डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
नसबंदी गर्भनिरोधक पद्धती - शुक्रवाहिनी बंदी आणि स्रीबीजवाहिनी बंदी

नसबंदी गर्भनिरोधक पद्धती - शुक्रवाहिनी बंदी आणि स्रीबीजवाहिनी बंदी

पद्धती | परिणामकारकता | फायदे व मर्यादा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

नसबंदी गर्भनिरोधक पद्धती - शुक्रवाहिनी बंदी आणि स्रीबीजवाहिनी बंदी
पुरुष आणि स्त्रीमधील नसबंदी पद्धती या कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धती आहेत, ज्या गर्भधारणा टाळण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. आपल्याला यापुढे मुल नको आहे किंवा भविष्यातदेखील याविषयी काही विचार न करण्याची खात्री असणाऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरते. एकदा नसबंदी केल्यानंतर ती पुन्हा खोलणे खूप कठीण असते. तसेच याची उलटप्रक्रिया करायचे ठरलेच तर ती खूप खर्चिक आणि बहुतांश वेळा यशस्वी होणे अशक्य असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नसबंदी पद्धती निवडण्यापूर्वी किंवा ठरवण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे, कोणती पद्धत तुम्हाला फायदेशीर ठरणारी आहे याबाबत तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ तुम्हाला मदत करू शकतील. तसेच गरजेनुसार कोणती गर्भनिरोधक पद्धती दीर्घकालासाठी योग्य आहेत याचेदेखील मार्गदर्शन करतील.
नसबंदीच्या अनेक पद्धती आहेत, त्या सर्व अंडवाहक नलिका अडविण्याचे काम करतात. जेव्हा शुक्राणू व स्रीबीजांचे मिलन होत नाही तेव्हा प्रजननदेखील होत नाही आणि यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. स्री आणि पुरुष दोघांमध्ये नसबंदी करता येते. स्त्रियांसाठी असलेल्या नसबंदीला ट्युबल लिगेशन म्हणजेच बीजवाहिन्या बांधणे असे म्हणतात तर पुरुषांसाठी असलेल्या नसबंदीला वेसेक्टोमी म्हणजेच वास डेफरेन्स नावाची शुक्रवाहिनी बंद करणे असे म्हणतात. गर्भधारणा रोखण्यासाठी या दोन्ही गर्भनिरोधक पद्धती ९९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी आहेत.
स्त्रीमधील नसबंदी आणि पुरुषामधील नसबंदी करण्याचा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असतो. याविषयी निर्णय घेताना किंवा विचार करताना आपला जोडीदार, पालक आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करा. या कार्यपद्धतींचा सामाजिक, भावनिक आणि शारीरिक परिणाम विचारात घ्या. नसबंदीची कोणतीही पद्धत ठरवताना त्यासाठी लागणारा खर्च, त्यातून बरे होण्यास लागणारा वेळ आणि भविष्यात या नसबंदीची उलटप्रक्रिया म्हणजे ती नस खोलता येते का या सर्व गोष्टींचा विचार करा. या लेखात आपण पुरुष नसबंदी आणि स्री नसबंदी या गर्भनिरोधक पद्धतींची संपूर्ण माहिती, त्यांचे फायदे आणि कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळावी हे जाणून घेणार आहोत.
पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया

पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया

पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया - प्रकार
प्रकार : कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धती
पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया - प्रभावी
प्रभावी : ९९%
पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : आयुष्यभर टिकणारी
पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया - लैंगिक आजारापासून संरक्षण
लैंगिक आजारापासून संरक्षण : नाही
पुरुष नसबंदी किंवा शुक्रवाहिनी बंद गर्भनिरोधक शस्रक्रिया
पुरुष नसबंदी ही कायम गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक पद्धत आहे. पुरुष नसबंदीमध्ये पुरुषांच्या अंडकोषातील शुक्राणू वाहून नेणारी लहान नलिका (त्वचेपासून तयार झालेली एक पिशवी जी २ भागांमध्ये विभागलेली असते ज्यात अंडकोष असते) कापली किंवा रोखली जाते. पुरुष नसबंदी प्रक्रिया अंत्यत सोपी असून सामान्यतः रुग्णालयात साधारण ३० मिनिटात पूर्ण होत असते.
पुरुष नसबंदी पद्धत शुक्राणूंना स्त्रीबीजामध्ये जाण्यापासून रोखून गर्भधारणा टाळते. शुक्राणू पुरुषांच्या अंडकोषात तयार केले जातात, त्यानंतर ते अंडकोष सोडून ‘वास डेफरन्स’ नावाच्या दोन नलिकांमधून प्रवास करतात. त्यानंतर शुक्राणू वीर्य तयार करण्यासाठी इतर द्रवपदार्थात मिसळतात. जेव्हा शूक्राणू असलेले वीर्य योनीमध्ये जाते, तेव्हा यामुळे गर्भधारणा होते. पुरुष नसबंदीच्या पद्धतींमध्ये डॉक्टर प्रत्येक वास डेफरन्स शुक्रवाहिनी बंद करतात किंवा कापतात. यामुळे शुक्राणूंचे वीर्यामध्ये मिश्रण होत नाही. शुक्रवाहिनी बंद केल्यानंतर पुरुषाच्या वीर्यामध्ये शूक्राणू नसतात. तुमचे अंडकोष शुक्राणू तयार करतात, परंतु ते वीर्यामध्ये मिसळत नाहीत. हे शुक्राणू शरीराद्वारे शोषले जातात. लैंगिक संबंधांदरम्यान तुमचे वीर्यस्खलन होते. परंतु, त्यात कोणतेही शुक्राणू नसल्याने स्रीबीजे फलित होत नाही आणि गर्भधारणादेखील होत नाही.
Vasectomy is one of the permanent contraception methods and super effective to avoid pregnancy. It is over 99% effective and it is very rare to cause pregnancy after vasectomy sterilization. After a vasectomy, it will take about 3 months for semen to become sperm-free. About 12 weeks after the procedure, the doctor will ask you to get a semen test done. If semen is sperm free, that's pretty much it, you don't have to do anything else and need not think more about how to avoid pregnancy. If you have a sex during these three months, you cannot rely only on vasectomy, you must use some other contraception methods to avoid pregnancy during this period.
पुरुष नसबंदी म्हणजेच शुक्रवाहिनी बंद करणे ही कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक असून गर्भधारणा टाळण्यासाठी अधिक प्रभावी पद्धत आहे. ही शस्रक्रिया ९९ टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरते आणि शुक्रवाहिनी बंद केल्यानंतर गर्भधारणा होणे फारच दुर्मिळ असते. शुक्रवाहिनी बंद केल्यानंतर वीर्य शुक्राणूमुक्त होण्यासाठी सुमारे तीन महिने लागतात. त्यामुळे शस्रक्रियेनंतर १२ आठवड्यांनी डॉक्टर तुम्हाला वीर्य चाचणी करण्यास सांगतात. जर, वीर्य शुक्राणू मुक्त असेल तर ही बाब उत्तम असते कारण तुम्हाला इतर काही उपाय करण्याची गरज भासत नाही. तसेच गर्भधारणा कशी टाळता येईल यासाठी वेगळा पर्याय शोधावा लागत नाही. परंतु, या तीन महिन्याच्या काळात लैंगिक संबंध ठेवताना तुम्ही केवळ नसबंदीवर अवलंबून राहू शकत नाहीत. या काळात गर्भधारणा होऊ नये यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.
पुरुष नसबंदी शस्रक्रियेचे दोन मार्ग आहेत. एक चीर पद्धत आणि दुसरी विना-चीर पद्धत. या दोन्ही नसबंदी प्रक्रियांमध्ये तुमच्या अंडकोषांना सुन्न करण्यासाठी शस्रक्रियेच्या जागी भूल दिली जाते. त्यामुळे शस्रक्रियेवेळी वेदना जाणवत नाहीत. चीर पद्धतीत डॉक्टर तुमच्या अंडकोषाच्या त्वचेवर छेद करतात आणि या छोट्या छेदाद्वारे शुक्राणू वाहून नेणाऱ्या वाहिन्या बंद केल्या जातात. काही वेळा या वाहिन्या बांधल्या जातात. शस्रक्रियेच्या चिमट्याद्वारे त्या रोखल्या जातात किंवा विद्युत प्रवाहाने बंद केल्या जातात. कधीकधी प्रत्येक नळीचा छोटासा भाग काढून टाकला जातो. विना-चीर पद्धतीत, डॉक्टर आपल्या अंडकोषाच्या त्वचेवर एक लहान छिद्र (पंक्चर) पाडतात. त्यानंतर शुक्रवाहिन्या बांधल्या जातात किंवा बंद केल्या जातात. छोटे छिद्र लवकर भरते. तसेच शस्रक्रिया केलेल्या जागी टाकेदेखील टाकले जात नाहीत आणि त्याचे डागदेखील पडत नाहीत.
पुरुष शुक्रवाहिनी बंदी ही कमी वेळात होणारी शस्रक्रिया आहे आणि यानंतर तुम्ही लगेच घरीदेखील जाऊ शकतात. शस्रक्रियेनंतर काही काळ अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु त्या जास्त दुखावणाऱ्या नसतात. तसेच एखादी छोटी जखम किंवा शस्त्रक्रिया केलेल्या जागी काही दिवस सूज येऊ शकते. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे किंवा घट्ट अंतर्वस्रे, व्यायामासाठी वापरले जाणारे कपडे तुम्ही परिधान करू शकता. यामुळे अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल. पुरुष नसबंदीनंतर साधारणपणे एक आठवडाभर कोणतेही जड शारीरिक काम किंवा व्यायाम न करण्याचा सल्ला देण्यात येतो. नसबंदी शस्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचे प्रमाण फार दुर्मिळ असते. ताप येणे, शस्रक्रिया केलेल्या जागी रक्त किंवा पू येणे, अंडकोष क्षेत्रात खूप वेदना किंवा सूज जाणवणे असे काही घडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. बहुतेक पुरुषांना फक्त दोन दिवसांच्या विश्रांतीची आवश्यकता असते. परंतु, जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी शारीरिक श्रमाचे काम जास्त असले तर, त्या कामातून साधारण एक आठवड्याची सुट्टी घेण्याचा सल्ला दिला जातो. शस्रक्रियेच्या दोन दिवसानंतर तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता, परंतु सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे लक्षात ठेवायला हवे. तसेच हे लक्षात ठेवा की पुरुष नसबंदी लैंगिक आजारांपासून संरक्षण करीत नाही. त्यामुळे लैंगिक आजार टाळण्यासाठी तुम्हाला नेहमीच कंडोमसारख्या इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.
फायदे
गर्भधारणेचा प्रश्न कसा टाळता येईल यासाठी कायमचा उपाय हवा असेल तर नसबंदी हे उत्तम उत्तर आहे. पुरुष नसबंदी ही कायम गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक आहे आणि गर्भधारणा रोखण्यासाठी सर्वात प्रभावीदेखील आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी हा उपाय ९९ टक्क्यांहून अधिक जास्त प्रभावी असतो आणि लैंगिक संबंधांपूर्वी किंवा त्यानंतर त्याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही. हा उपाय गर्भधारणा टाळण्याची हमी देतो तसेच लैंगिक संबंधात व्यत्ययदेखील आणत नाही. हा कायमस्वरुपी उपाय असल्याने मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन गर्भनिरोधक खरेदी करण्याची गरज भासत नाही किंवा कोणतीही तारीख, वेळ, प्रक्रिया लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच लैंगिक संबंधांदरम्यान किंवा नंतर कोणतीही गोळी किंवा गर्भनिरोधक वापरण्याची आवश्यकता नसते. तसेच या पद्धतीमध्ये शरीरात कोणत्याच प्रकारचे संप्रेरक सोडले जात नसल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत. पुरुषांमधील नसबंदी ही स्त्रियांमधील नसबंदीपेक्षा सोपी आणि सुरक्षित असल्याने अधिक विश्वासार्ह पद्धत ठरते.
तोटे
पुरुष नसबंदी ही कायमस्वपरुपी गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक पद्धत आहे. त्यामुळे नसबंदीनंतर तुमची प्रजननक्षमता कधीही परत येऊ शकत नाही. जर तुम्हाला पुन्हा कधी वडील व्हायचे असेल, तर त्यासाठी करावी लागणारी उलट प्रक्रिया खूप गुंतागुंतीची किंवा खर्चिक असते. नसबंदीनंतर भविष्यात तुम्ही कधीही कुणालाही गर्भवती करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला भविष्यात मूल नको आहे याची खात्री असल्यावरच पुरुष नसबंदीचा पर्यायाचा विचार करायला हवा. पुरुष नसबंदी प्रभावी होण्यासाठी सुमारे १२ आठवडे म्हणजेच तीन महिन्यांचा कालावधी लागतो. याकाळात गर्भधारणा टाळण्यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते. कधीकधी पुरुष नसबंदी प्रक्रियेमुळे संसर्ग होऊ शकतो, परंतु हे सहसा किरकोळ औषधोपचारांनी बरे होऊ शकते. तसेच शस्रक्रियेनंतर तुम्हाला काही काळ वेदना, रक्तस्राव, जखम किंवा सूज या गोष्टी जाणवू शकतात. हा सर्व त्रास काही आठवड्यांतर दूर व्हायला हवा, असे झाले नाही तर कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरुष नसबंदी गर्भनिरोधक पद्धत लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण करत नाही. लैंगिक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कायम कंडोमसारख्या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.
महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती

महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती

महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धती
महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९९%
महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : आयुष्यात एकदाच
महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
महिला नसबंदी किंवा स्रीबीजवाहिनी बंदी गर्भनिरोधक पद्धती
स्री नसबंदी ही कायम गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक आहे आणि तिला ट्युबल लिगेशन म्हणजेच बीजवाहिनी बंदी म्हणून संबोधले जाते. बीजवाहिनी बंदी ही एक शस्रक्रिया आहे ज्यामध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्या अंडवाहक नलिका चिरल्या जातात, बांधल्या जातात किंवा कायमच्या रोखल्या जातात. ट्युबल लिगेशनला नळ्या बांधणे असेही म्हटले जाते विवाहित दाम्पत्यामध्ये ही शस्रक्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वाधिक वापरली जाते.
दर महिन्याला, आपल्या अंडाशयातून अंडी बाहेर सोडली जातात यालाच ओव्हुलेशन असे म्हणतात. अंडवाहक नलिका (फॅलोपियन ट्युब) ही अंडी अंडाशयापासून गर्भाशयात घेऊन जाते. यानंतर ही अंडी शुक्राणू येण्यासाठी आणि अंड्याचे फलन होण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करतात. जेव्हा एखादी शुक्राणू पेशी एखाद्या अंड्यात मिसळते तेव्हा गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण होते. स्त्रीमधील नसबंदीनंतर हे अंडे वाहून नेणारी अंडवाहक नलिका स्रीबीजांना अंडाशयातून गर्भाशयात जाऊ देणे बंद करते. ही वाहिनी एकदा बंद केल्यानंतर शुक्राणू स्रीबीजांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि गर्भधारणा होऊ शकत नाही.
स्री नसबंदीच्या अनेक पद्धती आहेत. बीजवाहिनी बंदी प्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये अंडवाहक नलिकेचा छोटा तुकडा काढून टाकणे, नलिका बंद करणे किंवा तेथे चिमटा बसवणे या प्रक्रियेचा वापर केला जातो. चीर पद्धतीमध्ये अंडवाहक नलिकेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या पोटावरील त्वचा थोडी कापण्यात येते. यामध्ये लॅप्रोस्कोपी आणि मिनी लेप्रोटोमी या दोन मुख्य चीर पद्धती वापरल्या जातात. योनी आणि गर्भाशयाच्या शेवटच्या भागाद्वारे विना-चीर नसबंदी केली जाते. विना-चीर नसबंदी शस्रक्रियेदरम्यान, डॉक्टर आपल्या प्रत्येक अंडवाहक नलिकेमध्ये एक लहान गुंडाळी ठेवतात. कालांतराने या गुंडाळीभोवती नैसर्गिकरित्या ऊती (टिश्युज) वाढतात आणि अंडवाहक नलिका बंद होते. या प्रकारच्या शस्रक्रियेनंतर महिला लवकर बऱ्या होतात. तसेच त्याच दिवशी आपले दैनंदिन काम किंवा नोकरीवर रुजू होऊ शकतात. जर चीर पद्धतीने नसबंदी केली गेली तर त्यातून बरे होण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. तसेच पुढील आठवडाभर कोणतेही शारीरिक काम टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
बीजवाहिनी बंदी ही कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धत आहे. गर्भधारणा टाळण्यासाठी ही ९९ टक्क्यांहून अधिक प्रभावी पद्धत असून अशाप्रकारच्या गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केलेल्या १०० महिलांपैकी केवळ १ पेक्षा कमी महिला गर्भवती होते. स्री नसबंदीच्या पद्धती अधिक प्रभावी असून त्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नसते. ही पद्धत गर्भधारणा होऊ नये यासाठी कायम फायदेशीर ठरते. या प्रक्रियेमुळे लैंगिक संबंधांवेळी एखादी गर्भनिरोधक पद्धत न वापरल्यासदेखील चिंतेचे कारण उरत नाही. बीजवाहिनी बंदीमुळे गर्भधारणा टाळण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. विना-चीर नसबंदी प्रक्रियेत गर्भधारणा रोखण्याची सुरुवात साधारण तीन महिन्यानंतर होते. त्यामुळेच या काळात लैंगिक संबंध ठेवताना इतर गर्भनिरोधक पद्धतींचा पर्याय वापरावा. या शस्रक्रियेनंतर काही दिवसांनी डॉक्टर तपासणी करतात आणि गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी देतात. बीजवाहिनी बंदी लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. त्यामुळे लैंगिक आजार टाळण्यासाठी कायम कंडोमसारख्या सुरक्षित गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
बीजवाहिन्या बंद करणे किंवा स्त्री नसबंदी करणे ही एक सुरक्षित वैद्यकीय प्रक्रिया आहे. नसबंदीनंतर कोणतीही गंभीर समस्या उद्भवणे हे फार क्वचित घडते. शस्रक्रिया केलेल्या जागी पुरळ उटणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, पोटात सतत तीव्र वेदना होणे, योनीतून स्राव होणे आणि वास येणे, शस्रक्रिया केलेल्या जागी रक्तस्राव होणे असा काही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नसबंदी केल्यानंतर अंडवाहक नलिका पुन्हा जोडल्या जाणे किंवा खुल्या होणे हे फार क्वचित होते. परंतु, या नलिका खुल्या झाल्या तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. नसबंदीनंतर गर्भधारणा झाल्यास तुमच्या अंडवाहक नलिकेमध्ये गर्भधारणा विकसित होऊ शकते. ज्याला एक्टोपिक गर्भधारणा म्हणजेच गर्भाशयाचे मूळ स्थान सोडून होणारी गर्भधारणा म्हणतात. एक्टोपिक गर्भधारणा धोकादायक असते. त्यामुळे नसबंदीनंतर गर्भधारणा झाल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. स्री नसबंदी कायमची प्रक्रिया असून तिची उलटप्रक्रिया करणे जवळजवळ अशक्य असते. काही प्रकरणांमध्ये ही नसबंदी खोलली जाऊ शकते, परंतु त्यानंतर ती कितपत कार्य करते हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. नसबंदी करताना वापरली गेलेली पद्धत यासाठी सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे स्री नसबंदी करण्याचा विचार हा सर्वसमावेशक असावा. भविष्यात आपल्याला मूल नको असेल आणि याविषयी पूर्णपणे खात्री असेल तरंच नसबंदी करावी. त्यामुळे कायमस्वरुपी नसबंदी करण्याआधी इतर दीर्घकाळ टिकणाऱ्या गर्भनिरोधक पद्धतींचादेखील अभ्यास करावा आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या गर्भनिरोधक पद्धतीचा आवश्यकता आहे यावरून पुढील निर्णय निश्चत करा.
फायदे
स्री नसबंदी किंवा बीजवाहिनी बंद करणे ही प्रक्रिया कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक आहे. ही पद्धत गर्भधारणा रोखण्यासाठी सर्वाधिक प्रभावी ठरते. तसेच लैंगिक संबंधांपूर्वी किंवा त्यानंतर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरजदेखील भासत नाही. स्त्री नसबंदी गर्भनिरोधक पद्धत लैंगिक संबंधांमध्ये व्यत्यय निर्माण करत नाही. तसेच गर्भधारणा टाळण्यात सर्वाधिक प्रभावी ठरते. स्री नसबंदी ही संप्रेरक न वापरता केली जाणारी प्रक्रिया असल्याने त्याचे शरीरावर विपरित परिणाम होत नाहीत. तुम्ही एखादा वैद्यकीय उपचार घेत असल्यास आणि संप्रेरकांवर आधारित गर्भनिरोधक पद्धत वापरू शकत नसल्यास ही पद्धत सर्वाधिक सुरक्षित ठरते.
तोटे
स्री नसबंदी किंवा बीजवाहिनी बंदी शस्त्रक्रिया ही कायमस्वरुपी गर्भनिरोधक प्रक्रिया असून ही शस्रक्रिया केल्यानंतर तुमची प्रजनन क्षमता परत येऊ शकत नाही. तुम्ही कधीही गर्भवती होऊ इच्छित असल्यास नसबंदीची उलट प्रक्रिया करणे खूप कठीण आणि खर्चिक असते. त्यामुळे ही शस्रक्रिया करण्याआधी आपल्याला भविष्यात कधीही मूल नको आहे याचा खात्रीपूर्वक विचार करायला हवा. गर्भधारणा कशी टाळता येईल यासाठी तुम्ही विचार करत असाल तर इतर दीर्घकालीन गर्भनिरोधक पद्धतीदेखील उपलब्ध आहेत. या पद्धतीचा एकदा वापर केल्यानंतर त्याकडे नव्याने लक्ष देण्याची गरज भासत नाही. आययुडीसारख्या दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. आपल्याला आवश्यक असलेल्या गर्भनिरोधक पद्धतीबद्दल डॉक्टरांसोबत चर्चा करा. ते तुम्हाला नसबंदी आणि इतर गर्भनिरोधक पद्धतींबद्दल मार्गदर्शन करतील. कधीकधी, स्री नसबंदी प्रक्रियेमुळे संसर्ग होऊ शकतो, परंतु तो किरकोळ औषधोपचारांनी बरा होतो. त्याच चिंता करण्यासारखे कारण नसते. नसबंदी केल्यानंतर दिसणारे दुष्परिणाम काही आठवड्यांतच बरे होणे गरजेचे असते, असे न झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्री नसबंदी गर्भनिरोधक पद्धत लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण करत नाही. त्यामुळेच लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोमसारख्या इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.
गर्भधारणेचा प्रश्न कसा टाळावा यासाठी नसबंदी हे एक अतिशय प्रभावी आणि कायमचे उत्तर आहे. अनेक विवाहित दाम्पत्ये स्री-पुरुष नसबंदीच्या पद्धतींपैकी स्री नसबंदी या पद्धतीचा अधिक प्रमाणात अवलंब करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी नसबंदी पद्धत ९९ टक्क्यांहून अधिक प्रभावी असते. या विश्वासार्हतेचे मुख्य कारण म्हणजे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागत नाही. एकदा नसंबदी प्रक्रिया पूर्ण झाली की, गर्भधारणा कशी टाळावी याबद्दल वेगळा विचार करण्याची आवश्यकता नसते.
नसबंदीच्या सर्व पद्धतींमध्ये अंडवाहक नलिका बंद केली जाते. स्री अंडवाहक नलिका अंडाशयापासून गर्भाशयात स्रीबीज पोहोचवण्याचे काम करतात तर पुरुष अंडवाहक नलिका शुक्राणू पोहोचवण्याचे काम करतात. हे शुक्राणू द्रवपदार्थात मिसळून वीर्य तयार करतात. नसबंदी प्रक्रियेत या अंडवाहक नळ्या कापल्या जातात, बांधल्या जातात किंवा बंद केल्या जातात. यामुळे अंडी आणि शक्राणू एकत्र येण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने गर्भधारण होऊ शकत नाही. नसबंदीच्या या पद्धती कायमस्वरुपी असतात. तर, त्यांची उलटप्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया कठीण, क्लिष्ट आणि खर्चिक असते. यासाठी पर्याय म्हणून तुम्हाला इतर दीर्घकालीन गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करता येतो. ज्या पद्धतींमुळे लैंगिक संबंधांमध्ये व्यत्यय येत नाही आणि तुमची प्रजनन क्षमतादेखील कायम राहते. भविष्यात कधी तुम्हाला मूल हवे असेल तर दीर्घकालीन गर्भनिरोधक पद्धती थांबवून तुम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करू शकता.
नसबंदी करणे हा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय असतो. भविष्यात मूल नको असल्यास दाम्पत्य या पद्धतीचा विचार करतात. परंतु, हा निर्णय घेताना सर्वसमावेशक विचार व्हायला हवा. आपल्या जोडीदाराशी, पालकांशी आणि कुटुंबातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींशी याबाबत अवश्य चर्चा करा. हा त्या दाम्पत्याचा निर्णय असला तरीही आपल्याबद्दल काळजी करणाऱ्या वडीलधाऱ्या आणि जवळच्या व्यक्तींशी याबाबत सल्लामसलत अवश्य करा. नसबंदी करण्याचा एखाद्या स्री किंवा पुरुषाचा निर्णय ही तिची किंवा त्याची निवड असणे आवश्यक आहे. कुटुंबीय, जोडीदार किंवा इतर कुणीही त्याबाबत सक्ती करू शकत नाही. आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याआधी डॉक्टरांशीदेखील चर्चा अवश्य करा. ते तुम्हाला गर्भधारणा कशी टाळावी, कुटुंब नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन करतील.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय