शिशूंना संरक्षण देतात. या काळात बालकांना डांग्या खोकला होण्याची शक्यता अधिक असल्याने ही लस फायदेशीर ठरते.
लशीतून निर्माण झालेली ही प्रतिपिंडे शिशुचे स्वतःचे डीटीपी लसीकरण सुरू होईपर्यंत म्हणजेच सुमारे ६ आठवड्यांपर्यंत त्याचे संरक्षण करण्यास मदत करतात.
नवजात बालकांना डांग्या खोकलाचा संसर्ग आईच्या माध्यमातून पोहोचतो.
टीडॅप लस इंट्रामस्क्युलर (आयएम) इंजेक्शनमधून दिली जाते. ही लस शक्यतो दंडावर दिली जाते. गर्भधारणेच्या २७-३६ आठवड्यात टीडॅप लस घ्यावी. कारण या काळात गर्भात शरीरविरोधी पातळी जास्त असण्याची शक्यता असते. टीटी इंजेक्शनच्या दुसऱ्या डोसऐवजी टीडॅप लसीकरणाचा विचार केला जाऊ शकतो.

पर्टुसिस म्हणजे काय?

पर्टुसिस हा श्वसनासंबंधित संसर्गजन्य आजार आहे, ज्याला आपण सामान्यत: डांग्या खोकला म्हणून ओळखले जाते. पर्टुसिस हा वायूजन्य थेंबांद्वारे किंवा संक्रमित व्यक्तीकडून नसोफरिंगेल (नाकामागील घशाचा वरचा भाग) शी थेट संपर्काद्वारे संक्रमित होतो. याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांवर होतो, परंतु नवजात शिशुंमध्ये यामुळे न्यूमोनिया आणि फेफरे येणे यांसारखे गंभीर आजारही उद्भवतात, ज्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढते. पर्टुसिस, त्याची लक्षणे आणि गर्भवती महिलांसाठी टीडॅप लस आपले आणि आपल्या शिशुचे संरक्षण कसे करू शकते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या प्रसुती किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टीटी/टीडीवॅक लशीपेक्षा टीडॅप लस कशी वेगळी आहे?

टिटॅनस टॉक्झॉइड (गरोदरपणात टीटी इंजेक्शन)/ टीडी (टिटॅनस आणि डिप्थेरिया टॉक्झॉइड) लसीकरण आई आणि नवजात शिशू दोघांनाही धनुर्वात आणि घटसर्पपासून संरक्षण देते. याचबरोबर टीडॅप लस आईकडून गर्भात प्रतिपिंडे निर्माण करून नवजात शिशुचे डांग्या खोकल्यापासूनही संरक्षण करते.

टीडॅप लशीनंतरचे परिणाम

इंजेक्शन दिलेल्या जागेवर सौम्य ते मध्यम वेदना हे सर्वसामान्य लक्षण आहे.
इंजेक्शन दिलेल्या जागी सूज येणे तसेच त्वचा लालसर होणे.
अधूनमधून तीव्र वेदना आणि ताप येणे.
कधीकधी डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, स्नायू दुखणे, सांधे दुखणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

टीडॅप लस कोणी घेऊ नये?

पूर्वी टीडॅप लस घेतल्यानंतर कोणाला गंभीर त्रास झाला असल्यास त्यांनी ही लस घेऊ नये. तसेच टीडॅप लस घेतल्यानंतर ग्लानी येणे, बेशुद्ध होणे किंवा फेफरे येणे असा त्रास झाला असल्यास अशा गर्भवती महिलांनी टीडॅप लस घेऊ नये.

इन्फ्लुएंझा लस (शीतज्वर)

शीतज्वर म्हणजे इन्फ्लुएंझा सामान्यत: ‘फ्लू’ म्हणून ओळखला जातो आणि ‘इन्फ्लुएंझा’ व्हायरसमुळे होतो. ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे, घसा दुखणे असा त्रास यामुळे जाणवतो. बहुतांशवेळा याचे प्रमाण वाढल्यास न्यूमोनियादेखील होऊ शकतो.
गर्भवती महिलांना इन्फ्लुएंझा होण्याचा धोका जास्त असतो. गरोदरपणात रोगप्रतिकारक आणि हृदय वाहिन्यांसंबंधी प्रणालीत बदल झाल्याने इन्फ्लुएंझामुळे गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे प्रीमॅच्युअर म्हणजेच गरोदर काळ पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्म होणे आणि तसेच बाळ कमी वजनाचे भरणे याची शक्यता वाढते. तसेच गर्भाच्या मृत्यूचा धोकाही वाढतो. हा धोका आईला फ्लुचा संसर्ग झाल्यामुळे वाढतो.

इन्फ्लुएंझा लसीकरण आणि गर्भधारणा

गरोदरपणात इन्फ्लुएंझा लस आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), सेंटर फॉर डिझीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी), एसीओएफ यांसारख्या जागतिक संस्थादेखील गरोदरपणात इन्फ्लुएंझा लसीकरण करण्याचा सल्ला देतात. गरोदरपणात ही लस घेणे सुरक्षित मानले जाते.

इन्फ्लुएंझा लसीकरणाचा काळ

गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत म्हणजे तीन महिन्याच्या टप्प्यात ही लस घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काहीवेळा इन्फ्लुएंझा लसदेखील पहिल्या तीन महिन्यात दिली जाऊ शकते.
इन्फ्लुएंझा लसीकरणाचा काळ - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी.
इन्फ्लुएंझा लसीकरणाचा काळ
गरोदरपणात नाकाद्वारे स्प्रेने दिली जाणारी इन्फ्लुएंझा लस घेणे टाळावे कारण ती जिवंत विषाणूंपासून बनविली जाते. लस आणि त्याचे टप्पे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या प्रसुती किंवा स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

इन्फ्लुएंझा लशीनंतरचे दुष्परिणाम

इन्फ्लुएंझा लशीच्या सर्वसाधारण परिणामांमध्ये इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना होणे, त्वचेवर लालपणा, सूज येणे, मळमळ आणि थकवा जाणवणे यासारखी लक्षणे जाणवतात. या व्यतिरिक्त डोकेदुखी, पोटदुखी, थंडीताप यांसारखा त्रास जाणवतो. इन्फ्लुएंझा लशीचे काही असामान्य दुष्परिणाम म्हणजे चक्कर येणे, इंजेक्शन दिलेल्या जागी रक्त जमा होणे किंवा खाज येणे.

गरोदरपणात दिलेली इन्फ्लुएंझा लस नवजात बाळांना कशी मदत करते?

गरोदरपणात दिलेली इन्फ्लुएंझा लस आई आणि नवजात बाळाला मदत करते.
नवजात बाळांना ६ महिन्यांचे होईपर्यंत इन्फ्लुएंझा लस मिळू शकत नाही.
गरोदर स्त्रियांना लस दिली जाते तेव्हा ट्रान्सप्लेसेंटाल मार्गाने नवजात अर्भकाकडे प्रतिपिंडे पोहोचतात. अशाप्रकारे नवजात अर्भकांना आईपासून प्रतिकारशक्तीद्वारे संरक्षण दिले जाते.

एकाचवेळी पर्टुसिस आणि फ्लू लस

पर्टुसिस (टीडॅप) आणि फ्लू लसीकरण गर्भवती महिलांना एकाचवेळी परंतु शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी दिले जाऊ शकतात.
निरोगी गरोदरपणासाठी गरोदर काळातील लसीकरण ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. हे लसीकरण केवळ तुमचेच रक्षण करीत नाही तर तुमच्या बाळाचेही जन्मापूर्वी आणि जन्मानंतर संरक्षण करते. गर्भवती महिलांसाठी या ठराविक लशी आवश्यक आहेत त्यामुळे गरोदरपणात टीडॅप लस, टीटी इंजेक्शन आणि इन्फ्लुएंझा ही तीन महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित लसीकरणे आपण पूर्ण करायला हवी. गरोदर काळातील लसीकरणाबाबत काही प्रश्न अथवा शंका असल्यास आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच या लसीकरणाबाबत अधिक आणि सखोल माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

हे ही वाचा

गर्भवती होणं आणि त्यानंतर मातृत्व अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला मोठा निर्णय असतो. गर्भावस्था हा एक प्रवास आहे आणि त्याची सुरुवात मला आई व्हायचे आहे या विचाराने होते. त्यामुळे गर्भवती होण्यासाठी काय करावे आणि आई होण्याचा प्रवास सुखकर कसा होईल याची माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपल्याला गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविण्यात मदत करतील.

हे ही वाचा

गर्भवती होणं आणि त्यानंतर मातृत्व अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला मोठा निर्णय असतो. गर्भावस्था हा एक प्रवास आहे आणि त्याची सुरुवात मला आई व्हायचे आहे या विचाराने होते. त्यामुळे गर्भवती होण्यासाठी काय करावे आणि आई होण्याचा प्रवास सुखकर कसा होईल याची माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपल्याला गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविण्यात मदत करतील.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

गर्भधारणा गणक / कैलक्युलेटर

गर्भधारणेच्या महत्त्वाच्या तारखांचा अचूक अंदाज लावा

कॅलेंडर आयकॉन - गर्भधारणेची अंतिम तारीख कॅल्क्युलेटर - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोगतज्ज्ञ

अचूक प्रसव तिथि अथवा बाळाच्या आगमनाची तारीख जाणून घ्या

बाळाच्या आगमनाची अपेक्षा करत आहात आणि बाळंतपणाची तारीख जाणून घ्यायची आहे? आठवड्यानुसार, महिन्यानुसार आणि गर्भधारणेच्या प्रगती स्थितीनुसार, या कॅल्क्युलेटर / गणक चा वापर करून अचूक प्रसव तिथि जाणून घ्या.
ओव्हुलेशन कालावधी आयकॉन - डॉ. वर्षाली माळी - स्त्रीरोग तज्ञ

गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घ्या

गर्भवती होऊ इच्छिता? तुमचे सर्वोत्तम प्रजनन दिवस जाणून घेऊ इच्छिता? तुमचा ओव्हुलेशन / स्त्रीबिजांचा कालावधी, लक्षणे आणि गर्भधारणेसाठीचे सर्वोत्तम दिवस जाणून घेण्यासाठी हे ओव्हुलेशन गणक / कॅल्क्युलेटर वापरा.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय