डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
निरोगी बाळ आणि सशक्त आई होण्यासाठी गरोदरपणात, बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी

निरोगी बाळ आणि सशक्त आई होण्यासाठी

गरोदरपणात, बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी

स्व-शिक्षण | प्रेरणा | आधार | टिप्स

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

निरोगी बाळ आणि सशक्त आई होण्यासाठी गरोदरपणात, बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी
प्रत्येक स्रीच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणारी घटना म्हणजे “आई होणे” ही असते. मुलगा असो वा मुलगी, त्याच्या येण्याने आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखकर कसा होईल याचा विचार स्री करीत असते. पण याचबरोबर बाळाच्या आगमनाने अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी देखील तुम्हाला तयार व्हावे लागते. एका लहानशा पेशीपासून गर्भ तयार होण्यास सुरुवात होते आणि हळूहळू बाळाच्या शरीराची वाढ होऊ लागते. बाळ गर्भाशयात असल्यापासूनच त्याला संतुलित आहार आणि प्रेम या गोष्टी मिळाल्या तर त्याची वाढ उत्तम होते. बाळ सुदृढ आणि हुशार असावे यासाठी ते गर्भाशयात असताना अनेक गोष्टी करता येऊ शकतात. या लेखात असेच काही साधे, सोपे आणि महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत, जे प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरचे निरोगी आरोग्य तुम्हाला देतील.
आपण गर्भवती असल्याची खात्री करा
गर्भधारणेची प्रारंभिक लक्षणे दिसू लागल्यास सर्वप्रथम आपण गर्भवती आहात का? याची खात्री करा. घरगुती गर्भधारणा चाचण्यांमध्ये अनेक त्रृटीदेखील असतात हे लक्षात घ्या. जसे की, ‘एचसीजी युरिन चाचणी’ ही ७५ ते ९१ टक्क्यांपर्यंत संवेदनशील असते. त्यामुळे कधीकधी गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली तरीही तो निकाल चुकीचा असू शकतो. त्यामुळे आपल्या मासिक पाळीचा अंदाज घेऊन गर्भधारणा चाचणी दोनवेळा करणे योग्य ठरेल. शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण तीन आठवड्यांनी गर्भाचा विकास सुरू होतो. या काळात मासिक पाळी चुकणे, थकवा जाणवणे, मळमळ होणे, वारंवार लघवी होणे ही गर्भधारणेची लक्षणे जाणवतात. अशावेळीदेखील रक्त किंवा मूत्र गर्भधारणा चाचणी करून आपण गर्भवती आहात की नाही याची खात्री करता येते. परंतु, ही लक्षणे दिसण्यासाठी थोडा अधिक काळ लागतो. त्यामुळेच गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात ‘डेटिंग अल्ट्रासाऊंड प्रेग्नंसी स्कॅन’ ही गर्भधारणा चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. या चाचणीच्या माध्यमातून गर्भधारणा झाल्याची खात्री होऊन त्याची अचूक तारीखदेखील कळते. गर्भाधारणेची खात्री करण्यासाठी आणि पुढील टप्पे जाणून घेण्यासाठी आपल्या स्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करा.
गर्भावस्थेत आनंदी राहण्यासाठी तसेच बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी हे काही उपाय आम्ही देत आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुमचा गर्भावस्थेतील प्रवास आरामदायी होण्यास मदत होईल.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - आराम करा आणि तणाव टाळा - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
आराम करा आणि तणाव टाळा
आपण गर्भवती आहोत हे समजल्यावर प्रत्येकीच्या मनात चिंता वाढते. गर्भावस्थेतील भावनिक बदल मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि त्याचा आई आणि बाळ यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू शकतो. विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात हा त्रास वाढू शकतो. तसेच ज्या स्रियांना पूर्वी मानसिक आरोग्याच्या समस्या असतील अशांना गर्भावस्थेत हे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतात आणि त्यांना ‘मूड स्विंग्ज’चा धोका अधिक प्रमाणात असतो. गर्भावस्था, बाळाचा जन्म आणि पालक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचा तणाव या गोष्टी पूर्वी नियंत्रणात असलेल्या गोष्टी अस्थिर करू शकतात. त्यामुळे गर्भावस्थेतील मुख्य काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे निवांत राहा आणि तणावाला दूर ठेवा. घरातील सदस्यांसोबत किंवा जोडीदारासोबत मुक्त संवाद ठेवा, छोट्या छोट्या संवादांमधून आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून शरीराला आराम द्या. लक्षात ठेवा आपल्या बाळाला निरोगी आणि आनंदी आई हवी आहे. त्यासाठी ही गोष्ट अवश्य करा.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - फॉलिक असिडचा पुरवठा वाढवा - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
फॉलिक असिडचा पुरवठा वाढवा
‘फॉलिक असिड’ हे गर्भावस्थेत आईसाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व पूरक मानले जाते. गर्भावस्थेतील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे फॉलिक असिडचा शरीराला लवकरात लवकर पुरवठा वाढवणे. गर्भधारणेच्या बारा आठवड्यांपर्यंत फॉलिक असिड शरीरात जाणे आवश्यक असते. साधारणपणे दिवसाला ४०० मायक्रोग्रॅमचा एक डोस घेण्याची शिफारस डॉक्टर करतात. फॉलिक अँसिडच्या सेवनाने बाळाचा मेंदू, पाठीचा कणा या जन्मदोषांच्या घटना कमी झालेल्या दिसून आल्या आहेत. जर तुम्हाला काही व्याधी किंवा शारीरिक त्रास असेल उदा. अपस्मार, मधुमेह, लठ्ठपणा यांसारखे काही त्रास असतील तर हा डोस ५ मायक्रोग्रॅम इतकाच देण्याची शिफारस केली जाते. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार फॉलिक असिडचे प्रमाण आणि वारंवारता याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या प्रसुति किंवा स्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करून सल्ला अवश्य घ्या.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - फॉलिक असिडचा पुरवठा वाढवा - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - डॉक्टरांचा सल्ला - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
डॉक्टरांचा सल्ला
आपण गर्भवती आहात या गोष्टीची खात्री होऊ लागली की, प्रसुति तज्ज्ञांना भेटण्याची शिफारस केली जाते. गर्भधारणा झाल्याची खात्री करण्यासाठी प्रसुति तज्ज्ञ आणखी काही चाचण्या करू शकतात. प्रसुति तज्ज्ञ आपला वैद्यकीय इतिहास जाणून घेऊन तपासणी करतील. तसेच योग्य ती काळजी घेता यावी यासाठी पुढील तपासण्यांचे नियोजन तयार करतील. गर्भावस्थेचा ८ आठवड्यांचा काळ पूर्ण होण्यापूर्वी प्रसुति तज्ज्ञांना भेटणे गरजेचे आहे. गर्भधारणा झाल्याच्या सुरुवातीच्या काळातच जर प्रसुति तज्ज्ञांची भेट घेतली तर बाळ आणि आई दोघांच्याही निरोगी आरोग्यासाठी योग्य सल्ला मिळण्यास मदत होते. तसेच गर्भावस्थेत नकारात्मक परिणाम करणारी एखादी जोखीम असलेली बाब लक्षात येण्यासही याने मदत होते.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - सकस आहार - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
सकस आहार
गर्भवती स्रीच्या असकस किंवा अनियमित आहारामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची भीती असते. पौष्टिक आहार आणि आईच्या योग्य जन्माला येणारे बाळही सुदृढ असण्याची शक्यता वाढते. गर्भावस्थेत आईचे साधारण १० ते १६ किलो वजन वाढणे चांगले मानले जाते. वजन वाढवण्यासाठी आपण अतिरिक्त प्रमाणात पौष्टिक आहाराचे सेवन करायला हवे. पौष्टिक, संतुलित आहारामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शिअमचा पुरवठा करतात. तसेच स्टार्चयुक्त पदार्थ आणि भरपूर फळभाज्यांचाही समावेश आहारात करायला हवा. यातून आवश्यक जीवनसत्त्वे आणि फायबर म्हणजे तंतूजन्य पदार्थांचा शरीराला पुरवठा होईल. तसेच साखरेचे प्रमाण आणि मीठाचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा. कमी शिजवलेले मांस आणि अंडी, मऊ चीज, कच्चे मासे, शेलफिश आणि पाश्चराइज्ड् दूध या सर्व गोष्टी आहारात घेणे टाळावे. गर्भावस्थेवर प्रतिकुल परिणाम करणारे असे अनेक अन्नघटकदेखील आहेत. आपल्याला आवश्यक असलेल्या अन्नाचा प्रकार आणि त्याचे आहारातील प्रमाण याबद्दल अधिक सल्ल्यासाठी स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संतुलित आहाराचे सेवन करणे हे निरोगी गर्भावस्थेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आहाराकडे या काळात विशेष लक्ष द्या.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - सकस आहार - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - व्यायाम - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
व्यायाम
गर्भावस्थेत आईला मध्यम स्वरुपाचा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्या तसेच स्नायूंना बळकटी येण्यास मदत मिळते. या काळात पोहणे, चालणे, जॉगिंग करणे तसेच एरोबिक्सचे साधे प्रकार यांसारखे व्यायामाचे प्रकार गर्भवती महिला करू शकतात. गर्भावस्थेत शरीराची जास्त प्रमाणात हालचाल किंवा जास्त मेहनती खेळ खेळणे टाळावे कारण यामुळे ओटीपोटावर आघात होण्याची शक्यता जास्त असते. स्कुबा डायव्हिंगमुळे गर्भात जन्मदोष निर्माण होऊ शकतो. तसेच गर्भावर आघात करणारे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भावस्थेत स्कुबा डायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामाने आत्मविश्वास दृढ होण्यास मदत होते तसेच सकारात्मक ऊर्जादेखील मिळते. त्यामुळे आपले शूज आणि ट्रॅक सूट कपाटातून बाहेर काढा आणि व्यायामाला सुरुवात करा.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - वैद्यकीय परिस्थितीसाठी मदत - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
वैद्यकीय परिस्थितीसाठी मदत
गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात बाळाची होणारी वाढ, गर्भवेष्टन आणि इतर शारीरिक बदलांमुळे शरीरात विविध प्रकारच्या ग्रंथीसत्व (हार्मोन)ची निर्मिती होऊन ते शरीरात मोकळे होऊ लागतात. यामुळे आईच्या हृदय, फुफ्फुसे आणि मुत्रपिंडात बदल घडवून आणणाऱ्या घटनांचे सत्र सुरू होते. यामुळे फुफ्फुस किंवा हृदयावर याचा परिणाम होऊन उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. एखादा जुनाट मातृरोग गर्भाच्या वाढीवर विपरित परिणाम करू शकतो. गर्भधारणेपूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी यावर चर्चा करून सल्ला घेतला असेल. परंतु, कधीकधी गर्भधारणेनंतर गोष्टी बिघडू शकतात. तुम्हाला असा काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांना भेटून त्यांना आपली समस्या सांगा. डॉक्टर यावर उपाय देऊन ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि निरोगी गर्भावस्थेसाठी मदत करतील.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - वैद्यकीय परिस्थितीसाठी मदत - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - प्रवास - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
प्रवास
गर्भावस्थेत प्रवास करणे आईसाठी थोडी अवघड गोष्ट होऊ शकते. तुमच्या गर्भधारणेसंदर्भात काही गुंतागुंत किंवा चिंतेचे कारण नसेल तर गर्भावस्थेत प्रवास करणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. गर्भावस्थेत प्रवास करण्याची योग्य वेळ म्हणजे दुसरी तिमाही. जर काही कारणानिमित्त तुम्हाला प्रवास करणे अटळ असेल तर, आपल्याला आरामदायी आणि सुरक्षित प्रवास कसा मिळेल यादृष्टीने विचार करायला हवा. आपण जिथे जाणार आहोत त्या ठिकाणी आरोग्य सेवा सहज उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करा. आपले गर्भधारणेचे अहवाल नेहमी सोबत ठेवा. काही स्रियांना गरोदरपणाच्या अगदी सुरुवातीच्या लक्षणांचा त्रास जाणवत असतो आणि ही लक्षणे प्रवासामध्ये अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. आपण ज्या वाहनाने जात आहात त्याचे सीट बेल्ट योग्य पद्धतीने लावा. तसेच बस किंवा ट्रेनने प्रवास करीत असताना उभे राहू नका. चालताना किंवा जिना चढ-उतार करताना रेलिंगचा आधार घ्या. दूरचा प्रवास टाळा. पाच ते सहा तासांहून अधिक प्रवास करणे टाळण्याचा किंवा मोठ्या प्रवासात थोडा वेळ थांबून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
गर्भावस्थेत सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक बाब म्हणजे एखादा फेटफटका मारणे. प्रवासातदेखील यासाठी एखादा टप्पा ठरवून घेणे गरजेचे आहे. यामुळे रक्त फिरते ठेवण्यासाठी तसेच शरीर मोकळे करण्यासाठी वेळ मिळतो व प्रवास कंटाळवाणा होत नाही. बहुतांश हवाई जहाज कंपन्या गर्भवती महिलांना आठव्या महिन्यापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देतात. जर तुमच्या प्रसुति तज्ज्ञांनी प्रवासाची परवानगी दिली असेल तर नवव्या महिन्यातही प्रवास करण्यास मुभा मिळते. अरुंद जागा, छोटी स्नानगृहे आणि विमानाला हादरे बसवू शकणाऱ्या गोष्टींमुळे हवाई प्रवास अधिक आव्हानात्मक बनतो. त्यामुळे हवाई प्रवासात गर्भवती स्रीने विशेष काळजी घ्यायला हवी. यामध्ये सीट बेल्ट लावणे, तसेच विमान उड्डाण करीत असताना किंवा उतरत असताना सीट बॅकचा आधार घ्या, तसेच वॉशरूमला जाताना कुणाचा आधार घेणे या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या प्रवासाच्या योजना आणि प्रवासाचे साधन याबाबत आपल्या प्रसुतितज्ज्ञांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणे अत्यंत योग्य ठरते.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - लैंगिक संबंध- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
लैंगिक संबंध
गर्भावस्थेत आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास काही हरकत नाही. गर्भावस्थेत लैंगिक संबंध ठेवण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत तसेच गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवल्यास बाळाला इजादेखील होत नाही. अँम्निओटिक सॅक म्हणजे भ्रृणाभोवतीची थैली आणि गर्भाशयाचे मजबूत स्नायू बाळाला सुरक्षित ठेवतात. तसेच गर्भाशय ग्रीवा म्हणजेच गर्भाशयाचा खालच्या भागातील चिकट स्राव संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतो. तसेच तुमच्या गर्भधारणेत किंवा प्रसुतिमध्ये काही गुंतागुंत किंवा जोखमीचे कारण नसेल, तुम्हाला काही त्रास नसेल तर लैंगिक संबंधांनंतर प्रसुतिवेदना किंवा गर्भपात होण्याचा धोका नसतो. काही स्रिया मळमळ, उलट्या, स्तन दुखणे यासारख्या गर्भधारणेच्या लक्षणांचा अनुभव घेत असतात. त्यामुळे त्यांचे सेक्स ड्राइव्ह म्हणजे लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. तसेच ग्रंथीसत्व (हार्मोन)मधील बदलांमुळे काहींना लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा वाटू शकते. या दोन्हीही परिस्थिती सामान्य असून यात काळजी करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा या काळात लैंगिक संबंधांपेक्षा शारीरिक जवळीक जास्त गरजेची आहे. तुम्हाला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा नसेल किंवा तुमच्या डॉक्टरने तसे न करण्याचा सल्ला दिला असेल तर, तुम्ही मिठी मारणे, चुंबन घेणे आणि एकमेकांची काळजी घेणे या गोष्टी करू शकता. काहीवेळा अशीही परिस्थिती निर्माण होते की, तुमचे लैंगिक जीवन क्रियाशील होऊ शकते किंवा संपूर्ण गर्भावस्थेत तुम्ही लैंगिक संबंधदेखील पूर्णपणे टाळू शकता. गर्भावस्थेत लैंगिक जीवनाबद्दल काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्या आपल्या डॉक्टरांना विचारायला संकोच करू नका. जर लैंगिक संबंधांदरम्यान किंवा नंतर कळ येत असेल आणि काही काळापर्यंत हा त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांना याविषयी माहिती द्या. तसेच लैंगिक संबंधानंतर वेदना किंवा रक्तस्राव होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरामदायी आणि सुरक्षित संबंध ठेवा. जर काही अस्वस्थ वाटत असेल तर आपल्या जोडीदारालाही त्वरित त्याविषयी कळवा.
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - लैंगिक संबंध- प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
बाळंतपणाच्या सुरुवातीला घ्यावयाची काळजी - धुम्रपान आणि मद्यपान - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षाली माळी
धुम्रपान आणि मद्यपान
बहुतांश महिला धुम्रपान करीत नाहीत. परंतु, दुर्दैवाने तुम्ही ‘पॅसिव्ह स्मोकर’ म्हणजे निष्क्रिय स्मोकर असलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिमाण होतो. यामध्ये तुम्ही स्वतः धुम्रपान करीत नसलात तरीही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात किंवा आसपास असलात तर तुम्हाला त्याचा त्रास जाणवू शकतो. तुम्ही इतर फिल्टर न केलेल्या सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येऊ शकता जे कदाचित सक्रिय धुम्रपानापेक्षा जास्त हानीकारक आहे. गरोदरपणात सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही धुम्रपान केल्याने आपल्या गर्भशिशूवर त्याचा प्रतिकुल परिणाम होतो.
त्यामुळे सक्रिय आणि निष्क्रिय धुम्रपान हे गर्भवती स्रीने टाळले पाहिजे. ज्या ठिकाणी धुम्रपान अधिक होते अशा जागी जाणे गर्भवती महिलेने टाळायला हवे. तसेच तुमचा जोडीदार जर धुम्रपान करीत असेल तर त्यालाही धुम्रपान बंद करण्यास सांगायला हवे किंवा तुम्ही सोबत असल्यास त्यांनी हे टाळायला हवे. गर्भावस्थेत मद्यपान सेवनदेखील धोकेदायक आहे. याचा परिणाम आपल्या गर्भशिशूवर होऊ शकतो. जेव्हा आपण मद्यपान करतो तेव्हा मद्यार्क प्लेसेंटामधून आपल्या वाढत्या गर्भापर्यंत जाते. कारण प्रौढांच्या तुलनेत गर्भशिशूच्या शरीरावर मद्याचा लवकर परिणाम होतो. गर्भाच्या रक्तातील मद्यार्काची पातळी त्याच्या आईच्या तुलनेच जास्त काळ राहू शकते. हे नुकसान दीर्घकाळ टिकणारे आणि गंभीर असू शकते. यामुळे बाळाची मानसिक वाढ होण्यात अडचणी येऊ शकतात तसेच हृदयावरदेखील परिणाम होऊ शकतात. मद्यपान पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करा. अगदी एक घोटदेखील. कारण अधूनमधून केलेले मद्यपानही शरीराला हानीकारक ठरू शकेल. गर्भावस्थेत आरोग्यदायी फळांचा रस पिण्याला प्राधान्य द्या.
स्वशिक्षण
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे आपल्याला विविध लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी याची सविस्तर आणि सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे. गर्भावस्थेविषयी आपल्याला मिळालेली माहिती उच्च गुणवत्तेची आणि पुरावे आधारित आहे की नाही याची सर्वप्रथम खात्री करणे गरजेचे आहे.
प्रसुती हक्क आणि कायदे, आपल्या बाळाच्या समस्यांसाठी स्क्रीनिंग, जन्म आणि प्रसुतिचे स्थान, प्रसुतिमध्ये वेदना कमी करणे, स्तनपान, नवजात बालकाची काळजी घेणे, तसेच त्याची तपासणी करणे या सर्व गोष्टींबाबत जागरुक राहा. तसेच तीव्र पाठदुखी, योनीतून रक्तस्राव, तीव्र ताप, असह्य उलट्या, धाप लागणे याबाबत शिक्षित व्हा. आपल्या प्रसुति तज्ज्ञांकडून याविषयी पूरेसे मार्गदर्शन घ्या.
कौटुंबिक, सामाजिक पाठिंबा आणि प्रोत्साहन
येत्या काही महिन्यात आपल्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे याबद्दल तुम्ही कधी चिंताग्रस्त तर कधी उत्साही असाल. विशेषतः हे पहिलेच बाळंतपण असेल तर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवू शकते. अशावेळी तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्य यांच्यातील चांगले परस्पर संबंध या परिस्थितीत तुम्हाला मोकळेपणा देतील आणि प्रेरित करतील. आपल्या मनातल्या शंकांना अशावेळी वाट मोकळी करून द्या. घरातील वडिलधारी मंडळी म्हणजे आजी, आई, मावशी, काकू यांना आपल्या शंका विचारण्यास संकोच करू नका. तसेच तुमचा जोडीदारही तुमची साथ देईल. त्यामुळे या काळात निश्चिंत होऊन आनंदी राहा.
लक्षात ठेवा की, तुम्ही एक उत्तम आई बनू शकता. त्यामुळे घरातील सदस्य असो वा जोडीदार यांच्याशी संवादात अधिक वेळ व्यतित करा. गर्भावस्थेतील तुमचे अनुभव, विचार आपल्या लोकांशी बोलून मोकळे करा. हे आपल्याला उत्साही राहण्यास मदत करेल तसेच यातून प्रोत्साहनदेखील मिळेल. गर्भावस्थेच्या शेवटच्या काही दिवसांत कुठेही जाताना एखाद्या व्यक्तीसोबत जाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ती व्यक्ती कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत मदत करू शकते आणि आपल्याला आधार देते. गर्भावस्थेत नेहमी सकारात्मक राहा, प्रेरणादायी गोष्टी ऐका आणि निरोगी राहा.
आपण गर्भवती आहोत हे केव्हा सांगावे?
आपण गर्भवती आहोत हा आनंद सगळ्यांसोबत वाटण्यास प्रत्येक स्त्री उत्सुक आणि आनंदी असते. गर्भवती आहोत ही बातमी कधी सांगावी हे पूर्णपणे तुमची इच्छा, कौटुंबिक वातावरण आणि पाठिंबा, सामाजिक पार्श्वभूमी आणि संस्कृती आणि गर्भधारणेतील परिस्थिती यावर अवलंबून असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे १२ आठवड्यांपर्यंत गर्भपात होण्याची भीती असते. मात्र त्यानंतर हा धोका कमी होतो. त्यामुळे बहुतांश महिला हा काळ पूर्ण होईपर्यंत गर्भवती असल्याचे जाहीर करत नाहीत. परंतु, या १२ आठवड्यात दिसणारी गर्भधारणेची काही लक्षणे आपण लपवू शकत नाही. तसेच इतरांच्या मदतीशिवाय या काळात काही कामेदेखील होऊ शकणार नाहीत. त्यामुळे कुटुंब, सहकारी, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ, जवळचा मित्रपरिवार यांना ही गोष्ट सांगणे योग्य ठरू शकते. जेणेकरून गर्भधारणेची ही पहिली तिमाही आरामदायी होण्यास मदत होईल. या काळातही तुम्हाला या सर्व घटकांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आपल्या आणि येणाऱ्या बाळाच्या निरोगी आणि आनंदी जीवनाचा विचार करून तुम्हाला मदतीचा ठरेल आणि योग्य वाटेल असा निर्णय तुम्ही घ्यायला हवा.
गर्भावस्था हा खूप उत्साहाचा आणि अनिश्चिततेचा काळ आहे. गरोदरपणात महिलेने अनुभवलेले शारीरिक बदल यात भर घालतात. मळमळ, छातीत जळजळ, बद्धकोष्ठता, चक्कर येणे, सूज येणे, पाठदुखी, ओटीपोटात अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसह विविध प्रकारच्या लक्षणांचा सामना करावा लागतो. अशावेळी मदत होण्यासाठी या लक्षणांची सखोल माहिती असणे महत्त्वाचे असते. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रसुति तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बरेचदा ही लक्षणे शरीराच्या किरकोळ तक्रारी म्हणून समजली जातात. परंतु, आपला गर्भावस्था प्रवास आरामदायी करण्यासाठी गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनच हे सर्व उपाय करून स्वतःची काळजी घेण्यास सुरुवात करा. चिंता करू नका; फक्त आनंदी राहा आणि आपल्या बाळाकडे लक्ष द्या. प्रसुतितज्ज्ञांच्या संपर्कात राहा. आपल्या सर्व शंका विचारण्यास संकोच करू नका. लक्षात ठेवा तुम्ही निश्चिंत होऊन आनंदी राहून हा प्रवास अनुभवला तर तुमचे बाळही आनंदी आणि सुदृढ जन्माला येईल आणि हेच आनंदी बाळा तुम्हालाही आनंदी आई बनण्यास मदत करेल.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

हे ही वाचा

गर्भवती होणं आणि त्यानंतर मातृत्व अनुभवणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला मोठा निर्णय असतो. गर्भावस्था हा एक प्रवास आहे आणि त्याची सुरुवात मला आई व्हायचे आहे या विचाराने होते. त्यामुळे गर्भवती होण्यासाठी काय करावे आणि आई होण्याचा प्रवास सुखकर कसा होईल याची माहिती तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. ही माहिती देणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपल्याला गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविण्यात मदत करतील.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय