डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे

गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे

गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे

वस्तुस्थिती | अनुभव | सल्ला | पुढे काय ?

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - तुम्हाला कोणती आणि कधी जाणवतील?
आपण गर्भवती आहोत हा विचार करण्यास भाग पाडणारी अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे, गर्भनिरोधक गोळी घेण्यास विसरणे किंवा गर्भनिरोधक पर्यायांचा वापर न केल्यास ही शंका अधिक दाट होत जाते. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल तुम्हाला जाणवू लागतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे हे यातील सामान्य आणि प्राथमिक लक्षण असते. परंतु, गर्भधारणा झाल्याची इतरही प्राथमिक लक्षणे आहेत. जसे की, सकाळच्यावेळी आजारपण जाणवणे, थकवा येणे, हलका रक्तस्राव होणे, स्तनात बदल होणे यासारखे बदल शरीरात होतात.
गर्भधारणा झाल्याचे पहिले किंवा प्राथमिक लक्षण प्रत्येक स्रीमध्ये वेगवेगळेही असू शकते. मासिक पाळी चुकल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी एखाद्या स्रीमध्ये गर्भवती असल्याचे लक्षण जाणवते. तर काहीवेळा गर्भधारणा झाल्यानंतरच्या दोन किंवा तीन आठवड्यानंतर लक्षणे जाणवू लागतात. तर अनेकींना या काळात ही लक्षणेदेखील जाणवत नाहीत. या लक्षणांची संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

गर्भधारणेची प्रारंभिक लक्षणे

बाळ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल किंवा आपण गर्भवती झालो तर कळणार कसे? असा विचार करीत असाल तर हि दहा लक्षणे लक्षात ठेवा.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे

मासिक पाळी न येणे म्हणजे आपण गर्भवती आहोत का? हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खरंतर एखाद्या महिन्यात मासिक पाळी न येणे हे गर्भवती असण्याचे सर्वसामान्य लक्षण आहे. गर्भधारणा झाल्यानंतर आपले शरीर ‘ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन’ (एचसीजी) हे ग्रंथीसत्व (हार्मोन) तयार करून ते शरीरात सोडण्यास सुरुवात करते. हे ग्रंथीसत्व (हार्मोन) गर्भावस्थेची काळजी घेण्याचे काम करते. तसेच हे ग्रंथीसत्व (हार्मोन) तुमच्या अंडाशयाला दर महिन्याला नवीन अंडी निर्माण न करण्याचा संदेश देते आणि यामुळे मासिक पाळी येणे थांबते.
पण तुम्हाला हे माहीत असायला हवे की, एखादवेळी मासिक पाळी न येणे किंवा नियमित वेळेपेक्षा लांबणे म्हणजे आपण गर्भवती आहोतच असे नाही. मासिक पाळी न येणे किंवा लांबण्यामागील इतरही काही कारणे असू शकतात. लैंगिक संबंध नसतानाही तुम्ही गोळ्या घेत असाल किंवा गोळ्या घेणे थांबवले असल्यास मासिक पाळीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच तणाव, थकवा, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे तसेच ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदल यामुळे मासिक पाळी चुकणे किंवा लांबणे अशी घटना घडू शकते.
जर तुमची मासिक पाळी नियमित नसेल किंवा मासिक पाळी चक्रानुसार येत नसेल तर पाळी लांबण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात. जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्या नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देऊन तुमची अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतील.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - सकाळच्यावेळी मळमळ - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

सकाळच्यावेळी मळमळ

गर्भधारणा झाल्याच्या साधारण दोन आठवड्यानंतर सकाळच्यावेळी मळमळ किंवा आजारी असल्यासारखे जाणवू शकते. सकाळच्यावेळी मळमळ होणे हे गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. मासिक पाळी चुकण्याव्यतिरिक्त हे लक्षणही तुम्हाला जाणवू शकते. शरीरात ‘इस्ट्रोजेन’ ग्रंथीसत्वाचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला थकवा जाणवतो. यात मळमळ होण्याचे प्रमाणही वाढते. बहुतांश स्त्रियांना गर्भावस्थेच्या १४ व्या आठवड्यापर्यंत हा त्रास होतो आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. मात्र, काहींना संपूर्ण गर्भावस्थेत या त्रासातून जावे लागते.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - हलका रक्तस्राव - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

हलका रक्तस्राव

गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही महिलेसाठी हलका रक्तस्राव होणे म्हणजे नाराजीचे कारण ठरू शकते. हा रक्तस्राव म्हणजे मासिक पाळी आल्याचा समज होऊन याकडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु. कधीकधी गर्भधारणा झाल्यानंतरही रक्तस्राव होऊ शकतो. जर, हा रक्तस्राव किंवा रक्ताचे ठिपके हलक्या रंगाचे असतील तर त्याचे कारण मासिक पाळी व्यतिरिक्त वेगळे असू शकते. जेव्हा फलित अंडे गर्भाशयाच्या अस्तराला जोडले जाते तेव्हा ही प्रक्रिया घडते. त्यामुळे हलका रक्तस्राव होत असल्यास या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण गर्भवती आहोत हे या लक्षणातून देखील समजू शकते.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - स्तनात बदल- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

स्तनात बदल

गर्भावस्थेत शरीरात विविध प्रकारच्या ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी स्तनामध्ये वेदना जाणवू शकते. गर्भधारणा झाल्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे पहिले शारीरिक लक्षण असते. यामध्ये स्तनात जडपणा किंवा कोमलता जाणवतो. हे लक्षण साधारणतः गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीपर्यंत कायम असते आणि त्यानंतर याचे प्रमाण कमी होऊ लागते. याचबरोबर स्तनाग्राभोवतीची त्वचा अधिक गडद होऊ लागते. ग्रंथीसत्व (हार्मोन) मधील बदलांमुळे ही प्रक्रिया घडते.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - थकवा- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

थकवा

तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा थोड्याफार कामानंतर थकल्यासारखे जाणवत असेल तर हे तुम्ही गर्भवती असल्याचे लक्षण असू शकते. गर्भाशयात गर्भ वाढत असताना आपले शरीर विविध बदल अनुभवत असते. गर्भाच्या वाढीसाठी आपली ऊर्जा यात कामी येत असते आणि परिणामी शरीर ऐरवीपेक्षा लवकर थकते. हे गर्भधारणेच्या विशिष्ट लक्षणांपैकी एक लक्षण आहे. ‘प्रोजेस्टरॉन’ ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी वेगाने वाढल्यानंतर झोप लागणे किंवा तंद्री लागल्यासारखे जाणवते. जर या थकव्याचा सामना करणे त्रासदायक होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तपासणीद्वारे या थकव्यामागील कारण गर्भधारणा आहे की इतर दुसरे काही हे समजण्यास मदत होईल.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - विविध पदार्थ खाण्याची इच्छा- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

विविध पदार्थ खाण्याची इच्छा

गर्भधारणेनंतर एखादा चमचमीत किंवा विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. गर्भाधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या आवडत्या पदार्थांमध्ये काही वेगळे पदार्थदेखील सामावले जातात. एखादा नवीन पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा या काळात होते. बरेचदा हे पदार्थ नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळे किंवा नवीनही असू शकतात. बहुतांश महिला त्यांच्या नावडीचा पदार्थ चाखण्यातही इच्छुक असतात. तर कधीकधी या बदलांमुळे एखादा पदार्थ न आवडल्याने मळमळदेखील होऊ शकते.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - स्वभावात लहरीपणा- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

स्वभावात लहरीपणा

गर्भधारणेच्या प्रारंभिक लक्षणांमध्ये स्वभावात लहरीपणा येणे हेदेखील सामान्य लक्षण आहे. विनाकारण रडू कोसळणे किंवा भावनाविवश होणे याचा अनुभव या काळात बहुतांश स्त्रियांना येतो. ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांचा परिणाम मनावर झालेला पाहायला मिळतो. परंतु, यात काळजीचे काहीच कारण नाही. ही अतिशय सामान्य गोष्ट असून ताण किंवा इतर गोष्टीही याला कारणीभूत असतात. त्यामुळे गर्भावस्थेत ‘मूड स्विंग्ज’ होत असतील तर त्याकडे सामान्य गोष्ट म्हणून पाहा.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - लघवीच्या प्रमाणात वाढ- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

लघवीच्या प्रमाणात वाढ

एरवीपेक्षा सतत लघवीला जावे लागत असल्यास आपण गर्भवती आहोत असे समजण्यास हरकत नाही. सतत लघवी होणे हेदेखील गर्भाधारणेच्या लक्षणांपैकी एक आहे. गर्भधारणेनंतर काही दिवसांत हे लक्षण जाणवायला सुरुवात होते. गर्भाशयाची होणारी वाढ आणि ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांमुळे मूत्राशय अधिक गतीने भरते. ज्यामुळे वारंवार लघवी होते. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्या.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - योनीतून स्राव- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

योनीतून स्राव

काही स्रियांमध्ये गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या आठवड्यात योनीतून सफेद रंगाचा घट्ट स्राव होतो. यामागचे कारण म्हणजे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात योनीमार्गाचे कवच दाट होते आणि योनीमार्गातील स्राव वाढून ते गर्भशिशूचे संसर्गापासून संरक्षण करते. योनीमार्गात खाज सुटणारा किंवा जळजळ होणारा म्हणजेच कुठल्याही संसर्गाशी संबंधित नसलेला स्राव होत असेल तर हे गर्भधारणेचा झाल्याचे लक्षण आहे. जर योनीमार्गातील स्रावानंतर खाज सुटणे किंवा जळजळ होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, हे संसर्गाचे लक्षण असू शकते ज्यात उपचारांची गरज आहे.
गर्भधारणेची अथवा गरोदर असल्याची लक्षणे - बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी

बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)

ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांमुळे आणखी एक त्रास वाढतो तो म्हणजे बद्धकोष्ठता. ‘प्रोजेस्टेरोन’ ग्रंथीसत्व (हार्मोन)ची पातळी वाढल्याने पचनक्रिया थंडावते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास स्रियांना जाणवू लागतो.
खरंतर गर्भधारणा झाल्याची बरीच लक्षणे आहेत. जसे की, डोकेदुखी, दम लागणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, एखाद्या विशिष्ट वासाचा त्रास होणे. यापैकी बहुतांश लक्षणे ही गर्भावस्थेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीपर्यंत कायम राहतात. स्वभावात लहरीपणा, सतत लघवी होणे, थकवा, चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा, एखादा पदार्थ किंवा गोष्ट नावडती होणे यासारखी लक्षणे बहुतांश स्रियांमध्ये शेवटपर्यंत दिसतात.
प्रत्येक गरोदरपणात एकाच स्त्रीला वेगवेगळ्या लक्षणांसह वेगळा अनुभव येऊ शकतो. गर्भधारणेची कोणतीही प्रारंभिक चिन्हे तुम्ही अनुभवत नसाल तरी तुम्ही गरोदर आसू शकता. आपण गर्भवती आहोत हे काही स्रियांना सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही, हे जाणून घेण्यासाठी त्यांना बराचसा काळ लागू शकतो. जर आपणास वाटत असेल की आपण गर्भवती आहोत आणि यापैकी काही लक्षणे जाणवत नसतील, तर अशावेळी आपल्या स्रीरोग तज्ज्ञांची भेट घ्या. त्या तुम्हाला याविषयी योग्य माहिती आणि उपचार देतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला यावर उपचार करणेही सोपे होईल.

गर्भधारणेची प्रारंभिक चिन्हे किंवा लक्षणे दिसल्यानंतर पुढे काय?

आतापर्यंत वाचलेल्या विस्तृत माहितीनंतर गर्भधारणेची लक्षणे आणि चिन्हे याबाबत तुम्हाला पुरेशी कल्पना आली असेल. परंतु, त्याबाबत अजूनही मनात शंका असू शकतात. तुमच्या मनातही अशी काही शंका असल्यास अशावेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे गर्भधारणा चाचणी. अल्ट्रासोनोग्राफी चाचणी वगळता, इतर सर्व गर्भधारणा चाचण्या ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन (एचसीजी)ची पातळी मोजतात, जे एक गर्भधारणा ग्रंथीसत्व (हार्मोन) आहे.
याविषयी अधिक माहिती तुम्हाला गर्भधारणा चाचणी मार्गदर्शन या लेखामध्ये मिळेल. या लेखात गर्भधारणा चाचणीविषयी सखोल मार्गदर्शन आणि माहिती देण्यात आली आहे. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर अशावेळी तुमच्या स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. गर्भधारणा आणि चाचणी याविषयी असलेले प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यातून तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवू शकता. डॉक्टरदेखील तुम्हाला हवी असलेले मार्गदर्शन करतात आणि तुमचा गर्भावस्था प्रवास सुखकर होण्यासाठी मदत करतात. तसेच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांचेही निराकरण करता येऊ शकते. यासाठी आपल्या डॉक्टरांशी भेट निश्चित करा.

ही ‘प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम’ची चिन्हे असू शकतात का?

गर्भधारणेची बहुतांश लक्षणे ही मासिक पाळीपूर्वीची लक्षणे समजली जाऊ शकतात. बऱ्याच महिलांना मासिक पाळी चक्राच्या शेवटच्या टप्प्यात ‘प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम’चा त्रास जाणवतो.
हे शारीरिक आणि मानसिक त्रासांचे संयोजन असते जे पाळी संपत आली की कमी होत जाते. यामध्ये थकवा, मनस्थितीमध्ये बदल (मूड स्विंग्ज), तणाव, स्तनांमध्ये कोमलता आणि वेदना जाणवणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. ही लक्षणे आणि गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे यामध्ये पुष्कळसे साम्य जाणवते. ही दोन्ही विशिष्ट किंवा एकमेकांपासून वेगळी नसल्याने त्यांच्यात फरक करण्याचे एकमेव साधन म्हणजे गर्भधारणा चाचणी. प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमने तुमची पाळी येणार आहे याची खात्री होते. गर्भधारणा चाचणी कोणती व कुठे करावी यासाठी आपल्या स्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम हा मासिक पाळी चक्रानुसार भिन्न असू शकतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या लक्षणांप्रमाणेच याचीही प्रत्येक महिलेमध्ये तीव्रता वेगवेगळ्या स्वरुपाची असते. जर तुम्हीदेखील गर्भधारणेची लक्षणे किंवा प्रीमेस्ट्रुअल सिंड्रोम यांचा अनुभव घेत असाल तर तणाव, आहारातील नियोजन आणि औषधोपचार यांचे योग्य नियोजन करा.

उपाय आणि सल्ला

गर्भधारणेच्या काही प्रारंभिक लक्षणांमुळे अस्वस्थपणा जाणवू शकते. स्वतःची काळजी घेण्यासाठी येथे काही सल्ला आणि उपाय देत आहे. जेणेकरून या काळात होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल.
मळमळ होऊ नये यासाठी थोड्या थोड्या वेळाने कमी प्रमाणात खात राहा आणि शरीरात पाणी पुरेशा प्रमाणात राहील यासाठी वेळोवेळी पाणी पित राहा.
आरामदायी अंतर्वस्रे (ब्रा) परिधान करा. जेणेकरून तुमच्या दुखऱ्या स्तनांना आधार मिळू शकेल.
आहारात तंतू (फायबर)युक्त पदार्थांचा समावेश करा. याने पोट साफ होण्यास मदत होईल. रोजच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या यांचा समावेश करा.
योग्य आहार घेऊन आपले वजन नियंत्रित ठेवा. गर्भावस्थेत आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भावस्थेत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. गर्भावस्थेत बरीच अँटिबायोटिक्स आणि औषधे सुरक्षित असतात. मात्र, आपल्या डॉक्टरांकडून त्यांची खातरजमा करून घ्या.
अंमली पदार्थ, सिगारेट, दारू यांपासून दूर राहा. गर्भावस्थेत या गोष्टी तुमच्या व गर्भशिशूच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत.
प्रीमेन्स्ट्रुल सिंड्रोम असो वा गर्भधारणेची प्राथमिक लक्षणे असोत, या दोन्ही काळात भावनिक आधाराची गरज जास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्या.
गर्भनिरोधक उपायांचा ज्यावेळी आपण वापर केला नसेल त्यानंतर गर्भधारणा होण्याविषयी मनात विचार सुरू होऊ शकतात. गर्भधारणेची ही प्रारंभिक लक्षणे तुम्ही गर्भवती असल्याचे संकेत देऊ शकतात. पण प्रत्येक स्रीमध्ये ही लक्षणे वेगवेगळ्या स्वरुपाची असू शकतात. खरंतर ही लक्षणे मासिक पाळीमध्येही भिन्न असू शकतात. काही स्रियांना हे मासिक पाळी चुकल्याच्या पहिल्या दिवशी जाणवतात तर काहींना दोन ते तीन आठवड्यांनंतर लक्षात येते. तर क्वचित लोकांना यापैकी कशाचाही अनुभव येत नसतो. आपण गर्भवती आहोत असे जाणवत असल्यास आपल्या स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या . तसेच आपल्या मनातील शंका डॉक्टरांना निसंकोचपणे विचारा.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

हे ही वाचा

गर्भवती होणं आणि त्यानंतर मातृत्व अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला मोठा निर्णय असतो. गर्भावस्था हा एक प्रवास आहे आणि त्याची सुरुवात मला आई व्हायचे आहे या विचाराने होते. त्यामुळे गर्भवती होण्यासाठी काय करावे आणि आई होण्याचा प्रवास सुखकर कसा होईल याची माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपल्याला गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविण्यात मदत करतील.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय