डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धतींनी गरोदरपणा कशा टाळायचा

पद्धती | परिणामकारकता | फायदे व मर्यादा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धतीमध्ये शुक्राणू आणि स्रीबीज यांचे मिलन होऊ नये यासाठी शारीरिक अडथळा निर्माण केला जातो. या पद्धतींमुळे निर्माण झालेला अडथळा शुक्राणुंना स्रीबीजांपर्यंत पोहोचू देत नाही आणि म्हणूनच गर्भधारणा टाळता येते. प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धतींमध्ये शुक्राणू किंवा वीर्यनाशक (स्पर्मीसाइड), विभाजन करणारा पडदा (डायाफ्राम), स्त्रियांसाठी कंडोम, पुरुषांसाठी कंडोम, गर्भनिरोधक स्पंज, गर्भाशय ग्रीवाचे झाकण किंवा टोपी या गोष्टींचा समावेश होतो.
शुक्राणू किंवा वीर्यनाशक, कंडोम, स्पंज यासारख्या काही प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध असतात. या वस्तू खरेदी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरच्या चिठ्ठीची आवश्यकता नसते. परंतु, डायाफ्राम आणि गर्भाशय ग्रीवेचे झाकण किंवा टोपी यांसारख्या गोष्टींसाठी डॉक्टरांचा सल्ला व चिठ्ठी गरजेची असते. गर्भधारणा टाळायची असल्यास लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी या पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. गर्भधारणा रोखण्यासाठी इतर पद्धतींइतकी प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती प्रभावी ठरत नाही. जर कधी तुम्ही प्रतिबंधित गर्भनिरोधक साधन जवळ बाळगणे विसरलात, ते योग्यरित्या वापरता आले नाही किंवा वापरता येत नसेल तर अशावेळी इतर गर्भनिरोधक पद्धती पर्याय म्हणून किंवा खबरदारी म्हणून जवळ बाळगणे आवश्यक असते. स्री आणि पुरुष कंडोम या दोन्ही गर्भनिरोधक पद्धतींचा कुटुंब नियोजन आणि गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात वापर केला जातो. लैंगिक आजारापांसून संरक्षण करण्यासाठीदेखील ही पद्धत मदत करते.
गर्भधारणा टाळण्यासाठी प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धतींचा वापर कसा करावा याविषयी या लेखात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रभाव
प्रभावी : ८५%
पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येकवेळी
पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण

लैंगिक आजारांपासून संरक्षण : होय

पुरुष कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
पुरुषांसाठीचे कंडोम हे रबर किंवा लेटेक्स यापांसून तयार केलेले असतात. पुरुषांना जननेंद्रियावर परिधान करण्यायोग्य असलेले हे कंडोम शुक्राणूंना योनीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरले जातात. पुरुष कंडोम ही कुटुंब नियोजनासाठी वापरली जाणारी सर्वात जुनी आणि सर्वाधिक प्राधान्य दिली जाणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. पुरुष कंडोम वीर्य आणि योनीमार्गातील द्रवपदार्थांचा एकमेकांशी संपर्क रोखते. तसेच त्वचेचा त्वचेशी मर्यादित संपर्क ठेवून लैंगिक आजारांचा होणारा संसर्ग रोखण्याचे काम करते. कंडोम ही एकमेव गर्भनिरोधक पद्धत आहे जी लैंगिक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मदतशीर ठरते. इतर गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाहीत. त्यामुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोम नेहमी वापरायला हवे. पुरुषांसाठी असलेले कंडोम मेडिकल दुकानात सहज उपलब्ध होतात. कंडोम विकत घेण्यासाठी कुठल्याही डॉक्टरच्या चिठ्ठीची आवश्यकता नसते. गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा सर्वाधिक प्रमाणात वापर होत असला तरीही ते पूर्णपणे प्रभावी ठरत नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी ही पद्धती जवळपास १५ टक्के अपयशी ठरते. यामागची मुख्य कारणे म्हणजे कंडोम फाटणे, निसटणे, योग्यरित्या परिधान न करणे, वापरण्याचे तंत्र चुकीचे असणे किंवा कालबाह्य झालेले कंडोम वापरणे ही असतात.
फायदे
पुरुषांसाठी असलेले कंडोम वापरणे आणि हाताळणे अगदी सोपे असते. इतर गर्भनिरोधक पद्धतींच्या तुलनेत पुरुष कंडोम कमी खर्चिक असतात. गर्भधारणा टाळण्यासोबतच लैंगिक आजारांपासून संरक्षण देणारी कंडोम ही एकमेव गर्भनिरोधक पद्धती आहे. इतर गर्भनिरोधक पद्धतींना उत्तमपणे काम करण्यासाठी कंडोम मदतशीर ठरते. जर इतर गर्भनिरोधक पद्धती वापरताना काही चूक झाली किंवा ती पद्धत अयशस्वी ठरली तर आधार म्हणून कंडोमचा वापर करणे योग्य ठरते. कंडोम वापरण्यासाठी कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याची किंवा चिठ्ठीची गरज भासत नाही. ज्या क्षणी तुम्ही कंडोम वापरणे थांबवता त्याक्षणी गर्भधारणेची शक्यता सामान्य होते. कंडोमच्या वापराने शरीरात संप्रेरकांत बदल होत नाहीत.
तोटे
लैंगिक संबंधादरम्यान तुम्ही कंडोमचा वापर किती योग्यप्रकारे आणि अचूकपणे करता यावर गर्भधारणा टाळणे अवलंबून असते. गर्भधारणा टाळण्यासाठी लैंगिक संबंधावेळी कंडोम वापरणे अत्यंत गरजेचे असते. एकदा वापरलेले कंडोम पुन्हा वापरता येत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही लैंगिक संबंध ठेवाल तेव्हा प्रत्येकवेळी तुम्हाला नवीन कंडोमचा वापर करावा लागतो. लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोम महत्त्वाचे असते. त्यामुळे त्वचेचा त्वचेशी संपर्क होऊ नये यासाठी संपूर्ण लैंगिक क्रियेदरम्यान कंडोमचा वापर करणे अत्यावश्यक असते. त्याशिवाय तुम्हाला लैंगिक आजारांपासून पूर्णपणे संरक्षण मिळणार नाही. लैंगिक संबंधावेळी तुम्हाला कंडोम वापरणे नेहमी लक्षात ठेवावे लागते. तसेच ते लवकर सापडेल किंवा हाताशी येईल अशा जागी ठेवण्याची सवय करावी लागते. कंडोम योग्यरित्या वापरण्यासाठी किंवा परिधान करण्यासाठी थोडे अधिक प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात. काही लोकांना कंडोमच्या वापराने लैंगिक संबंधाचे पूर्णपणे समाधान आणि आनंद मिळत नाही. काही लोकांना कंडोम वापरणे आवडत नसल्याने ते या गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करणे टाळतात.
स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ७९%
स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : नेहमी
स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण

लैंगिक आजारांपासून संरक्षण : होय

स्री कंडोम प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
स्त्री कंडोम हे गर्भधारणा टाळण्यासाठी, लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि योग्य कुटुंब नियोजन करता यावे म्हणून स्रियांसाठी विकसित केलेले नवीन पद्धतीचे गर्भनिरोधक साधन आहे. पॉलीयुरेथेन नावाच्या मऊ प्लास्टिकने हे कंडोम तयार केलेले असते. स्री कंडोमचा आकार दंडगोलाकार असतो. ज्याचे एक टोक उघडे असते तर दुसऱ्या बाजूच्या टोकाला गोलाकार रिंगने पकडलेले असते. त्याचे बंद टोक गर्भाशय ग्रीवा म्हणजेच गर्भाशयाच्या खालच्या भागाला झाकते आणि उघडा भाग योनीमागाच्या प्रवेशाजवळ असतो. स्री कंडोमला काहीवेळा अंतर्गत कंडोम असेही संबोधले जाते. लैंगिक संबंधांच्या आठ तास आधीदेखील हे कंडोम योनीमध्ये टाकता येऊ शकते.
एक गर्भनिरोधक पद्धती म्हणून काम करताना स्री कंडोम शुक्राणू आणि स्रीबीज यांच्यामध्ये अडथळा निर्माण करून गर्भधारणा टाळण्यासाठी मदत करते. स्री कंडोममुळे योनीच्या आतील भाग आणि बाह्य जननेंद्रियाचा (वल्वा) काही भाग झाकला जातो. यामुळे लैंगिक आजाराचे संक्रमण रोखण्यास मदत होते. हे कंडोम वीर्य किंवा त्वचेच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी करते. ज्यामुळे लैंगिक आजाराचा संसर्ग होण्याचा धोका टळतो. गर्भधारणा टाळण्यासाठी आणि लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी स्त्री कंडोमचा अचूक पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी या कंडोमचा अचूक वापर केला तर ते ९५ टक्के प्रभावी ठरते. प्रत्येकाला याचा अचूकपणे वापर करता येईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच वास्तविक विचार केल्यास गर्भधारणा रोखण्यासाठी ही प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत ७९ टक्के प्रभावी ठरते. स्री कंडोम आणि पुरुष कंडोम यांचा एकत्रित वापर करू नये. गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही इतर गर्भनिरोधक पद्धती वापरत असलात तरीही लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो.
फायदे
पुरुष कंडोमप्रमाणेच स्री कंडोमदेखील गर्भधारणा टाळण्याबरोबर लैंगिक आजारांपासून संरक्षण देते. स्री कंडोम नायट्रिल नावाच्या पदार्थापासून तयार केले जातात आणि ते पूर्णपणे हायपोअलर्जेनिक म्हणजे ज्यांची अलर्जी कमी प्रमाणात होते असे असतात. त्यामुळे ज्यांना लेटेक्सची अलर्जी आहे आणि गर्भनिरोधक म्हणून पुरुष कंडोम वापरू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धती एक चांगला पर्याय ठरते. लैंगिक संबंधाआधी हे कंडोम परिधान करता येते व लैंगिक संबंधांदरम्यान याचा कोणताही व्यत्यय येत नाही. तसेच महिला कंडोम वापरताना लैंगिक सुखात वाढ झाल्याचा अनुभवदेखील काहींना आल्याचे उदाहरण आहे. कंडोम ही स्री नियंत्रित असलेल्या गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक पद्धत आहे. जी तुम्हाला लैंगिक जीवनाची काळजी घेण्यासाठी अधिक उपयोगी आणि मदत करणारी ठरते.
तोटे
स्री कंडोमचा वापर करून गर्भधारणा टाळणे हे आपण त्याचा किती अचूकपणे वापर करता यावर अवलंबून असते. गर्भधारणा रोखण्यासाठी लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी या स्री कंडोम गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. तसेच एकदा वापरलेले कंडोम पुन्हा वापरता येत नाही. प्रत्येकवेळी नवीन कंडोम वापरणे अत्यावश्यक असते. स्री कंडोम परिधान करताना काही प्रमाणात अडचण येऊ शकते. स्री कंडोम वापरल्यानंतर काहींना योनी, बाह्य जननेंद्रिय (वल्वा) किंवा लिंग यांवर खाज येते किंवा व तो त्रास नकोनकोसा होतो.
डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत

डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत

डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत
डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : ८८%
डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येक वेळी
डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारापासून संरक्षण

लैंगिक आजारापासून संरक्षण : नाही

डायाफ्राम (विभाजन करणारा पडदा) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत
डायाफ्राम हे एक अंडाकृती गर्भनिरोधक साधन आहे जे तुमच्या योनीमध्ये अचूकपणे बसते. डायाफ्राम पातळ, मऊ सिलीकॉन आणि कपच्या आकाराचे साधन असून ते सहजपणे वाकते. डायाफ्रामचे काही प्रकारही पाहायला मिळतात. यामध्ये आर्चिंग स्प्रिंग (कमानीसारखा आकार), कॉइल स्प्रिंग (गुंडाळीसारखा आकार), फ्लॅट स्प्रिंग (सपाट आकार), वाइड सील स्प्रिंग (रुंद आकार) असे विविध प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये आर्चिंग स्प्रिंग डायाफ्राम हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. आर्चिंग स्प्रिंग डायाफ्राममध्ये एक मजबूत कडा असते. त्यामुळे ती परिधान करणे सोपे होते. तसेच योनीमार्गातील नाजूक स्नायूंचा त्रास असलेल्या स्त्रिंयासाठी हा प्रकार योग्य असतो.
डायाफ्राम हा विभाजन करणारा पातळ पडदा असून तो वेगवेगळ्या आकारात येतो. आपल्या सोयीसाठी त्याचा योग्य आकार निवडणे महत्त्वाचे आहे. तसेच गर्भाधारणा टाळण्यासाठीदेखील हे आकार प्रभावी ठरतात. आपल्यासाठी कोणता आकार योग्य ठरेल याविषयी डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणे योग्य ठरते. तसेच मेडिकल दुकानांमधून डायाफ्राम विकत घेण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठीदेखील आवश्यक असते. लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येकवेळी डायाफ्राम गर्भनिरोधक पद्धती वापरल्यास ती प्रभावी ठरते. परंतु, बरेचदा लोक ही पद्धत वापरताना चूक करतात किंवा ती योग्यरित्या वापरत नाहीत. त्यामुळे वास्तविक विचार केल्यास डायाफ्राम गर्भनिरोधक पद्धत कुटुंब नियोजनसाठी ८८ टक्के प्रभावी ठरते. त्यामुळे बरेचदा शुक्राणूनाशक म्हणजेच स्पर्मीसाइडसह डायाफ्राम ही पद्धत वापरण्याचा सल्ला दिला जातो. या एकत्रित पद्धतीमध्ये डायाफ्राम शुक्राणू आणि स्रीबीज यांच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम करते. तर शुक्राणूनाशक शुक्राणूंना पुढे जाण्यापासून रोखते. त्यामुळे शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोहोचत नाहीत. लैंगिक संबंधांच्या एक तास आधी डायाफ्राम योनीमध्ये टाकावा लागतो व लैंगिक संबंधानंतर सहा तासांपर्यंत तो योनीतच ठेवावा लागतो. चोवीस तासांहून अधिक काळ डायाफ्राम योनीमध्ये ठेवू नये. डायाफ्राम न बदलता वारंवार लैंगिक संबंध ठेवल्यास ते प्रभावी करण्यासाठी शुक्राणूनाशक वापरण्याची अधिक गरजेचे भासते. डायाफ्राम जर पुन्हा वापरायचे असेल तर त्याची योग्य ती काळजीदेखील घ्यावी लागते. डायाफ्राम पूर्णपणे स्वच्छ करून ठेवावा तसेच तो वापरण्यापूर्वी त्यावर तडे, छिद्रे, सुरकुत्या आणि हलके डाग आहेत का हे तपासून घ्या. असे असल्यास ते वापरण्याचे टाळा.
डायाफ्राम गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. काहींना टॉक्झिक शॉक सिंड्रोम (स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरियाचे शरीरात प्रमाण वाढणे), सिलिकॉन किंवा शुक्राणूनाशकाची अलर्जी असते, तसेच काहींनी नुकताच बाळाचा जन्म दिला असेल किंवा गर्भपात केला असेल तर अशावेळी डायाफ्राम गर्भनिरोधक पद्धती वापरणे योग्य ठरत नाही. डायाफ्राम वापरणाऱ्या काही स्रियांना मूत्रमार्गात संक्रमण म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे डायाफ्राम वापरण्याचा विचार किंवा निर्णाय घेण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
फायदे
डायाफ्राम ही सहज हाताळता येणारी आणि पुन्हा वापरता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. ज्या क्षणी तुम्ही डायाफ्राम वापरण्यास सुरुवात करता त्या क्षणी ते त्याचे काम करण्यास सुरुवात करते. तसेच गर्भधारणा टाळण्यास उपयुक्त ठरते. जेव्हा तुम्हाला मूल हवे असते तेव्हा डायाफ्राम वापरणे थांबवता येते. डायफ्राम संप्रेरकमुक्त (हार्मोन) गर्भनिरोधक पद्धती असून लैंगिक संबंधांमध्ये त्याचा कुठलाही व्यत्यय येत नाही. डायाफ्रामची योग्य काळजी घेतल्यास ते दोन वर्षांपर्यंत टिकू शकते. तसेच त्याचा पुन्हा पुन्हा वापरदेखील करता येतो. परंतु, त्यासाठी डायाफ्रामची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
तोटे
डायाफ्राम गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करून गर्भधारणा टाळणे शक्य आहे. परंतु, तुम्ही त्याचा किती अचूक वापर करता यावर त्याचे यश अवलंबून असते. प्रत्येक लैंगिक संबंधावेळी डायाफ्राम वापरणे गरजेचे असते. काही स्त्रियांना योनीमार्गात डायफ्राम टाकणे व काढणे त्रासदायक होते. लैंगिक संबंधानंतर साधारण सहा तासांपर्यंत डायाफ्राम योनीमार्गात ठेवणे गरजेचे असते अन्यथा ते प्रभावी ठरत नाही. ही गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. डायाफ्रामचा कोणता प्रकार व आकार आपल्यासाठी योग्य असेल याविषयी माहिती हवी असल्यास डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक असते. डॉक्टर तुमच्या गरजेनुसार डायाफ्रामचा आकार लिहून देतात. त्यांच्या चिठ्ठीशिवाय तुम्हाला डायाफ्राम विकत घेत येत नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी केवळ डायाफ्रामचा वापर करणे पुरेसे होत नाही. याला सोबत म्हणून शुक्राणूनाशकाचा वापर करावा लागतो. शुक्राणूनाशक जास्त प्रमाणात वापरल्यास त्याचे दुष्परिणामदेखील सहन करावे लागते. डायाफ्रामच्या वापरामुळे काही स्त्रियांना मूत्रमार्गातील संसर्ग (युरिनेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) होतो.
गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ७१ ते ८६%
गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येकवेळी
गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण

लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही

गर्भाशय ग्रीवाची टोपी (सर्व्हायकल कॅप) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
गर्भाशय ग्रीवेची टोपी किंवा झाकण ही एका लहान कपच्या आकाराची असते. ही टोपी किंवा झाकण सिलिकॉन किंवा लेटेक्सपासून बविलेली असते. ही रबरी वस्तू एखाद्या नाविकाच्या टोपीसारखी दिसते आणि दीड इंच रुंद आणि एक इंच उंच असते. यात एक पट्टी असते जी टोपी सहजपणे काढून टाकण्यासाठी वापरली जाते. गर्भाशय ग्रीवेची टोपी साधारणपणे लहान, मध्यम आणि मोठी अशा तीन आकारांमध्ये येते. गर्भाशय ग्रीवेच्या टोपीचा आकार वर्गीकरणानुसार निवडला जातो. यामध्ये एक जी स्री कधीही गर्भवती नव्हती. दुसरी जी स्त्री गर्भवती होती, परंतु योनीमार्गाने तिची प्रसुती झाली नाही आणि तिसरी म्हणजे स्री गर्भवती होती आणि तिची प्रसुती योनीमार्गाने झाली आहे अशा तीन प्रकारांनुसार गर्भाशय ग्रीवा टोपीचा आकार निवडला जातो. गर्भाशय ग्रीवेची टोपी एखाद्या डायाफ्रामसारखी असते, परंतु ती खूप लहान आणि कमी प्रमाणात वापरली जाते. डायाफ्राम एखाद्या डिशसारखा दिसतो तर गर्भाशय ग्रीवेची टोपी एखाद्या नाविकाच्या डोक्यावरील टोपीसारखी दिसते. डायाफ्रामच्या तुलनेत गर्भाशय ग्रीवेची टोपी जास्त काळ योनीमध्ये ठेवता येते. म्हणजे डायाफ्राम जास्ती जास्त २४ तास योनीमार्गात ठेवता येतो तर गर्भाशय ग्रीवेची टोपी साधारणपणे दोन दिवसांपर्यंत ठेवता येते. ही गर्भाशय ग्रीवेची टोपी कशी वापरावी, आपल्यासाठी कोणता आकार योग्य आहे आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम असते.
गर्भाशय ग्रीवाची टोपी योनीमध्ये खोलवर टाकली जाते आणि गर्भाशयाच्या ग्रीवावर सहजपणे बसते. तुम्ही जेव्हा लैंगिक संबंध ठेवतात त्या प्रत्येकवेळी या टोपीचा वापर करणे आवश्यक असते. ही टोपी शुक्राणूंना स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्यास प्रतिबंध करून गर्भधारणा टाळण्यास मदत करते. यापूर्वी कधीही बाळाला जन्म न दिलेल्या स्रीसाठी गर्भाशय ग्रीवेची टोपी अधिक प्रभावी म्हणजे ८६ टक्के उपयुक्त ठरते. तर ज्या स्त्रीने याआधी बाळाला जन्म दिलेला असतो तिच्यासाठी ही गर्भाशय ग्रीवेची टोपी कमी प्रभावी म्हणजे ७१ टक्के उपयुक्त ठरते. इतर गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणेच गर्भाशय ग्रीवेच्या टोपीचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. ही गर्भनिरोधक पद्धत जितकी अचूकपणे वापरली जाते तितकीच गर्भधारणेपासून बचाव होण्याची शक्यता दाट होत जाते. गर्भधारणा रोखण्याची शक्यता वाढवण्यासाठी गर्भाशय ग्रीवेच्या टोपीसह शुक्राणूनाशक वापरण्याचा सल्ला दिला जातो. गर्भाशय ग्रीवेच्या टोपीसह पुरुष कंडोमचा वापर केल्यास गर्भधारणा टाळण्याबरोबर लैंगिक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
गर्भाशय ग्रीवेची टोपी कुटुंब नियोजनासाठी सुरक्षित गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक आहे. परंतु, काही महिलांना ही पद्धत थोडी त्रासिक वाटू शकते. सिलिकॉन किंवा शुक्राणूनाशकाची अलर्जी असेल, मागील सहा आठवड्यात बाळाला जन्म दिलेला असेल किंवा गर्भपात झालेला असेल, गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग असेल किंवा गर्भाशय ग्रीवेसंबंधी काही त्रास असेल तर गर्भाशय ग्रीवेची टोपी तुम्हला वापरता येत नाही. तसेच तुम्हाला टॉक्झिक शॉक सिंड्रोमचा त्रास असेल तरीही गर्भाशय ग्रीवेची कॅप वापरता येत नाही. मासिक पाळीमध्ये गर्भाशय ग्रीवेची टोपीचा वापर करणे टाळायला हवे कारण यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. गर्भाशय ग्रीवेची टोपी असलेल्या जागी अस्वस्थ वाटणे, योनीमार्गात वेदना जाणवणे, योनीमार्गात खाज सुटणे, योनीजवळची त्वचा लालसर होणे, योनीमार्गाजवळ सूज येणे, योनीतून अतिरिक्त स्त्राव होणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास त्वरित आपल्या स्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधा. तसेच अचानक ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, अतिसार किंवा उलट्या होणे, घसा खवखवणे, सांधे व स्नायू दुखणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, अशक्तपणा जाणवणे यांसारख्या त्रासाकडेही लक्ष द्या.
फायदे
गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भाशय ग्रीवेची टोपी हाताळण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येणारी गर्भनिरोधक पद्धती आहे. या गर्भाशय ग्रीवेच्या टोपीचा वापर तुम्ही कसा करता यावरून ती किती प्रभावी आहे हे लक्षात येते. गर्भधारणा कधी टाळायची आहे, आपल्याला मूल कधी हवे आहे यानुसार गर्भाशय ग्रीवा टोपीचा वापर करावा की नाही हे ठरवता येते. गर्भाशय ग्रीवेची टोपी संप्रेरकविरहित गर्भनिरोधक पद्धती आहे. त्यामुळे तिचे संप्रेरक संबंधित कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. गर्भाशय ग्रीवेच्या टोपीमुळे लैंगिक संबंधामध्ये व्यत्यय येत नाही. या टोपीचा वापर पुन्हा करता येतो. परंतु, त्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते. ही टोपी योग्यरित्या वापरल्यास साधारणपणे एक वर्षभर टिकते.
तोटे
गर्भाशय ग्रीवेच्या टोपीचा अचूक वापर केल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता वाढते. गर्भधारणा टाळायची असल्यास लैंगिक संबंधावेळी गर्भाशय ग्रीवेची टोपी वापरणे आवश्यक असते. गर्भाशय ग्रीवेची टोपी कशी वापरायची हे शिकण्यासाठी थोडा वेळ खर्च करण्याबरोबर सरावही करावा लागतो. गर्भाशय ग्रीवेची टोपी वेगवेगळ्या आकारात येते. या विविध आकारांमधून आपल्यासाठी योग्य आकार निवडणे काहीवेळा अवघड होऊन जाते. बाळ झाल्यानंतर किंवा गर्भपात झाल्यानंतर ही टोपी बदलावी लागते. कारण जुन्या आकाराची टोपी गर्भाशय ग्रीवेवर पूर्णपणे बसण्याची शक्यता नसते. गर्भनिरोधक पद्धती म्हणून गर्भाशय ग्रीवेची टोपी हा एकमेव पर्याय वापरत असाल तर तो गर्भधारणा टाळण्यासाठी पुरेसा ठरत नाही. ही पद्धत अधिक प्रभावी व्हावी यासाठी शुक्राणूनाशक वापरण्याची गरज भासू शकते. मात्र, शुक्राणूनाशकाच्या अतिवापरामुळे योनीला त्रास होऊ शकतो. तसेच लैंगिक संसर्गाचा धोकादेखील वाढतो. लैंगिक संबंधानंतर गर्भाशय ग्रीवेची टोपी साधारपणे सहा तास योनीमध्ये राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ही टोपी तेथे आहे की नाही याची खात्री करण्याची जबाबदारीदेखील आपल्यावर असते. तसेच ही टोपी २४ तासांहून अधिक काळ योनीमार्गात ठेवू नये.
वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती

वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ७८%
वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येक वेळी
वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारापासून संरक्षण

लैंगिक आजारापासून संरक्षण : नाही

वीर्य किंवा शुक्राणूनाशक (स्पर्मीसाइड) प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
शुक्राणूनाशक म्हणजेच स्पर्मीसाइड हा एक गर्भनिरोधक पदार्थ आहे. हा पदार्थ क्रीम, जेल, फोम, फिल्म किंवा सपोसिटरीजसारख्या वेगवेगळ्या स्वरुपात येतो. बहुतांश शुक्राणूनाशकांमध्ये नोनोक्झिनॉल -९ हे रसायन असते. गर्भनिरोधक पद्धती म्हणून शुक्राणूनाशक दोन मार्गांनी गर्भधारणेला प्रतिबंध करते. पहिला मार्ग म्हणजे गर्भाशय ग्रीवेमध्ये प्रवेश करणाऱ्या शुक्राणूंना अवरोधित करणे जेणेकरून ते स्रीबीजांना भेटू शकत नाहीत तर दुसरा मार्ग म्हणजे हे शुक्राणूंची हालचाल मंद करते. त्यामुळे शुक्राणू स्रीबीजांमध्ये शिरले तरीही तेथे हालचाल करू शकत नाहीत. जेल किंवा फोमच्या अडथळ्याने शुक्राणू थांबतात तर शुक्राणूनाशकाच्या आतील रसायनामुळे नष्ट होतात. शुक्राणूनाशक या शब्दातील नाशक या शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणे किंवा मारणे. परंतु, शुक्राणूनाशक प्रत्यक्षात शुक्राणूंना मारत नाही तर ते स्रीबीजापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांची गती आणि हालचाल कमी करते.
शुक्राणूनाशक योनीमध्ये खोलवर किंवा गर्भाशय ग्रीवेच्या जवळ लावले जाते. लैंगिक संबंधाआधी किती काळ शुक्राणूनाशक वापरावे याबद्दलच्या सूचना जाणून घेणे खूप आवश्यक आहे. शुक्राणूनाशक ही गर्भनिरोधक पद्धती त्वरित प्रभावी नसते त्यामुळे लैंगिक संबंधाआधी साधारणपणे १० ते १५ मिनिटे आधी योनीमध्ये किंवा गर्भाशय ग्रीवेमध्ये लावणे किंवा ठेवणे आवश्यक असते. बरीच शुक्राणूनाशके केवळ एक तासासाठी प्रभावी असतात. गर्भाधारणा टाळण्यासाठी शुक्राणूनाशकाच्या परिणामकारकतेमध्ये वेळ हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शुक्राणूनाशक कसे वापरावे याबाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. शुक्राणूनाशक कसे वापरावे, गर्भाधारणा टाळण्यासाठी कोणती वेळ पाळणे आवश्यक आहे या सर्व शंकांचे निरसन ते करतील. शुक्राणूनाशकाचा अचूक वापर केल्यास जास्त उपयोगी आणि फायद्याचे ठरते. गर्भधारणा टाळण्यासाठी फक्त शुक्राणूनाशकाचा वापर केल्यास ते ७८ टक्के प्रभावी ठरते. म्हणजे शुक्राणूनाशकाचा वापर करणाऱ्या १०० पैकी २२ स्रिया दरवर्षी गर्भवती होण्याची शक्यता असते. इतर गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणे फक्त शुक्राणूनाशक वापरणे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे शुक्राणूनाशकासोबत इतर गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचादेखील सल्ला दिला जातो. जसे की, कंडोम, डायाफ्राम, गर्भाशय ग्रीवेची टोपी यांसारख्या गर्भनिरोधक पद्धतींचा तुम्ही आधार घेऊ शकता.
शुक्राणूनाशक गर्भनिरोधक पद्धती लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. उलट शुक्राणूनाशकाचा दिवसातून अनेकदा वापर केल्यास लैंगिक आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. शुक्राणूनाशकातील नॉनॉक्झिनॉल रसायनामुळे योनीमार्गात त्रास जाणवू शकतो. तसेच यामुळे लैंगिक आजार पसरवणारे जंतु शरीरात सहजरित्या प्रवेश करू शकतात. त्यामुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि गर्भधारणा टाळण्यासाठी शुक्राणूनाशकासोबत कंडोमचा वापर करणे योग्य ठरते. शुक्राणूनाशकांचा कंडोमवर परिणाम होत नाही, उलट या दोन पद्धती एकत्रितपणे उत्तम कार्य करतात. या दोन्ही पद्धती सोबत वापरल्यामुळे गर्भधारणा टाळणे आणि लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवणे सोपे होते. काही स्त्रियांना नोनोक्झिनॉल -९ हे रसायन वापरलेल्या शुक्राणूनाशकाचा त्रास जाणवू शकतो. हे रसायन संवेदनशील जननेंद्रियांच्या उतींना (टिश्यु) त्रास देऊ शकते. विशेषतः शुक्राणानाशकाच्या अतिवापरानंतर हा त्रास वाढू शकतो. शुक्राणूनाशक वापरल्यानंतर काही त्रास जाणवल्यास त्वरित आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुमची अडचण आणि त्रास समजावून घेतील. तसेच कुटुंब नियोजनासाठी दुसरी एखादी गर्भनिरोधक पद्धत सुचवतील.
फायदे
शुक्राणूनाशक ही वापरण्यास सोपी, परवडण्याजोगी आणि सोयीस्कर अशी कुटुंब नियोजन आणि गर्भनिरोधक पद्धती आहे. तुम्ही कोणत्याही मेडिकल दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे विकत घेऊ शकता. शुक्राणूनाशकाचे पाकीट किंवा डब्बी हाताळणे सोपे आहे. तुमच्या सोयीनुसार ती सोबत ठेवता येते. लैंगिक संबंधाआधी शुक्राणूनाशक योनीमध्ये लावावे लागते, मात्र यामुळे लैंगिक संबंधात कुठलाही व्यत्यय येत नाही. शुक्राणूनाशक ही संप्रेरक विरहित गर्भनिरोधक पद्घती असल्याने शरीरावर संप्रेरकांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
तोटे
शुक्राणूनाशकाच्या अचूक वापरावर गर्भधारणा टाळणे अवलंबून असते. लैंगिक संबंधावेळी शुक्राणूनाशक वापरणे आवश्यक असते. शुक्राणूनाशक लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. त्यामुळे लैंगिक आजारांपासून बचाव करण्यासाठी कंडोम वापरणे गरजेचे असते. काहींना शुक्राणूनाशकाच्या वापराने शारीरिक त्रास किंवा अलर्जीचा त्रास जाणवू शकतो. कधीकधी स्रीची योनी किंवा पुरुषाचे जननेंद्रिय (पिनस) या दोन्ही जागी त्रास होण्याची शक्यता असते. लैंगिक आजाराचा संसर्ग झाल्याने हा त्रास वाढलेला असू शकतो. त्यामुळे शुक्राणूनाशक वापरल्यानंतर काही त्रास जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. शुक्राणूनाशक हे क्रीम, जेल, फोम या स्वरुपात असल्याने काहींना त्याच्या चिकटपणाने विचित्र वाटू शकते. त्यामुळे आपल्याला सहन होणारी, योग्यरित्या वापरता येणारी गर्भनिरोधक पद्धती निवडण्याला प्राधान्य द्यावे. शुक्राणूनाशक गर्भनिरोधक पद्धतीचा त्रास होत असल्यास इतर गर्भनिरोधक व कुटुंब नियोजन पद्धतींचा वापर करून गर्भधारणा टाळण्यास प्राधान्य द्यावे.
गर्भनिरोधक स्पंज - प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत

गर्भनिरोधक स्पंज

गर्भनिरोधक स्पंज प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - प्रकार
प्रकार : प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती
गर्भनिरोधक स्पंज प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - प्रभावी
प्रभावी : ७६ ते ८८%
गर्भनिरोधक स्पंज प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : प्रत्येक वेळी
गर्भनिरोधक स्पंज प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत - लैंगिक आजारांपासून संरक्षण

लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही

गर्भनिरोधक स्पंज - प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत
गर्भनिरोधक स्पंज किंवा कधीकधी फक्त स्पंज म्हणून संबोधले जाणारे हे साधन प्लास्टिकचा एक गोल तुकडा असतो. ज्यामध्ये सहज दाबला जाईल असा सच्छिद्र फोम असतो. या स्पंजचा आकार डोनटसारखा असतो व त्याच्या एका बाजूला खळीसारखा छोटासा खड्डा असतो. हा गर्भनिरोधक स्पंज साधारणपणे २ इंच व्यासाचा असतो आणि त्याच्या वरच्या बाजूस नायलॉनची एक गाठ किंवा पट्टा असतो. ज्यामुळे लैंगिक संबंधांनंतर हा स्पंज योनीतून सहजपणे काढून टाकणे शक्य होते. लैंगिक संबंधापूर्वी गर्भनिरोधक स्पंज योनीच्या आता खोलवर टाकला जातो. हा स्पंज गर्भाशय ग्रीवेला पूर्णपणे झाकतो. या स्पंजमध्ये शुक्राणूनाशक असतात त्यामुळे शुक्राणूंना स्त्रीबीजांपर्यंत पोहोचता येत नाही. जेणेकरून गर्भधारणा टाळणे अधिक प्रभावी होण्यास मदत होते. गर्भनिरोधक स्पंज दोन प्रकारे कार्य करतात, प्रथम ते आपल्या गर्भाशय ग्रीवेवर घट्टपणे बसते. ज्यामुळे गर्भाशय ग्रीवा झाकली जाते. यामुळे शुक्राणू स्त्रीबीजांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. दुसऱ्या पद्धतीत स्पंजमध्ये असलेले शुक्राणूनाशक सक्रिय होतात. ज्यामुळे शुक्राणूंची हालचाल मंदावते. हालचाल मंदावल्याने ते स्रीबीजांपर्यंत पोहोचू शकत नाही. गर्भधारणा टाळण्याबरोबरच लैंगिक आजारापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही अतिरिक्त स्पंज किंवा कंडोमचा वापर करू शकता.
लैंगिक संबंधांपूर्वी हा स्पंज योनीमार्गात ठेवता येतो. फक्त हा स्पंज वापरण्यास सुरुवात करण्याआधी दोन चमचे स्वच्छ पाणी टाकून पिळून घ्यावा. त्यानंतर तो योनीमार्गात ठेवावा. स्पंजमधील पाणी शुक्राणूनाशकांना सक्रिय करते व शुक्राणुंविरूद्ध काम करण्यास त्यांना तयार करते. गर्भनिरोधक स्पंज कसा वापरावा याच्या सर्व सूचना पाकिटावर दिलेल्या असतात. त्या सूचनांचे पालन करून त्याचा वापर करावा. गर्भधारणा टाळण्यासाठी वापरला जाणारा हा स्पंज लैंगिक संबंधाच्या काहीवेळ आधी किंवा जास्तीत जास्त २४ तास आधी योनीमध्ये टाकता येऊ शकतो. हा स्पंज २४ तासांपेक्षा अधिक काळ योनीमध्ये ठेवू नये. लैंगिक संबंधांनंतर साधारण ६ तास हा स्पंज योनीमध्ये राहणे आवश्यक असते. अन्यथा तो गर्भधारणा टाळण्यासाठी प्रभावीपणे काम करत नाही. गर्भनिरोधक स्पंज पुन्हा वापरता येत नाही. हा स्पंज बाहेर काढून पुन्हा योनीमार्गात ठेवता येत नाही.
गर्भनिरोधक पद्धती म्हणून या स्पंजची प्रभावीतता आणि उपयुक्तता तुमच्या गर्भधारणा इतिहासावर अवलंबून असते. ज्यांनी यापूर्वी कधीही बाळाला जन्म दिलेला नाही आणि स्पंजचा उत्तमप्रकारे वापर केला आहे त्यांच्यासाठी ही पद्धत ९१ टक्के प्रभावी ठरते. याचा अर्थ हि गर्भनिरोधक पद्धती वापरणाऱ्या १०० महिलांपैकी ९ महिला गर्भवती होण्याची शक्यता असते. ज्या महिलांनी याआधी बाळाला जन्म दिलेला आहे त्यांच्यासाठी ही पद्धत ८० टक्के प्रभावी ठरते. बरेचदा स्पंजचा वापर करणे कठीण असते. म्हणजेच याचा वास्तविक विचार केल्यास ज्यांनी आधी बाळाला जन्म दिलेला नाही, त्यांच्यासाठी ही पद्धती सुमारे ८८ टक्के काम करते तर ज्यांनी याआधी बाळाला जन्म दिलेला आहे त्या स्त्रियांसाठी ही पद्धत ७६ टक्के काम करते. गर्भनिरोधक स्पंज लैंगिक आजारांपासून संरक्षण करत नाही. उलट शुक्राणूनाशकाच्या वापराने लैंगिक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोमसारख्या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच कंडोममुळे गर्भधारणा टाळण्यासाठी अजून एक कवच मिळते. गर्भनिरोधक स्पंज खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नसते. हा स्पंज बहुतेक स्त्रिंयासाठी सुरक्षित ठरतो. मात्र, काहींना त्याच्या आत असलेल्या शुक्राणूनाशकांचा त्रास होऊ शकतो. जर तुमचा नुकताच गर्भपात झाला असेल किंवा बाळाला जन्म दिला असेल, तसेच योनीमार्गात काही संसर्ग झाला असेल तर हा स्पंज न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच स्पंज वापरल्यानंतर ताप, पुरळ, अतिसार, उलट्या, घसा दुखणे, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारखी लक्षणे जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी त्वरित चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन मिळवा.
फायदे
हा स्पंज एकदा योनीमार्गात टाकल्यानंतर पुढील २४ तासांपर्यंत गर्भधारणा टाळण्याविषयी चिंतेचे कारण नसते. या २४ तासांत तुम्हाला हवे तेव्हा आणि हवे तितक्या वेळा तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता. हा स्पंज मेडिकल दुकानात सहजपणे उपलब्ध होतो तसेच त्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरच्या चिठ्ठीची गरज भासत नाही. सोयीस्कर असणाऱ्या गर्भनिरोधक पद्धतींपैकी ही एक गर्भनिरोधक पद्धती आहे. हा स्पंज आकाराने लहान, एका छोट्याशा पाकिटात मिळतो. त्यामुळे तो बॅग किंवा पर्समध्ये सहजपणे बाळगता येतो. हा स्पंज एकदा योनीमार्गात टाकल्यानंतर त्याचा लैंगिक संबंधात अडसर होत नाही.
तोटे
गर्भनिरोधक स्पंजचा अचूक वापर केल्यास गर्भधारणा टाळणे सोपे होते. त्यामुळे लैंगिक संबंधावेळी हा स्पंज वापरणे आवश्यक असते. गर्भनिरोधक स्पंज लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. त्यामुळे तुम्हाला कंडोम वापरणे अत्यंत गरजेचे असते. काहींना स्पंजमध्ये असलेल्या शुक्राणूनाशकाचा त्रास किंवा अलर्जी होऊ शकते. तसेच स्पंज वापरताना अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे गर्भनिरोधक स्पंज वापरल्यानंतर काही त्रास जाणवल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
गर्भवती होणे आणि बाळ होणे हा प्रत्येक स्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. परंतु, कधीकधी अनियोजित गर्भधारणा हा आनंद उपभोगू देत नाही. कारण अनियोजित गर्भधारणेमुळे त्या स्रीच्या भविष्यातील योजना, नियोजन हे सर्व विस्कळीत होते. तसेच अनियोजित गर्भधारणेमुळे सामाजिक, आणि आर्थिक पैलुंवर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच मूल कधी व्हावे यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. अनियोजित गर्भधारणा ही योग्य गर्भनिरोधक पद्धतीची निवड, योग्य कुटुंब नियोजन आणि वेळापत्रकाचे पालन यानुसार टाळली जाऊ शकते. तसेच योग्य गर्भनिरोधक पद्धतीमुळे आपल्याला मूल कधी हवे आहे याविषयी नियोजन करणे सोपे होते.
प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती शुक्राणू आणि स्रीबीज यांच्यामध्ये शारीरिक अडथळा निर्माण करते. ही गर्भनिरोधक पद्धती शुक्राणूंना स्रीबीजांपर्यंत पोहोचू देत नाही आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही. प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धती वापरण्यास सोपी असते आणि बहुतांश मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध होते. पुरुष कंडोम, स्त्री कंडोम आणि गर्भनिरोधक स्पंज हे एकदाच वापरता येतात. जर तुम्ही या पद्धतींपैकी एखादी पद्धत वापरत असाल तर प्रत्येक लैंगिक संबंधावेळी नवीन कंडोम किंवा स्पंज वापरावे. डायाफ्राम आणि गर्भाशय ग्रीवेची टोपी अनेकदा वापरता येते. मात्र, त्याची योग्य काळजी आणि स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. आपण वापरत असलेले डायाफ्राम आणि गर्भाशय ग्रीवेची टोपी इतर कुणाला वापरण्यास देऊ नये.
पुरुष कंडोम ही जगभरात सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी प्रतिबंधित गर्भनिरोधक पद्धत आहे. याची उपलब्धता आणि वापरण्यास सोपे असल्याने या गर्भनिरोधक पद्धतीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. पुरुष कंडोम आणि स्री कंडोम दोन्हीही लैंगिक आजारांपासून संरक्षण देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही इतर कोणतीही गर्भनिरोधक पद्धती वापरत असलात तरीही लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक पद्धतीचा किती अचूकपणे वापर केला जातो यावर त्याची परिणामकारकता अवलंबून असते. बहुतांश अनियोजित गर्भधारणा या गर्भनिरोधक पद्धतीचा योग्य वापर न केल्याने होतात. जर तुमचे लैंगिक जीवन अधिक प्रमाणात सक्रिय असेल तर तुम्ही दीर्घकालीन गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करण्याला प्राधान्य द्यावे.
लक्षात घ्या की, मूल होणे ही खूप आनंद देणारी आणि जीवनात बदल घडवून आणणारी घटना असते. त्यामुळे ही गोष्ट घरात आनंद देणारी ठरायला हवी ना की तणाव आणणारी. त्यामुळे आपल्या बाळाचे येणे अनियोजित ठेवू नका. त्याच्यासाठी योग्य योजना तयार करा आणि त्याच्या येण्याच्या आनंद साजरा करा. गर्भधारणा टाळण्यासाठी अचूक गर्भनिरोधक पद्धत निवडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या. ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य असलेली गर्भनिरोधक पद्धती सूचवतील आणि कुटुंब नियोजनाचे मार्गदर्शन करतील. या गर्भनिरोधक पद्धती आणि कुटुंब नियोजन पद्धतींबद्दल तुम्हाला जितकी माहिती असेल तितके तुम्ही तुमच्या लैंगिक आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता. गर्भधारणा नको असल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. गरोदरपणाचा आनंद घ्या हा सुंदर अनुभव तणावात घालवू नका.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय