डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
दीर्घकालीन प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी)
दीर्घकालीन प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी)

दीर्घकालीन प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी) च्या सहाय्याने गर्भधारणा कशी टाळावी

पद्धती | परिणामकारकता | फायदे व मर्यादा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

दीर्घकालीन प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी)
दीर्घकालीन प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी पद्धती) प्रभावी आणि विश्वसनीय गर्भनिरोधक पद्धती असून यामुळे गर्भधारणा जास्त काळासाठी पुढे ढकलणे शक्य होते. तुम्हाला मूल हवे असल्यास ही गर्भनिरोधक पद्धती प्रतिवर्ती म्हणजेच उलटप्रक्रिया करून प्रजननक्षमता परत मिळवून देते. या पद्धतीची प्रतिवर्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रजननक्षमतादेखील वेगाने परत येण्यास सुरुवात होते. सर्व गर्भनिरोधक पद्धतींपैकी ही पद्धती कुटुंब नियोजनासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते. या पद्धती इतक्या लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे यामध्ये लैंगिक संबंधाआधी, त्यादरम्यान किंवा त्यानंतर ही पद्धती वापरणे लक्षात ठेवावे लागत नाही. तसेच गर्भधारणा रोखण्यासाठी इतर कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक नसते. कुटुंब नियोजनाच्या बाबतीत या पद्धतींमुळे स्वातंत्र्य आणि मनःशांती मिळते.
अंतर्गर्भीय उपकरण (कॉपर टी) ही एलएआरसी पद्धतींपैकी सर्वाधिक पसंती दिली जाणारी पद्धती आहे. पण या व्यतिरिक्त काही चिंतामुक्त करणाऱ्या एलएआरसी पद्धती उपलब्ध असून त्यादेखील गर्भधारणा टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पद्धतींमध्ये अंतर्गर्भीय प्रणाली, संप्रेरक कॉइल, गर्भनिरोधक इंजेक्शन आणि गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) यांचा समावेश आहे. गर्भधारणा रोखण्यासाठी एलएआरसी पद्धती ९९ टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असते. म्हणजेच या पद्धतीचा वापर करून केवळ १ टक्के स्रिया गर्भवती होण्याची शक्यता असते. या पद्धती कधी व किती कालावधीसाठी संरक्षण देतात याची माहिती जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
या लेखात चारही दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धतींविषयी माहिती, त्या किती प्रभावीपणे कार्य करतात आणि गर्भधारणा टाळण्यासाठी किती उपयुक्त आहेत याविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती

अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित गर्भनिरोधक पद्धती

अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९९%
अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : पाच ते दहा वर्षे
अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / संप्रेरकविरहित दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
अंतर्गर्भीय (इन्ट्रायुटेरिन) उपकरण हे लवचिक प्लास्टिक आणि तांब्याच्या एका छोट्याशा तुकड्यापासून तयार केलेले असते. ज्यामध्ये प्लास्टिकच्या तुकड्याभोवती तांब्याच्या तार किंवा दोरी गुंडाळलेली असते आणि एका बाजूच्या टोकाला आडव्या दिशेने दोन धागे असतात. त्यामुळे या उपकरणाचा आकार इंग्रजीतील टी या अक्षरासारखा दिसतो. म्हणूनच या अंतर्गर्भीय गर्भनिरोधक उपकरणाला (आययूडी किंवा आयसीडी), गर्भनिरोधक कॉइल किंवा कॉपर टी असे म्हणून ओळखले जाते. आययूडी म्हणजेच कॉपर टीचे विविध प्रकार असून ते मुख्यतः तांबे आणि पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या संख्येच्या आधारे विभागले जातात. अंतर्गर्भीय गर्भनिरोधक पद्धती ही कुटुंब नियोजनसाठी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते. हे उपकरण दीर्घकाळ टिकणारे आणि गरज पडल्यास काढता येणारे असून गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वाधिक प्रभावी ठरते. या गर्भनिरोधक उपकरणामुळे तुमचे खासगी जीवन चिंतामुक्त होते. या उपकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी इतर कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतीचा आधार घ्यावा लागत नाही. तसेच त्यासाठी वेगळे कष्टदेखील घ्यावे लागत नाहीत. त्यामुळेच या उपकरणाला चिंतामुक्त ठेवणारी गर्भनिरोधक पद्धती असेही संबोधले जाते. हे गर्भनिरोधक उपकरण दीर्घकाळानंतर काढले तरीही तुमची प्रजननक्षमता सामान्य स्थितीत येते, तीदेखील जास्त वेळ न घेता.
कॉपर टी तुमच्या गर्भाशयात टाकली जाते आणि गर्भाशय ग्रीवातून आत गेल्यानंतर बाजूला असलेल्या दोन धाग्यांनी योनीच्या वरच्या भागात लटकते. हे तांबे आयन सोडते आणि गर्भाशय, अंडवाहक नलिकेच्या आतील द्रव पदार्थ बदलण्यास सुरुवात करते. जेणेकरून तेथे शुक्राणूंचे अस्तित्व टिकणे कठीण होते. ही कॉपर टी शुक्राणूंना स्रीबीजांपर्यंत जाण्यास रोखत असली तरीही काहीवेळा शुक्राणू स्रीबीजांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे स्रीबीज फलित होऊ शकते. अशा परिस्थितीत आययूडी स्रीबीजांना गर्भाशयाच्या अस्तराला जोडण्यापासून थांबवते आणि गर्भधारणा रोखण्यास मदत करते.
कॉपर टी ही गर्भनिरोधक पद्धती सर्वाधिक प्रभावी असून तिची परिणामकारकता ९९ टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच कॉपर टी गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करणाऱ्या १०० स्त्रियांपैकी केवळ १ स्री गर्भवती होण्याची शक्यता असते. ही पद्धती सर्वाधिक प्रभावी आहे, कारण यासाठी कोणताही सराव करावा लागत नाही किंवा ती योग्यरित्या वापरण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. ही गर्भनिरोधक पद्धती केवळ एकाच बाबतीत कमी पडते ते म्हणजे या पद्धतीत लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळत नाही. त्यामुळे फक्त लैंगिक आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला कंडोम वापरणे अत्यंत गरजेचे असते. तसेच आययूडीचा वापर करण्याचा विचार करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेदेखील आवश्यक आहे.
आययूडी किंवा कॉपर टी स्त्रियांसाठी पूर्णपणे सुरक्षित अशी गर्भनिरोधक पद्धती आहे. मात्र, काही क्वचित स्त्रियांमध्ये याचे दुष्परिणाम दिसतात किंवा त्यांच्यासाठी ही पद्धत अडचणीची होते. ज्या स्रियांना गर्भाशय ग्रीवा किंवा गर्भाशयाचा कर्करोग, लैंगिक आजार आहे त्यांच्यासाठी आययूडी वापरणे सुरक्षित नसते. कारण यामुळे ओटीपोटात संसर्ग किंवा तांब्याची अलर्जी होण्याची शक्यता असते. आययूडी आपल्यासाठी सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. आययूडी वापरताना गर्भवती होणे फार दुर्मिळ आहे, परंतु असे झाल्यास किंवा गर्भधारणा झाली असल्याची खात्री होताच कॉपर टी काढून टाका. कारण गर्भाशयाजवळ आययूडी असल्यास एक्टोपिक म्हणजे गर्भधारणेचे मूळ स्थान सोडून होणारी गर्भधारणा किंवा आरोग्याच्या इतर काही समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच आययूडी वापरत असताना तुम्ही गर्भवती झालात तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधणे आवश्यक असते.
फायदे
गर्भधारणा टाळण्यासाठी आययूडी किंवा कॉपर टी गर्भनिरोधक पद्धती अतिशय प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. एकदा हे उपकरण शरीरात टाकले की गर्भधारणा टाळण्याविषयी जास्त विचार करण्याची गरज भासत नाही. ही कॉपर टी शरीरात टाकली की, तुम्ही चिंतामुक्त जीवन जगू शकता. ही पद्धती कधी वापरायची, कशी वापरायची, ती पूर्णपणे प्रभावी ठरण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत किंवा वेळही द्यावा लागत नाही. इतर गर्भनिरोधक पद्धतींपैकी ही सर्वात चिंतामुक्त ठेवणारी पद्धती आहे. कॉपर टी सहजपणे काढता येते आणि यामुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. तसचे गर्भधारणा होण्यास काहीच अडसर येत नाही. कॉपर टी काढल्यानंतर काही दिवसांतच तुमची प्रजननक्षमता सामान्य स्थितीत येण्यास सुरुवात होते. या गर्भनिरोधक पद्धतीत कोणतेही संप्रेरक वापरलेले नसल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाही. इतर गर्भनिरोधक पद्धतींच्या तुलनेत आययूडी किंवा कॉपर टी ही उपकरणे गर्भधारणा टाळण्यासाठी अधिक काळ संरक्षण देतात. त्यामुळे ही गर्भनिरोधक पद्धती खूप किफायतशीर आहे. आययूडीचा वापर आपात्कालिन गर्भनिरोधक म्हणूनदेखील करता येतो. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यानंतर १२० तासांच्या आत कॉपर टी शरीरात बसवल्यास गर्भधारणा रोखण्यासाठी ९९ टक्के प्रभावी आहे.
तोटे
फार क्वचित स्रियांना कॉपर टीचा वापर करण्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. योनीमार्गात आययूडी टाकल्यानंतर काहींना वेदना, पेटके, पाठदुखी, अधूनमधून हलका रक्तस्राव, अनियमित मासिक पाळी, अतिरक्तस्राव यांसारखा त्रास होऊ शकतो. हे सर्व दुष्परिणाम काही दिवसांमध्ये कमी होतात. या वेदना कमी करण्यासाठी काही औषधे तुम्ही घेऊ शकता. हा त्रास किंवा या वेदना अधिक काळ राहिल्यास आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी. डॉक्टर तुमचा त्रास समजावून घेऊन इतर गर्भनिरोधक पद्धतींची माहिती देतील. तसेच आययूडी गर्भनिरोधक पद्धतीऐवजी तुम्हाला सहन होईल, तुमची गरज पूर्ण करेल अशी दुसरी पद्धती सुचवतील. तसेच कुटुंब नियोजन आणि गर्भधारणा टाळण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन करतील. कॉपर टी गर्भनिरोधक पद्धतीमध्ये एकमेव मर्यादा आहे ती म्हणजे ही पद्धती लैंगिक आजारापासून संरक्षण देत नाही. त्यामुळे लैंगिक आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोम या गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करावा.
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती

संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस)

संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९९%
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : ३ ते ५ वर्षे
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरण (आययूडी) / अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
संप्रेरक अंतर्गर्भीय उपकरणाला (आययूडी) अंतर्गर्भीय प्रणाली (आययूएस) म्हणून देखील संबोधले जाते. हे लहान आकाराचे लवचिक असे प्लास्टिकचे उपकरण असते, ज्याचा आकार इंग्रजीतील टी अक्षरासारखा असतो. यात प्रोजेस्टोजेन संप्रेरकाने भरलेली एक डबी असते. ज्यातून हळूहळू हे संप्रेरक गर्भाशयात सोडले जाते. एका टोकाला जोडलेले दोन धागे गर्भाशय ग्रीवेतून बाहेर पडतात आणि योनीमार्गात अडकतात. हे धागे उपकरण त्याच्या जागेवर आहे की नाही हे तपासण्यासाठी मदत करतात आणि गरज पडल्यास हे उपकरण सहजपणे काढून टाकण्यासाठी वापरले जातात. हे धागे किंवा उपकरण शरीराबाहेर दिसत नाहीत. तसेच लैंगिक संबंधांदरम्यान आपल्या जोडीदारास त्याचे अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे या गर्भनिरोधक उपकरणाचा लैंगिक संबंधामध्ये व्यत्यय येत नाही.
इन्ट्रायुटेरिन सिस्टीम आययूडीसारखी आहे, परंतु गर्भधारणा रोखण्यासाठी ही सिस्टीम तांबे आयन सोडण्याऐवजी प्रोजेस्टोजेन संप्रेरक सोडते. हे प्रोजेस्टोजेन संप्रेरक अंडाशयाद्वारे सोडलेल्या नैसर्गिक संप्रेरकांसारखेच असतात. हे संप्रेरक गर्भाशयाच्या प्रवेशद्वारावरील श्लेष्मा म्हणजेच चिकट द्रव दाट करतात. ज्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजांपर्यंत पोहोचणे कठीण होते. एखादवेळी जर काही शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचले तर हे संप्रेरक गर्भाशयाचे अस्तर पातळ करून स्रीबीजाची वाढ रोखतात. तर कधीकधी काही स्त्रियांमध्ये आययूएस अंडाशयातून स्रीबीज बाहेर सोडणे म्हणजे ओव्हुलेशनची प्रक्रियादेखील थांबवते.
गर्भधारणा टाळण्यासाठी आययूएस ही एक अतिशय प्रभावी गर्भनिरोधक पद्धती आहे. ही पद्धती ९९ टक्के यशस्वी होते. १०० स्त्रियांमधून १ स्री गर्भवती होण्याची शक्यता यात असते. या पद्धतीचे बहुतांश फायदे कॉपर टी म्हणजेच आययूडीसारखेच आहेत. तर आययूएस ही पद्धतदेखील दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती करता येण्यासारखी आहे. आययूएस गर्भनिरोधक पद्धती मासिक पाळीतील त्रास कमी करते. तसेच साधारण वर्षभर ही पद्धत वापरल्यानंतर तुमची मासिक पाळीदेखील थांबू होऊ शकते.
आययूएस शरीरात बसवणे क्लिष्ट प्रक्रिया नाही. त्यासाठी फार कमी वेळ लागतो. तुम्ही गर्भवती नसल्यास तुमच्या मासिक पाळीदरम्यान हे उपकरण कोणत्याही वेळी शरीरात बसवता येते. हे उपकरण शरीरात बसवण्याआधी योनीमार्गाची स्थिती सामान्य आहे की नाही याची तपासणी डॉक्टर करतात. तसेच गर्भाशयाचा आकार आणि त्यात कुठला संसर्ग झालेला नाही ना याचीदेखील पाहणी त्यांच्याद्वारे केली जाते. जर सर्व परिस्थिती सामान्य असेल तर ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वीस ते तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. आययूएस बसविल्यानंतर जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, ओटीपोटात दुखत असेल, ताप येत असेल, योनीतून दुर्गंधीयुक्त स्राव होत असेल तर तुम्हाला संसर्ग झालेला असू शकतो. अशावेळी पुढील तपासणीसाठी किंवा आययूएस काढून टाकण्यासाठी त्वरित आपल्या डॉक्टरांची भेट घ्या. बहुतांश स्रिया आययूएस सहजपणे वापरू शकतात. परंतु, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग, यकृताचे आजार, धमन्यांचे आजार किंवा हृदयरोग, ओटीपोटात संसर्ग किंवा लैंगिक आजारासाठी उपचार घेतलेल्या स्रिया आययूएस गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करू शकत नाहीत. आययूएस गर्भनिरोधक पद्धती आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी चर्चा करा. ते तुम्हाला योग्य असलेली गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचा सल्ला देतील. तसेच तुमच्या गरजेनुसार आणि शरीराला मानवणारी गर्भनिरोधक वापरून गर्भधारणा कशी टाळावी आणि कुटुंब नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शक करतील.
फायदे
ही एक दीर्घकालीन व प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. ही पद्धती तीन ते पाच वर्षे कार्य करते. इतर कोणत्याही औषधांचा या पद्धतीवर परिणाम होत नाही. आययूडीसारखेच फायदे देण्याबरोबर या गर्भनिरोधक पद्धतीमुळे मासिक पाळीतील वेदना, रक्तस्राव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमुळे मासिक पाळी पूर्णपणे थांबूदेखील शकते. तसेच तुम्ही बाळाला स्तनपान करीत असलात तरीही आययूएस ही पद्धती वापरणे सुरक्षित असते.
तोटे
आययूएस प्रक्रियेमुळे काहींना अस्वस्थ वाटू शकते. तसेच मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा पूर्णतः बंददेखील होऊ शकते. त्यामुळे काही स्त्रियांसाठी हे योग्य ठरत नाही. आययूएस बसविल्यानंतर काही स्रियांना डोकेदुखी, मुरुम, स्तन कोमल होणे, मूड स्विंग्ज होणे यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. आययूएस गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देण्यात मदत करत नाही. त्यामुळे लैंगिक आजारापासून संरक्षण होण्यासाठी कंडोम वापरणे आवश्यक असते. काही स्रियांना योनीमधून अनियमित रक्तस्राव किंवा हलका रक्तस्राव होऊ शकतो. सुरुवातीचे सहा महिने हा त्रास होण्याचा अंदाज असतो. काही स्रियांना संप्रेरकांचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी व त्यानंतर ही पद्धत वापरावी की नाही याबद्दल सल्ला घ्यावा. तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी आणखी काही उपाय करता येईल याची माहिती घ्यावी.
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती

गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट)

गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : दीर्घकालीन व प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती (एलएआरसी)
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९९%
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : ४ वर्षे
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
टीप: गर्भनिरोधक इम्प्लांट बहुतेक भारतात उपलब्ध नाही. जर तुम्ही गर्भनिरोधक पद्धती म्हणून इम्प्लांट वापरण्याचा विचार करत असाल, तर कृपया त्याच्या उपलब्धतेबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भनिरोधक रोपण (इम्प्लांट) ही एक प्लास्टिकची लहान आकाराची लवचिक काडी असते. माचिसपेटीतील काडीच्या आकाराची ही काडी ४० मिलीमीटर लांब व २ मिलीमीटर रुंद असते. गर्भनिरोधक रोपण म्हणजेच काडी ही आपल्या हाताच्या वरच्या भागात त्वचेच्या खाली बसवली जाते. हे उपकरण अदृश्य असल्याने कुणालाही दिसत नाही.
ही एक संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती आहे, ज्यात प्रोजेस्टोजेन संप्रेरक असते. मासिक पाळीदरम्यान स्रीचे शरीर हे प्रोजेस्टोजेन संप्रेरक बाहेर सोडत असते. गर्भनिरोधक काडीत असलेले प्रोजेस्टोजेन संप्रेरक गर्भधारणा टाळण्यासाठी हळूहळू आपल्या रक्तप्रवाहात सोडले जाते. हे संप्रेरक दोनप्रकारे गर्भधारणा रोखते. पहिला प्रकार म्हणजे, हे संप्रेरक आपल्या गर्भाशय ग्रीवेवरील श्लेष्मा (चिकट द्रव) दाट करतात आणि शुक्राणूंना स्त्रीबीजांपर्यंत पोहोचण्यास मज्जाव करतात. शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोहोचू न शकल्याने गर्भधारणा होत नाही. तसेच हे संप्रेरक गर्भाशयाचे अस्तर पातळ करते. जेणेकरून शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचले तरी ते गर्भाशयाला चिकटत नाही आणि त्यामुळे स्रीबीजाची वाढ होऊ शकत नाही.
गर्भनिरोधक काडी ही एक अतिशय प्रभावी दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. ही पद्धती ९९ टक्के यशस्वी ठरते. म्हणजे साधारण वर्षभरात गर्भनिरोधक काडी वापरणाऱ्या १०० स्त्रियांपैकी केवळ १ स्त्री गर्भवती होण्याची शक्यता असते. एचआयव्ही, अपस्मार, क्षयरोग (टीबी) यासारख्या आजारावर उपचारासाठी वापरली जाणारी औषधे गर्भनिरोधक रोपणाचा प्रभाव कमी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला यापैकी संबंधित औषध सुरू झाल्यास त्या डॉक्टरांना गर्भनिरोधक रोपणाविषयी माहिती द्या. गर्भनिरोधक काडी योग्यवेळी बदलणे फार गरजेचे असते. त्यामुळे त्याचे वेळापत्रक किंवा ते बदलण्याची तारीख नेहमी लक्षात ठेवावे आणि ते वेळच्यावेळी बदलावे.
मासिक पाळी सुरू असताना ही काडी कधीही शरीरावर बसवता येते. शरीरावर बसवल्यानंतर ते लगेच कार्य करण्यास सुरुवात करते. जर तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिला असेल आणि गर्भनिरोधक काडी सुरुवातीच्या २१ दिवसांत बसवले असेल तर ते त्वरित कार्य करायला सुरुवात करते. जर २१ दिवसानंतर गर्भनिरोधक रोपण बसवले असले तर, गर्भधारणा टाळण्यासाठी पुढील ७ दिवस इतर काही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते. गर्भनिरोधक रोपण बहुतांश स्त्रियांच्या शरीराला सहन होते. मात्र, गर्भवती, स्तनाचा कर्करोग, यकृताचे आजार, सिरोसिस (कोणत्याही इंद्रियातील ऱ्हासकारक बदल), यकृतातील गाठ, मधूमेह, हृदयरोग, एचआयव्ही, अपस्मार आणि क्षयरोग (टीबी) यांसारखे आजार किंवा त्यावर काही उपचार सुरू असतील आणि या काळात मासिक पाळी नियमित सुरू ठेवायची असेल तर गर्भनिरोधक रोपण पद्धती वापरण्यास योग्य नसते.
फायदे
गर्भनिरोधक काडी ही अतिशय प्रभावी दीर्घकालीन आणि प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. ही पद्धत वापरत असताना गर्भधारणा टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागत नाही. हि गर्भनिरोधक काडी एकदा शरीरावर लावली की, पुढील तीन वर्षे त्याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही. हे गर्भनिरोधक उपकरण मासिक पाळीतील त्रास कमी करण्याचे कामही करते. तसेच तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल आणि या काळात गर्भधारणा टाळायची असल्यास गर्भनिरोधक काडी ही तुमच्यासाठी योग्य गर्भनिरोधक पद्धती असू शकते. ही काडी शरीरावर बसवणे आणि काढून टाकणे सोपे असते. हे रोपण काढल्यानंतर प्रजननक्षमता देखील सामान्य स्थितीत लवकर परत येते. ज्या स्त्रिया एस्ट्रोजेनवर आधारित गर्भनिरोधक पद्धती वापरत नाहीत त्यांच्यासाठी हि गर्भनिरोधक काडी सर्वाधिक उपयोगी असते. गर्भनिरोधक काडी ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून काही प्रमाणात संरक्षण देण्यास मदत करते.
तोटे
गर्भनिरोधक काडी शरीरात बसवण्यासाठी व काढण्यासाठी एक छोटीशी वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही काडी शरीरातील ज्या जागी ठेवली जाते त्या भागावर काही काळ मऊपणा, छोटीशी जखम किंवा सूज येऊ शकते. हाताची हालचाल झाल्यावर तो त्रास तुम्हाला जाणवू शकतो आणि कधीकधी अस्वस्थतादेखील जाणवू शकते. गर्भनिरोधक रोपणाचा मुख्य तोटा म्हणजे मासिक पाळीवर त्याचा होणारा परिणाम. या रोपणामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा अपेक्षेपेक्षा अधिक दिवस राहू शकते किंवा पूर्णपणे बंद होऊ शकते. तसेच डोकेदुखी, मुरुम, मळमळ, स्तन कोमल होणे, मूड स्विंग्ज होणे, लैंगिक संबंधांची इच्छा कमी होणे यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. हा सर्व त्रास कमी होण्यात साधारणपणे सुरुवातीचे तीन महिने जातात. मात्र, तीन महिन्यानंतर त्रास कमी होत नसेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. हा त्रास होण्यामागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ही गर्भनिरोधक पद्धती तुमच्या शरीराला सहन होते आहे की नाही याबद्दल डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्हाला सहन होऊ शकते अशी गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचा सल्ला देतील.
गर्भनिरोधक इंजेक्शन दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती

गर्भनिरोधक इंजेक्शन

गर्भनिरोधक इंजेक्शन दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
गर्भनिरोधक इंजेक्शन दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९९%
गर्भनिरोधक इंजेक्शन दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : तीन महिने
गर्भनिरोधक इंजेक्शन दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
गर्भनिरोधक इंजेक्शन - दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती
गर्भनिरोधक इंजेक्शनमध्ये प्रोजेस्टोजेन संप्रेरक असते. डेपो-मेड्रॉक्झी प्रोजेस्टेरॉन एसिटेट (डीएमपीए) इंजेक्शनचा गर्भधारणा टाळण्यासाठी वापरले जाते. भारतात याची डेपो-प्रोवेरा या नावाने मार्केटिंग केली जाते. या गर्भनिरोधक इंजेक्शन्सना डेपो-प्रोवेरा, डेपो शॉट किंवा डीएमपीए असेही संबोधले जाते. या गर्भनिरोधक इंजेक्शनमध्ये प्रोजेस्टोजेन संप्रेरक असते जे एखाद्या स्त्रीच्या अंडाशयाद्वारे नैसर्गिकरित्या तयार केलेल्या संप्रेरकासारखेच असते.
गर्भनिरोधक इंजेक्शन गर्भनिरोधक रोपणाप्रमाणेच काम करते. प्रोजेस्टोजेन संप्रेरक आपल्या रक्तप्रवाहात स्थिरपणे सोडले जाते. हे संप्रेरक अंडाशयाला दर महिन्याला स्त्रीबीज सोडण्यापासून प्रतिबंधित करून गर्भधारणा टाळते. जेव्हा स्त्रीबीज तयार होत नाहीत तेव्हा तुम्ही गर्भवती होऊ शकत नाही. तसेच हे संप्रेरक गर्भाशय ग्रीवेच्या श्लेष्मादेखील जाड करते, ज्यामुळे शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचे मिलन होत होणे कठीण होते. शुक्राणू आणि स्त्रीबीज एकत्र येऊ न शकल्याने गर्भधारणा रोखता येते.
गर्भनिरोधक इंजेक्शन ही अतिशय प्रभावी दीर्घकालीन व प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. जेव्हा हे इंजेक्शन योग्यरित्या वापरले जाते तेव्हा ते ९९ टक्के परिणामकारक ठरते. याचा अर्थ असा की, गर्भनिरोधक इंजेक्शन वापरणाऱ्या १०० स्त्रियांपैकी केवळ १ स्त्री गर्भवती होण्याची शक्यता असते. काहीवेळा स्त्रिया इंजेक्शन घ्यायला विसरतात त्यामुळे हे इंजेक्शन ९४ टक्के प्रभावी मानले जाते. साधारण १२ ते १३ आठवडे म्हणजे ३ ते ४ महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून ४ वेळा हे इंजेक्शन घेणे आवश्यक असते. एकदा गर्भनिरोधक इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचा प्रभाव तीन महिने राहतो. त्यामुळे पुढील तीन महिन्यात तुम्हाला गर्भधारणा होण्याचे नियोजन करता येत नाही. तसेच त्याचे दुष्परिणामदेखील टाळता येत नाहीत. इंजेक्शन डॉक्टरांनी देणे गरजेचे असते. त्यामुळे इंजेक्शनचे वेळापत्रक पाहून डॉक्टरांशी भेट निश्चित करता यायला हवी. जर तुम्ही गर्भनिरोधक इंजेक्शन घ्यायचे विसरलात तर गर्भधारणेपासून संरक्षण मिळणार नाही. पहिले इंजेक्शन घेतल्यानंतर पुढील इंजेक्शन घेण्यास पंधरा आठवड्यांचा कालावधी गेला तरीदेखील तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळणार नाही.
गर्भनिरोधक इंजेक्शन बहुतांश स्रियांना सहन होते. तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिला असेल किंवा बाळाला स्तनपान करीत असाल तरीही तुम्हाला गर्भनिरोधक इंजेक्शनचा वापर करता येईल. मात्र, स्तनाचा कर्करोग, अनियमित किंवा अस्पष्ट रक्तस्राव, धमन्यांसंबंधी आजार, हृदयरोग, किंवा ओस्टेओपोरोसिस (हाडे पातळ होण्याचा आजार) यांसारख्या शारीरिक व्याधी असतील तर गर्भनिरोधक इंजेक्शन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार नाही. मासिक पाळी चक्र बदलू नये किंवा पुढील एक वर्षात मूल हवे असेल तर अशावेळी गर्भनिरोधक इंजेक्शन हा योग्य पर्याय ठरत नाही. या गर्भनिरोधक पद्धतीमध्ये संप्रेरकांमध्ये बदल होत असतात आणि ते काहीवेळा तुमच्यासाठी अयोग्य असतात. त्यामुळे ही गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचा विचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या व गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भनिरोधक पद्धती कोणती याविषयी माहिती जाणून घ्या.
फायदे
गर्भनिरोधक इंजेक्शन ही दीर्घकालीन आणि थांबवता येणारी पद्धत गर्भधारणा रोखण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतले जाणारे हे इंजेक्शन सुरक्षित व सोयीस्कर असते. या गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे लैंगिक जीवनात कोणताही अडथळा येत नाही तसेच, तुम्हाला हवे तेव्हा लैंगिक संबंध ठेवता येतात. गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे मासिक पाळीचा कालावधी कमी होऊ शकतो. तसेच तुम्ही जोपर्यंत हे इंजेक्शन वापरत आहात तोपर्यंत मासिक पाळी येणे बंद होऊ शकते. ही कायमस्वरुपी गर्भनिरोधक पद्धती नसल्याने तुम्हाला हवी तेव्हा थांबवता येते व त्यासाठी वेगळे कष्टदेखील घ्यावे लागत नाही. जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल आणि या कालावधीत गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक म्हणून इंजेक्शनचा वापर करणार असाल तर तो निर्णय तुम्हाला फायद्याचा राहील.
तोटे
गर्भनिरोधक इंजेक्शनच्या वापरामुळे मासिक पाळी अनियमित होणे, अधिक काळ राहणे किंवा पूर्णपणे बंद होणे या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. मासिक पाळीतील हे बदल काहींना त्रासदायक वाटू शकतात. एकदा इंजेक्शन घेतले की ते साधारण तीन महिन्यांपर्यंत प्रभावी असते. त्यामुळे या काळात होणारे दुष्परिणाम काही काळ सहन करावे लागू शकतात. डेपो-प्रोवेरा प्रकारचे इंजेक्शन वापरल्याने हाडांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्या महिलांना ओस्टेओपोरोसिस (हाडे पातळ होण्याचा आजार) त्रास असतो त्यांच्या शरीरावर हा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही वर्षभरात मूल होऊ देण्याचे नियोजन करत असाल तर अशावेळी गर्भनिरोधक इंजेक्शनचा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. कारण या इंजेक्शनमुळे तुमची प्रजननक्षमता पूर्वस्थितीत येण्यासाठी नऊ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो. दर तीन महिन्यांनी एक इंजेक्शन घेणे महत्त्वाचे असते. ही गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. तसेच इंजेक्शन घेतल्यानंतर मळमळ, वजन वाढणे, डोकेदुखी, स्तन कोमल होणे किंवा नैराश्य येणे यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. जर तुम्हाला हे सर्व त्रास होत असतील तर डॉक्टरांशी चर्चा करा. ते तुम्हाला सहन होणाऱ्या इतर गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचा सल्ला देतील.
गर्भवती होणे आणि बाळ होणे हा प्रत्येक स्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. परंतु, कधीकधी अनियोजित गर्भधारणा हा आनंद उपभोगू देत नाही. कारण अनियोजित गर्भधारणेमुळे त्या स्रीच्या भविष्यातील योजना, नियोजन हे सर्व विस्कळीत होते. तसेच अनियोजित गर्भधारणेमुळे सामाजिक, आणि आर्थिक पैलुंवर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच मूल कधी व्हावे यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. अनियोजित गर्भधारणा ही योग्य गर्भनिरोधक पद्धतीची निवड, योग्य कुटुंब नियोजन आणि वेळापत्रकाचे पालन यानुसार टाळली जाऊ शकते. तसेच योग्य गर्भनिरोधक पद्धतीमुळे आपल्याला मूल कधी हवे आहे याविषयी नियोजन करणे सोपे होते.
दीर्घकालीन व प्रतिवर्ती गर्भनिरोधक पद्धती इतर गर्भनिरोधकांच्या तुलनेत सर्वाधिक प्रभावी आहेत. ही पद्धती बरेच वर्ष टिकते आणि ती कशी, कधी वापरायची याबाबत वेगळे लक्ष देण्याची गरज नसते. या पद्धतीतील उपकरणे एकदा शरीरात बसवली की, गर्भधारणा टाळण्याबाबत तुम्ही चिंतामुक्त जीवन जगू शकतात. लैंगिक संबंधाआधी, त्या दरम्यान किंवा त्या नंतर या गर्भनिरोधक पद्धतीविषयी विचार करावा लागत नाही. या गर्भनिरोधक पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत, कायमस्वरुपी नाही. सर्व दीर्घकालीन व प्रतिवर्ती करता येणाऱ्या गर्भनिरोधक पद्धती लोकप्रिय आहेत. परंतु, यापैकी आययूडी किंवा कॉपर टी ही पद्धती भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते. दीर्घकाळ वापरण्यासाठी व कुटुंब नियोजनासाठी ही पद्धती अतिशय उत्तम पर्याय आहे. आययूडी गर्भनिरोधक पद्धतीचा खर्च आणि त्याची वैद्यकीय प्रक्रिया इतर गर्भनिरोधक पद्धतींच्या तुलनेत कमी आहे. दीर्घकालीन व प्रतिवर्ती करता येणारी गर्भनिरोधक पद्धती सर्वाधिक संरक्षण देते, तसेच चिंतामुक्त ठेवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला त्याकडे लक्ष देण्याची गरज नसते. त्यामुळेच ज्या स्त्रियांचे लैंगिक जीवन अधिक सक्रीय असते त्यांच्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. कारण, गर्भधारणा टाळण्यासाठी ही पद्धती दीर्घकाळ उपयोगी ठरते.
लक्षात घ्या की, मूल होणे ही खूप आनंद देणारी आणि जीवनात बदल घडवून आणणारी घटना असते. त्यामुळे ही गोष्ट घरात आनंद देणारी ठरायला हवी ना की तणाव आणणारी. त्यामुळे आपल्या बाळाचे येणे अनियोजित ठेवू नका. त्याच्यासाठी योग्य योजना तयार करा आणि त्याच्या येण्याच्या आनंद साजरा करा. गर्भधारणा टाळण्यासाठी अचूक गर्भनिरोधक पद्धत निवडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या. ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य असलेली गर्भनिरोधक पद्धती सूचवतील आणि कुटुंब नियोजनाचे मार्गदर्शन करतील. या href="/mr/learn/contraception/contraception-methods" title="गर्भनिरोध पद्धती | गरोदरपण कशे टाळायचे?">गर्भनिरोधक पद्धती आणि कुटुंब नियोजन पद्धतींबद्दल तुम्हाला जितकी माहिती असेल तितके तुम्ही तुमच्या लैंगिक आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता. गर्भधारणा नको असल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. गरोदरपणाचा आनंद घ्या हा सुंदर अनुभव तणावात घालवू नका.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय