डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
2022-10-15 00:00:00 +0530

सुरक्षित दिवाळी कशी साजरी करावी - गर्भवती महिलांना सल्ला

लेखक

डॉ. वर्षाली माळी

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
सुरक्षित दिवाळी कशी साजरी करावी - गर्भवती महिलांना सल्ला
मिठाई, नवीन कपडे, भेटवस्तू, फराळ या सगळ्यांची रेलचेल असलेला सण म्हणजे दिवाळी. हा सण प्रत्येकाच्या मनात आनंद पेरतो, घरातील वातावरण प्रसन्न करतो. प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येक घरात नवीन ऊर्जा निर्माण करतो. हा असा सण आहे जेव्हा सर्व कुटुंबीय एकत्र येऊन तो आनंदाने साजरा करतात. त्यामुळे प्रत्येकजण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहतो.
याच काळात जर तुम्ही गरोदर असाल तर, दिवाळीचा हा आनंद द्विगुणित होता. घरात एक नवीन सदस्य येण्याची चाहूल वातावरणात रंग भरते. ही दिवाळी कशी संस्मरणीय आणि आरोग्यदायी होईल यासाठी तुमच्या आसपासची प्रत्येक व्यक्ती काही ना ही विचार करीत असते. अशावेळी तुमच्या मनातदेखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. फटाक्यांचा धूर, आवाज, फराळाचे पदार्थ, सणावारातील कपडे या सर्व गोष्टी आपल्या बाळावर काही परिणाम करतील का असा प्रश्न पडला असेल तर त्यात काही गैर नाही. लेखात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. दिवाळीच्या काळात गरोदर स्त्रीने काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सगळ्याचे मार्गदर्शन मी करणार आहे. या मार्गदर्शनाच्या आधारे तुम्हाला या सणाचा आनंद तर घेताच येईल, पण त्याचबरोबर बाळाची काळजी घेणेही सोयीस्कर होईल.

साफसफाई आणि सजावट

दिवाळीच्या काळात स्वच्छता आणि गरोदरपणाची काळजी - डॉ.वर्षाली माळी स्त्रीरोग तज्ज्ञ
दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणूनही साजरा केला जातो. वर्षातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण असल्याने या काळात घराची साफसफाई, रंगकाम, सजावट ही कामे निघतात. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी घर सुसज्ज आणि प्रसन्न असायला हवे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, गर्भधारणेनंतर स्त्रीच्या शरीरात बरेच बदल होत असतात. गर्भशिशूची वाढ होत असल्याने पोटाचा आकार वाढतो, गुरुत्वाकर्षणाचे केंद्र बदलते, प्रसवकळा सहन होण्यासाठी अस्थिबंधन सैल होतात. त्यामुळे साफसफाईचे काम करणे टाळायला हवे. जसे की, जड वस्तू उचलणे, वाकून काम करणे, जड वस्तू हलवणे, छतावरील पंखा साफ करणे ही सर्व कामे गरोदरकाळात टाळायला हवीत. बरेचदा घराची साफसफाई करताना रासायनांचा वापर केला जातो. यातील काही रसायने अशी असतात ज्यामुळे गरोदर स्त्रीला हानी पोहोचू शकते. त्यामुळे रसायनांपासून स्वतःला दूर ठेवा. काही त्रास जाणवल्यास आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही घराची रंगरंगोटी करण्याचा किंवा फर्निचरला पॉलिश करण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही घराबाहेर असताना ही कामे होतील याची काळजी घ्या. कारण काही रसायने, धूर हे शरीराला हानीकारक असतात.
टिप : या वर्षी साफसफाईचे काम आपल्या पतीकडे सोपवा. तुम्ही आतापर्यंत ही जबाबदारी पार पाडत आला आहात, यंदाच्या वर्षी तुम्ही या कामातून सुट्टी घेऊन पतीला हे काम करू द्या . कदाचित तो हे काम तुमच्यापेक्षाही छान करेल . हा सुट्टीचा किंवा विश्रांतीचा काळ एखादे छानसे पुस्तक वाचण्यासाठी किंवा सकारात्मक उर्जा देण्याऱ्या कामासाठी द्या.

फटाके – धूर आणि आवाज

दिवाळीत फटाक्यांचा आवाज, धूर आणि गर्भधारणा काळजी - डॉ.वर्षाली माळी स्त्रीरोग तज्ञ
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण आता हा फटाके फोडण्याचा सण म्हणून जास्त ओळखला जातोय. कुणाचा फटाका सर्वाधिक आवाज करतो याची स्पर्धा अनेकदा दिसते. त्यातून होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदुषणाबाबत जनजागृती होत असली तरीही त्यावर अजून खूप काम करायचे आहे. या ध्वनी आणि वायू प्रदुषणाचा गरोदर स्री आणि तिच्या गर्भशिशूलाही धोका असतोच. त्यामुळे या धूर आणि आवाजापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. फटाक्यांमधून निघालेल्या धुरापासून अलर्जी, श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, तर कधीकधी त्याचा आपल्या फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि नायट्राईट ऑक्साईड असते. जे तुमच्या बाळासाठीदेखील हानीकारक असू शकते. जर तुम्हाला श्वास घेण्यास काही त्रास होत असले, फटाक्यांच्या धुरामुळे मळमळ होत असेल, तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
गर्भधारणेमुळे स्त्री अधिक संवेदनशील होते. या काळात तुमची सर्व इंद्रिये नेहमीपेक्षा अधिक सक्रिय होतात. तसेच तुम्ही गर्भधारणेच्या लक्षणांचा या काळात अनुभव घेत असतात. त्यामुळे या काळात तुमच्या आसपास फोडले जाणारे फटाके त्रासदायक ठरू शकतात. फटाक्यांचा आवाज हा त्वचा आणि चरबीच्या अनेक थरांमधून कमी प्रभावित होत असला तरीही तुमचे गर्भशिशू हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकते. ८५ डेसिबलपेक्षा जास्त असलेला आवाज तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो आणि ११० डेसिबलपेक्षा जास्त असलेला आवाज तुमच्या बाळावर परिणाम करू शकतो. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजांपासून स्वतःला दूर ठेवा.
लक्षात ठेवा की, फटाक्यांमधून होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण तुमच्या आरोग्यावर, मनःशांतीवर परिणाम करते आणि शेवटी तुमच्या भावनिक विकासावर परिणाम करते. जर तुम्ही फटाके फोडत नसला तर ते तुमच्या बाळासाठी नक्कीच उत्तम राहील. परंतु, तुम्हाला फटाके फोडायला आवडत असेल तर फटाक्यांचा वापर कमी करा व फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा. जेणेकरून तुमच्या बाळाला याचा त्रास होणार नाही.

लाडू, चिवडा, मिठाई आणि बरंच काही....

दिवाळीतील आहार आणि गरोदरपणात काळजी - डॉ.वर्षाली माळी स्त्रीरोगतज्ज्ञ
फराळाचे पदार्थ म्हणजेच मिठाई आणि चिवडा या पदार्थांशिवाय दिवाळीचा उत्सव पूर्ण होत नाही. फराळाशिवाय दिवाळीचा सण साजरा करणे थोडे कठीण जाऊ शकते, परंतु तुम्ही गोड आणि तळलेले पदार्थ खाण्याचे पथ्य पाळायले हवे. गरोदर काळात संप्रेरकांतील बदलांमुळे असिडिटी, छातीत जळजळ, गरोदर काळातील मधुमेह या त्रासांचा धोका जास्त असतो. त्यामुळे आपण काय खात आहोत याकडे विशेष लक्ष द्या. एकाचवेळी सर्व पदार्थ खाण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दिवाळीच्या काळात सगळीकडे तळलेले आणि गोड पदार्थ असतात त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात वापरा.
बाहेरचे किंवा गोड पदार्थ खाणे टाळा. दिवाळीच्या काळात चाटचा आस्वाद घ्यायचा असेल तर खाण्यापिण्याच्या स्वच्छतेबाबत लक्ष द्या. गरोदरकाळात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते कारण या काळात प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे बाहेरचे जेवण, पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती मिठाई आणि जेवणाला प्राधान्य द्या. मला खात्री आहे की, या काळात तुमची आई, घरातील जवळचे लोक तुम्हाला घरगुती फराळाचा आस्वाद नक्कीच देतील.
गरोदर काळात अल्कोहोलचे सेवन टाळायला हवे. त्यामुळे दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान अल्कोहोलचा समावेश असेल तर तुम्ही ते घेणे टाळा. तसेच कॅफिनच्या सेवनावरही नियंत्रण ठेवा. कॉफीच्या ऐवजी फळांचा रस, मिल्कशेक, लिंबू सरबत या पेयांचा समावेश करा.
गरोदर काळात निरोगी आहार, प्रथिने, जीनवसत्त्वे यांचा समावेश असलेल्या आहाराला प्राधान्य द्या. गरोदरकाळात आतापर्यंत जपलेले पथ्य दिवाळीच्या कारणाने मोडू देऊ नका. दिवाळीत आहाराची कशी काळजी घ्यावी याबाबत काही प्रश्न असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रश्न, शंका विचारण्यास संकोच करू नका. कारण हा आपल्या बाळाच्या वाढीत सर्वात महत्त्वाचा पैलू असतो.

सणासाठी तयार होताना...

दिवाळीत काय परिधान करावे आणि गर्भारपणाची काळजी - डॉ.वर्षाली माळी स्त्रीरोग तज्ज्ञ
दिवाळी हा असा सण जेव्हा आपण नवीन कपड्यांची खरेदी करतो आणि ते परिधान करून सणाचा आनंद लुटतो. सणाच्या काळात स्रिया विशेष वेशभूषा करण्याला प्राधान्य देतात. परंतु, गरोदर काळात ही वेशभूषा करताना स्वतःची गैरसोय होऊ देऊ नका. आपण गरोदर आहोत हे लक्षात ठेवून सैल,आरामदायी कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्या. सिंथेटिक, घट्ट कपडे घालणे टाळा कारण या कपड्यांना आग लवकर लागते. जड कपडे टाळून साधे कपडे परिधान करा. गरोदरपणात घट्ट कपड्यामुळे मोकळेपणाने वावरता येत नाही आणि त्यामुळे गैरसोय होऊ शकते. काही कपड्यांमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. त्यामुळे आपल्या सणाला साजेसे, पण साधे कपडे निवडा. सुती कपड्यांची निवड कधीही तुमच्यासाठी योग्य आणि आरामदायी ठरेल.
टिप :या सणाच्या निमित्ताने तुमचा पती खरेदी करेल. अशावेळी दिवाळीसाठी साधे परंतु, मोहक कपडे खरेदी करण्यास सांगा. ही दिवाळी तुमच्यासाठी खास असल्याने अशी सुंदर भेट यानिमित्ताने पतीकडून मिळेल .

परंपरा जपताना...

दिवाळी विधी आणि गरोदरपणाची काळजी - डॉ.वर्षाली माळी स्त्रीरोग तज्ज्ञ
दिवाळी सणात अनेक विधी, परंपरा जपल्या जातात. जसे की, लक्ष्मीपूजनाला पूजाविधी आणि दिव्यांची आरास, पाडवा आणि भाऊबीजेची पूजा या सर्व गोष्टी यामध्ये येतात. हे क्षण साजरे करण्यात काही गैरदेखील नाही, परंतु, गरोदर असताना या सर्व गोष्टींबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. गरोदर स्त्रीच्या पोटात बाळाची वाढ होत असल्याने पोटाचा घेर वाढलेला असतो आणि यामुळे हालचाल करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे हालचाल करण्यात अडचणी येत असतील तर दिवा पेटवणे, उचलणे किंवा खाली ठेवणे यासाठी वाकू नका. यावेळी ओटीपोटीवर दबाव येणार नाही अशा पद्धतीने हालचाल करा. कोणत्याही पूजा किंवा प्रार्थनेसाठी खाली बसणार असाल तर अशावेळी कुणाचातरी आधार घ्या. खुर्चीवर बसून पूजा केली तरीही चालेल. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेताना खाली वाकताना विशेष काळजी घ्या. खाली वाकण्यास त्रास होत असेल किंवा ओटीपोटाचा आकार वाढलेला असेल तर अशावेळी खाली वाकून नमस्कार करणे टाळा. तुम्ही गरोदर आहात आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो याची जाणीव वडिलधाऱ्या लोकांना असेल याची मला खात्री आहे. ज्यांना या मागील हेतू कळत नाही अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करा. तसेच या काळात कोणताही उपवास करू नका. जर तुम्ही जेवला नाहीत तर तुमच्या बाळालाही अन्न पुरवठा होणार नाही. यामुळे गरोदर असताना उपवास करणे टाळा व नियमित आहाराचे सेवन करा.

खरेदी आणि प्रवास

दिवाळी आणि गरोदरपणात खरेदी आणि प्रवास - डॉ. वर्षाली माळी स्त्रीरोगतज्ज्ञ
खरंतर खरेदी हा सगळ्यांचाच आवडता विषय आणि दिवाळीची खरेदी करण्यातली मजाही वेगळीच असते. परंतु, दिवाळीच्या काळात गरोदर स्त्रीसाठी खरेदी करताना विचार करायला हवा. खरेदीसाठी बाहेर पडताना सोबत कुणालातरी घेऊन जा. तुम्हाला कधी आधाराची किंवा मदतीची गरज भासू शकते अशावेळी सोबतची व्यक्ती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे खरेदीचे नियोजन करताना आपल्या पतीला विश्वासात घ्या. जर पतीला सोबत येण्यासाठी जमत नसेल तर जवळच्या एखाद्या मैत्रिणीला सोबत म्हणून बोलवा. तिलाही तुमच्यासाठी खरेदी करताना आनंद होईल.
पोटाचा आकार वाढल्याने कदाचित तुम्हाला जास्त वेळ चालणे, पायऱ्या चढणे किंवा बराच काळ एका ठिकाणी बसण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्याची जागा विचार करून निवडा. जेथे जास्त गर्दी नाही, आपल्या घरापासून जवळ असणारे आणि बऱ्यापैकी मोकळे असलेली जागा खरेदीसाठी निवडा. जर तुम्ही थकलात तर आसनव्यवस्था असलेली जागा तुम्हाला मदत करणारी ठरेल. गरोदरपणात बाहेरचे अन्न खाणे टाळायला हवे. तसेच गर्भशिशूला आणि तुम्हाला ऊर्जा मिळावी यासाठी अन्नही गरजेचे असते. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर जाताना खाद्यपदार्थ, पाणी या गोष्टी सोबत घेऊन जा.
जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करण्याचा विचार करीत असाल जसे की तुमचे मूळ गाव किंवा मित्राच्या गावी जात असाल तर प्रवासाआधी तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्ही किती महिन्याच्या गरोदर आहात त्यावर तुम्ही किती प्रवास करावा आणि कसा प्रवास याचा सल्ला त्या देतील. जर तुमची प्रसुतीची तारीख जवळची असेल तर आपण कोणत्याही वेळी प्रसूत होऊ शकतो याचा विचार करायला हवा. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना सर्वसमावेशक विचार करा.
या अशा काही टिप्स आहेत की ज्यामुळे दिवाळीचा सण अधिक आनंदी आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. आपले व गर्भशिशूचे जीवन निरोगी आणि आरामदायी राहण्यासाठीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच हे लक्षात घ्या की, उत्सव म्हणजे कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशी संवाद साधण्यासाठी उत्तम काळ असतो. त्यामुळे हा काळ तुम्हाला तणावमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठेवू शकतो. हा सण साजरा करताना त्यावर मर्यादा येऊ देऊन नका. कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्रित होऊन या सणाचा आनंद लुटा. योग्य ती काळजी घेऊन सर्वांसोबत आनंदाने हा वेळ घालवा. यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आणि गर्भशिशूला निरोगी बनवेल. लक्षात घ्या की, तुमच्यासाठी तुमचे बाळ सर्वात महत्त्वाचे आहे. बाळासाठी तुम्ही आनंदाचा प्राथमिक स्रोत आहात. जर तुम्हाला काही मदत किंवा काही सल्ला हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधा. मला प्रश्न विचारण्यासाठी संकोच करू नका.
दिपोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.वर्षाली माळी यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

नवीन आरोग्य सूचना मिळवायच्या आहेत?

सोशल मीडियावर फॉलो करा

डॉ. वर्षाली माळी या स्त्रीरोग, प्रसूती, मुलींचे प्रौढत्व आणि महिलांचे आरोग्य विषयांवर लिहितात. आम्ही आमच्या रूग्ण आणि समुदायामध्ये आरोग्य विषयक जागरूकता पसरवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो.
अपडेट राहण्यासाठी आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून शिक्षण, आरोग्य सूचना इत्यादी मिळवण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडियावर फॉलो करा - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय