डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती वापरून गर्भधारणा कशी टाळावी
गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती वापरून गर्भधारणा कशी टाळावी

हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती वापरून गर्भधारणा कशी टाळावी

पद्धती | परिणामकारकता | फायदे व मर्यादा

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती वापरून गर्भधारणा कशी टाळावी
संप्रेरक गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन पद्धती प्रामुख्याने मासिक पाळी चक्रादरम्यान संप्रेरक पातळीतील बदल नियमित करण्याचे काम करतात. या संप्रेरक पद्धतींमध्ये कृत्रिम संप्रेरकांचे विविध प्रकार वापरले जातात जे स्रीच्या शरीरात एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या उत्पादनाची नक्कल करतात. संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती अंतःस्रावी प्रणालीवर काम करतात, ही रासायनिक संदेशवाहक प्रणाली आहे ज्यामध्ये संप्रेरकांचा समावेश असतो. हा सजीवांचा असा एक गट असतो जो अवयवांना संकेत देण्यासाठी संप्रेरक वाहून नेण्याचे काम करतो. गर्भधारणा टाळण्यासाठी उपयोगी ठरणारी ही गर्भनिरोधक पद्धत सन १९६० पासून वापरली जाते आहे. गेल्या कित्येक वर्षात अनेक गर्भनिरोधक पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत. परंतु गर्भनिरोधक गोळी आणि इंजेक्शन या दोन पद्धती सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. जगभरातील सुमारे, १८ टक्के स्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी या संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करतात.
संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतींचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार संयुक्त असून यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हे दोन संप्रेरक एकत्रितपणे वापरले जातात. दुसरा प्रकार म्हणजे प्रोजेस्टेरॉन प्रकार. या प्रकारात केवळ प्रोजेस्टेरॉन किंवा प्रोजेस्टिनसारख्या कृत्रिम संप्रेरकाचा वापर होतो. संयुक्त संप्रेरक पद्धत ओव्हुलेशन म्हणजे अंडाशयातून स्रीबीज सोडण्याची प्रक्रिया थांबवते आणि गर्भाशयाच्या श्लेष्मा (गर्भाशयाच्या मुखाशी असलेला द्रवपदार्थ) घट्ट करते. प्रोजेस्टोजेन पद्धत ओव्हुलेशन म्हणजे अंडाशयातून स्रीबीज सोडण्याची वारंवारता कमी करते. या दोन्ही पद्धती अगदी वेगळ्या प्रकारे वापरल्या जात असल्या तरी त्या बहुतेक परिपक्व स्रीबीज अंडाशयाद्वारे सोडण्यापासून प्रतिबंधित करतात. गर्भधारणा रोखण्यासाठी संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती विश्वासार्ह आहे. परंतु, यामुळे मासिक पाळी दरम्यान कमी किंवा जास्त रक्तस्राव होणे, प्रचंड डोके दुखणे यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. विविध प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या, योनिमार्गात अंगठीसदृश्य पदार्थ, गर्भनिरोधक किंवा ट्रान्सडर्मल पॅचसह गर्भनिरोधक पद्धती असे अनेक प्रकार यात उपलब्ध आहेत.
या लेखात सर्व संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती आणि त्या किती प्रभावी आहेत यांची माहिती दिली आहे. तसेच या पद्धतींचा वापर करून गर्भधारणा कशी टाळता येईल याचीदेखील माहिती तुम्हाला मिळणार आहे.
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या

संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या

संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - प्रकार
प्रकार : संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - प्रभावी
प्रभावी : ९१%
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : दररोज
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या कधीकधी ज्यास फक्त गर्भनिरोधक गोळी म्हणूनदेखील संबोधले जाते. गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी दिवसातून एकदा घेता येते. या गोळीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके असतात. स्त्रीच्या अंडाशयात हे संप्रेरक समान प्रमाणात तयार केले जातात. गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित, परवडण्याजोग्या आणि प्रभावी मानल्या जातात. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या तोंडी घेतल्या जातात. या गोळ्या योग्य वेळापत्रकानुसार घेतल्यास गर्भधारणा रोखण्यासाठी मासिक पाळी चक्र आणि अंडाशयातून स्रीबीज रोखण्यासाठी बदल करतात. गर्भधारणा टाळण्यासाठी आणि कुटुंब नियोजन करण्यासाठी ही सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे.
एकत्रित गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोजेन संप्रेरक अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर सोडणे थांबवतात. स्रीबीजे गर्भाशयात सोडली नाही तर गर्भधारणा होत नाही. तसेच ही संप्रेरके गर्भाशय ग्रीवाच्या श्लेष्मादेखील दाट करतात, ज्यामुळे शुक्राणूंना स्रीबीजांपर्यंत पोहोचणे कठीण होते. अंडाशयातून स्रीबीज गर्भाशयात पोहोचले नाही तर गर्भधारणादेखील होत नाही. शुक्राणू आणि स्रीबीज यांचे मिलन होऊन स्रीबीज फलित झाले तर अशावेळी गर्भनिरोधक गोळ्या गर्भाशयाचे अस्तर पातळ करतात. ज्यामुळे फलित स्रीबीज गर्भाशयात थांबण्याची शक्यता कमी होते.
गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या ही एक प्रभावी संप्रेरक पद्धत आहे. जेव्हा गोळ्या योग्य प्रकारे म्हणजे वेळापत्रकानुसार घेतल्या जातात, तेव्हा गर्भधारणा टाळण्यासाठी ही पद्धत ९९ टक्के प्रभावी ठरते. म्हणजे गोळ्या घेणाऱ्या १०० स्त्रियांपैकी केवळ १ स्री गर्भवती होण्याची शक्यता असते. पण, प्रत्यक्षात हे वेळापत्रक पाळणे आणि त्यानुसार नियोजन करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे वास्तविक विचार केल्यास, गर्भधारणा टाळण्यासाठी ही पद्धत ९१ टक्के प्रभावी ठरते.
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्यांचे वेळापत्रक
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - संप्रेरक गोळ्या
२१ संप्रेरक गोळ्या
पाकिटातील सुरुवातीच्या २१ गोळ्या संप्रेरक गोळ्या असून यात दररोज एकावेळी एक गोळी घ्यावी लागते.
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या - स्मरणिका गोळ्या
स्मरणिका म्हणून ७ गोळ्या
२१ गोळ्यांनंतरच्या ७ गोळ्या संप्रेरक गोळ्या नसतात. ज्यामुळे वेळापत्रक पाळणे सोपे होते. या गोळ्या घेतल्या नाही तरीही चालते.
संयुक्त किंवा एकत्रित गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग मासिक पाळी थांबवण्यासाठी कसा करावा
जर तुम्हाला मासिक पाळी टाळायची असेल तर, तुम्ही शेवटच्या सात गोळ्या वगळून नवीन पाकिटातील गोळ्या घेणे सुरू करू शकता.
तुम्ही एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे वेळापत्रक कसे पाळले आहे यावर गर्भधारणा टाळणे अवलंबून असते. या गोळ्या साधारणपणे २८ किंवा २१ दिवसांच्या पाकिटात येतात. जर तुम्ही २८ दिवसांच्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर तुम्हाला रोज ठरवलेल्या वेळी एक गोळी घेणे आवश्यक आहे. पाकिटातील शेवटच्या सात गोळ्या वेगळ्या रंगाच्या असतात आणि त्यात कोणतेही संप्रेरक नसते. कधीकधी या सात गोळ्यांना स्मरणिका किंवा प्लेसबो गोळ्या म्हणून संबोधले जाते. या ७ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या नाहीत तरीही गर्भधारणा होण्यापासून तुमचा बचाव होतो. या गोळ्या घेण्याचा सल्ला अशा स्त्रियांना दिला जातो ज्यांना आपली दिनचर्येत सातत्य राखणे गरजेचे असते आणि या गोळ्यांतून त्यांना लोह किंवा इतर पूरक आहारदेखील मिळण्यास मदत होते. तसेच निरोगी राहण्यासदेखील मदत होते. जर २१ गोळ्यांचे पाकीट वापरत असाल तर, दररोज एक गोळी न विसरता घ्यावी. २१ गोळ्यांचे पाकीट संपल्यावर पुढील सात दिवस ब्रेक घ्या. गोळ्या घेत नसताना या सात दिवसात तुम्हाला मासिक पाळी येते. या सात दिवसांमध्ये गर्भधारणेपासून तुमचे संरक्षण होते. हे सात दिवस संपल्यानंतर पुढील पाकीट सुरू करा. आपल्या गोळ्या घेण्यामध्ये खंड पडू न देता त्यांचा आढावा घेण्यासाठी वेळापत्रकाचे पालन करा. जर तुम्हाला मासिक पाळी टाळायची असेल तर तुम्ही एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या सहजपणे वापरू शकता. २८ दिवसांच्या पाकिटामध्ये स्मरणिका किंवा प्लेसबो गोळ्या तुम्ही वगळू शकता आणि नवीन पॅक सुरू करू शकता. अशाप्रकारे तुम्ही नेहमी मासिक पाळी टाळू शकता किंवा काही कारणानिमित्त तुम्हाला मासिक पाळी टाळायची असेल तर ही पद्धत वापरू शकता. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्यांच्या पाकिटावरील सूचना काळजीपूर्वक वाचा. तुमची एखादी गोळी चुकली असेल तसेच गोळ्या घेण्याच्या इतर सूचनांचे पालन करण्यासाठी या सूचना फायदेशीर ठरतात.
मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण पाच दिवसांच्या आत गोळ्या घेणे सुरू केल्यास ही गर्भनिरोधक पद्धत त्वरित प्रभावी ठरते. इतर कोणत्याही दिवशी गोळ्या घ्यायला सुरुवात केल्यास गर्भधारणेपासून संरक्षण सुरू होण्यासाठी सात दिवस लागतात. तसेच या सात दिवसांत गर्भधारणा टाळण्यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करावा. एकत्रित गर्भनिरोधक पद्धती प्रभावी ठरण्यासाठी लैंगिक संबंध नसल्यावरही दररोज एक गोळी घेणे आवश्यक असते. गोळी घ्यायला विसरल्यास किंवा गोळ्या घेण्यास उशीर झाल्यास गर्भनिरोधक पद्धती कमी प्रभावी ठरतात. आपण केव्हा आणि किती गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास विसरलात यावर गर्भधारणेची शक्यता अवलंबून असते. एक दिवस गोळी न घेणे किंवा गोळी घेण्यास एक दिवस उशीरा सुरुवात करणे यात काही अडचण नसते. परंतु, तुम्ही दोन दिवस गोळ्या घेतल्या नाहीत किंवा गोळी सुरू करण्यास दोन दिवस उशीर केल्यास गर्भवती होण्याची शक्यता वाढते. पुढे काय करावे याबाबत शंका असल्यास किंवा खात्री नसल्यास गोळ्या घेणे सुरू ठेवा. गर्भधारणेपासून संरक्षण मिळण्यासाठी इतर काही गर्भनिरोधक पद्धतींचाही वापर करा. काही शंका किंवा प्रश्न असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने त्याचे काही दुष्परिणामदेखील सहन करावे लागतात. यातील काही दुष्परिणाम दोन ते तीन महिन्यांमध्ये कमीदेखील होतात. काही स्त्रियांना डोकेदुखी, मळमळ, स्तनांमध्ये वेदना, मासिक पाळीमध्ये हलका रक्तस्राव या गोष्टींचा अनुभव येतो. गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने तुमच्या मासिक पाळीचा कालावधी कमी होतो किंवा मासिक पाळी पूर्णपणे बंद होते. गोळ्या घेण्यास सुरुवात केल्यापासून दोन ते तीन महिन्यांनंतरही गोळ्यांचे दुष्परिणाम जाणवत असल्यास, मासिक पाळीत झालेला त्रास असह्य होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुम्हाला होणारा त्रास समजून घेऊन डॉक्टर दुसरी एखादी गर्भनिरोधक पद्धत किंवा दुसऱ्या ब्रँडची गोळी सुरू करण्याचा सल्ला देऊ शकतात.
गर्भनिरोधक गोळ्या घेणे जवळपास सर्व स्रियांसाठी सुरक्षित मार्ग आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून या गोळ्या गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्या जातात आणि करोडो स्रियांनी या पद्धतीचा वापर आजवर केला आहे. मात्र, काही क्वचित स्रियांना ही गर्भनिरोधक पद्धती सहन होत नाही. जर तुम्ही वयाची पस्तीशी ओलांडली असेल आणि धूम्रपानाची सवय असेल तर एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या घेणे तुमच्या शरीरास हानी पोहोचवू शकते. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही प्रोजेस्टिन गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू शकता. तसेच तुम्हाला रक्ताची गुठळी होणे, स्तनाचा कॅन्सर, हृदयविकारासंबंधित त्रास, अर्धशिशी, उच्च रक्तदाब, मधुमेह, यकृतासंबंधित काही आजार असल्यास एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या घेणे टाळावे. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या वापरणे सुरक्षित असले तरीही, त्यांचा अतिवापर शरीराला हानीकारक आहे. या गोळ्यांचा सातत्याने वापर केल्यास शारीरिक व्याधी सुरू होण्याचीदेखील शक्यता असते. या गोळ्यांचा सातत्याने वापर केल्यास हृदय विकार, हृदयविकाराचा झटका, रक्त्याच्या गुठळ्या होणे, यकृत किंवा पित्ताशयात गाठ होणे यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. लक्षात घ्या, हे आजार सर्वच स्त्रियांमध्ये उद्भवतात असे नाही, याचा प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे कोणतीही गर्भनिरोधक गोळी सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंब नियोजनासाठी ते तुम्हाला योग्य गोळी व योग्य गर्भनिरोधक पद्धती सुचवतील.
फायदे
जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे वेळापत्रक योग्यरित्या पाळले तर गर्भधारणा टाळण्यासाठी ही सर्वाधिक प्रभावी पद्धत ठरते. तसेच गर्भधारणा टाळण्याव्यतिरिक्त या गोळ्या काही शारीरिक फायदेदेखील देतात. या गोळ्या मासिक पाळीत येणारे पेटके, हलका रक्तस्राव या गोष्टी कमी करतात. तसेच या गोळ्यांमुळे एक्टोपिक म्हणजे मूळ स्थान सोडून होणाऱ्या गर्भधारणेचा धोकादेखील कमी होतो. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या मुरुम येणे, हाडे पातळ होणे, स्तन आणि अंडाशयातील गाठी, अंडाशयाचा कर्करोग, अंडवाहक नलिका, अंडाशय आणि गर्भाशयातील गंभीर संसर्ग, लोहाची कमतरता, मासिक पाळी येण्यापूर्वी दिसणारी लक्षणे यांसारख्या त्रासांपासून तुम्हाला दूर ठेवतात. बहुतांश स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेण्याला प्राधान्य देतात. कारण यामुळे मासिक पाळी नियमित होते व त्याचा अंदाज लावणे सोपे होते. तसेच मासिक पाळीत होणारे इतर त्रासदेखील कमी होतात. डॉक्टरांची चिठ्ठी दाखवून तुम्ही कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून या गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकता. या गोळ्या कमी खर्चिक असून त्या सोबत बाळगणेदेखील सोपे आहे. या गोळ्या लैंगिक संबंधांमध्ये व्यत्यत आणत नाहीत. तसेच या गोळ्या नियमितपणे घेतल्यास गर्भधारणा होण्यापासून नेहमी बचाव होतो. ज्यावेळी गर्भधारणा करण्याची इच्छा असेल तेव्हा या गोळ्यांचे सेवन थांबवता येते. गोळ्या घेणे थांबविल्यानंतर प्रजनन क्षमतादेखील लगेच परत येते. सुरुवातीचे काही महिने मासिक पाळीत अनियमितता जाणवू शकते. परंतु, गोळ्या घेणे थांबवल्यानंतर गर्भवती होण्याची सामान्य स्थिती लगेच पूर्ववत होते.
तोटे
या गर्भनिरोधक पद्धतींचा प्रभावीपणा आपण गोळ्यांचे वेळापत्रक कसे पाळले आहे यावर अवलंबून असतो. या गर्भनिरोधक गोळ्या दररोज घेणे आवश्यक असते. गोळी घेणे थांबवल्यानंतर एक दिवसात तिचा प्रभावीपणा कमी होऊन गर्भधारणेपासून मिळणारे संरक्षण कमी होते. तुमचे दैनंदिन वेळापत्रक व्यस्त असेल तर, कधीकधी गोळी घेण्याचा विसरदेखील पडतो. त्यामुळेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी जसे की, फोनचा चार्जर, सौंदर्य प्रसाधने यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंसोबत गोळ्या ठेवा. जेणेकरून गोळी घेणे लक्षात राहील व वेळापत्रक योग्यरित्या पाळले जाईल. या गर्भनिरोधक पद्धती संप्रेरक समावेशित आहेत आणि शरीरावर त्यांचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. यामध्ये हलका रक्तस्राव, स्तनांमध्ये खाज सुटणे किंवा मळमळ होणे यांसारख्या गोष्टी अनुभवास येऊ शकतात. हा त्रास सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यात कमी व्हायला हवा. तसे न झाल्यास किंवा त्रास अधिक वाढल्यास आपल्या डॉक्टरांशी संवाद साधा. तसेच गर्भनिरोधक गोळ्या थांबवण्याआधी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करायला सुरुवात करा. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर आरोग्याच्या गंभीर समस्या अगदी क्वचित स्रियांमध्ये उद्भवू शकतात. जर तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळा त्रास जाणवत असेल, शरीरात काही बदल जाणवत असेल तर अशावेळी त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक आजारांपासून संरक्षण करीत नाहीत. लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोमसारख्या इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स)

केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स)

केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) - प्रकार
प्रकार : संप्रेरक गर्भनिरोधक पद्धत
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) - प्रभावी
प्रभावी : ९१%
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : दररोज
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स)
प्रोजेस्टोजेन गोळ्या किंवा प्रोजेस्टिन गोळ्या ह्या गर्भनिरोधक गोळ्या असून त्यात प्रोजेस्टोजेन संप्रेरक असतात. एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या सारखे यात एस्ट्रोजेन संप्रेरक नसते. प्रोजेस्टोजेन गोळी ही दररोज घ्यावी लागते. यामध्ये एका पाकिटात २८ गोळ्या असतात. यामध्ये संप्रेरक नसलेल्या किंवा स्मरणिका गोळ्या नसतात. गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्हाला दररोज एक गोळी ठरलेल्या तीन तासांच्या आत घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी आठ वाजता प्रोजेस्टोजेन गोळी घेतली असेल तर गर्भधारणेपासून संरक्षण मिळवण्यासाठी पुढील दिवसांच्या गोळ्यादेखील सकाळी आठ ते अकरा या वेळेतच घेणे आवश्यक आहे. सकाळी अकरा वाजेनंतर गोळी घेतल्यास गर्भवती होण्याची शक्यता वाढू शकते. ही गर्भनिरोधक पद्धत काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास गर्भधारणा टाळण्यात ती प्रभावी ठरू शकत नाही. अलार्म किंवा स्मरणपत्र हे गोळी घेण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे गोळी घेण्यासाठी सोयीस्कर वेळ निवडा आणि त्यानुसार अलार्म सुरू करा. तसेच आपल्या दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू म्हणजे मोबाइल चार्जर, पाकीट, पर्स इत्यादी साहित्यासोबत ही गोळी बाळगल्यास गोळी घेण्याविषयी लक्षात राहील व तिचे वेळापत्रक पाळले जाईल.
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) वेळापत्रक
२८ गोळ्यांचे केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक पद्धती (पीओसी / मिनी-पिल्स) पाकीट
२८ गोळ्यांचे पाकीट. रोज एक गोळी तीन तासांच्या ठरलेल्या टप्प्यात घेणे गरजेचे
केवळ प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्यांच्या (पीओसी / मिनी-पिल्स) तीन तासांचे महत्व
तीन तासांचे महत्व
तीन तासांच्या आत [सुरक्षित]
गोळी घेण्याची वेळ चुकली आहे. परंतु, वेळ चुकून तीन तास पूर्ण झाले नसल्यास त्वरित गोळी घ्यावी. कारण, या तीन तासांपर्यंत तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित राहतात.
तीन तासांहून अधिक काळ [असुरक्षित]
गोळी घेण्यास उशीर झाला असल्यास किंवा तीन तासांचा महत्त्वाचा टप्पादेखील उलटून गेला असल्यास त्वरित गोळी घ्यावी. मात्र, पुढील ४८ तास तुम्ही गर्भधारणा होण्यापासून सुरक्षित रहात नाहीत.
प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळीचा पूर्णपणे प्रभाव होण्यासाठी ठरलेल्या वेळेत किंवा पुढील तीन तासांच्या टप्प्यात ही गोळी घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गोळी घेण्याचे विसरलात किंवा गोळी घेण्यास उशीर केलात तर त्याचा परिणाम थेट गर्भधारणा टाळण्याच्या शक्यतेवर होतो. तुम्ही नियमित वेळेत गोळी घ्यायला विसरलात तरीही तुमच्या हातात पुढील तीन तासांचा वेळ असतो. त्यामुळे या पुढील तीन तासांत गोळी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे गर्भधारणेपासून तुम्ही सुरक्षित राहतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही काल सकाळी आठ वाजता गोळी घेतली असेल आणि आज सकाळी आठ वाजता गोळी घ्यायला विसरला असणार तर हरकत नाही. पुढील तीन तासांच्या आत म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत गोळी घ्यायला हवी कारण या कालावधीपर्यंत तुम्ही गर्भधारणा होण्यापासून सुरक्षित असतात. परंतु, जर तुम्ही पुढील तीन तासांत गोळी घेतली नाही तर तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळत नाही तरीदेखी तुमच्या जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा लागच गोळी घ्या. गोळी घेणे बंद करू नका. पुढील गोळी तुमच्या नियमित वेळेतप्रमाणे घ्या (वरील दिलेल्या उदाहरणामध्ये सकाळी ८:३० वाजता) व ते वेळापत्रक पाळा. लक्ष्यात ठेवा कि जर तुमचा ३ तासांचा ठरलेला कालावधी चुकला तर तुम्ह पुढच्या दोन दिवसांसाठी (४८ तासांसाठी) गर्भधारणा होण्यापासून सुरक्षित नाही आहात. त्यामुळे, गर्भधारणा टाळण्यासाठी या काळात इतर गर्भनिरोधक पद्धतींचादेखील वापर करा.
प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्या बहुतांश महिलांसाठी सुरक्षित असतात. काही ठराविक महिलांना या गोळ्यांचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात किंवा त्यांचा त्रास जाणवतो. तुम्ही गर्भवती असाल, एखाद्या व्याधीसाठी औषधोपचार घेत असाल, हृदयासंबंधी काही त्रास असेल, यकृत किंवा स्तनाचा कॅन्सर यांसारख्या आजारांचा सामना करीत असाल तर प्रोजेस्टोजेन गोळ्या तुमच्यासाठी सुरक्षित नसतात. त्यामुळे या गोळ्यांचे सेवन सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. तपासणी केल्यानंतर किंवा तुमचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतल्यानंतर डॉक्टर तुम्हाला काही व्याधी आहे की नाही, तसेच या गोळ्या तुमच्या शरीराला सहन होतील की नाही याविषयी मार्गदर्शन करतात. जर तुम्ही तंदरुस्त असाल आणि तुम्हाला इतर कोणत्या व्याधीसाठी औषधोपचार सुरू नसेल तर गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही या गोळ्या घेणे सुरू करू शकता. या गोळ्या साधारणपणे रजोनिवृत्ती काळापर्यंत किंवा वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत सुरू ठेवता येतात. प्रोजेस्टोजेन गोळ्यांमुळे अंडाशयावर असलेल्या द्रवाच्या गाठी विकसित होऊ शकतात. तसेच एकत्रित गर्भनिरोधक गोळ्यांचे जे परिणाम जाणवतात तेच परिणाम प्रोजेस्टोजेन गोळ्या घेतल्यानंतर जाणवतात. पण, हे दुष्परिणाम होण्याची शक्यता फार दुर्मिळ असते. त्यामुळे या गोळ्या सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने आपल्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धती योग्य आहे हे ठरवावे.
फायदे
प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्या आणि एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या दोन्हींचेही फायदे सारखेच आहेत. ही गोळीदेखील सोयीस्कर, सुरक्षित आणि सोपी आहे. ही अशी गर्भनिरोधक पद्धत आहे ज्यासाठी कुठलीही वैद्यकीय प्रक्रिया किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसते. तसेच या गोळ्या घेणे कधी सुरू करावे व कधी थांबवावे हा निर्णय पूर्णतः तुमचा असतो. स्तनपान सुरू असतानादेखील या गोळ्या घेता येऊ शकतात. काही स्रियांना अलर्जीचा त्रास असतो किंवा एस्ट्रोजेन संप्रेरकामुळे काही शारीरिक व्याधीदेखील उद्भवू शकतात. (जे एकत्रित गर्भनिरोधक गोळ्या, गर्भनिरोधक पट्टी किंवा योनीतील रिंगमध्ये असते) प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये एस्ट्रोजेन संप्रेरक नसल्याने ती गोळी अशा महिलांसाठी सुरक्षित असते. तुम्हाला धुम्रपान करण्याची सवय असेल किंवा वयाच्या कोणत्याही टप्प्यात असलात तरीही या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. (परंतु, डॉक्टर धुम्रपान टाळण्याचा सल्ला देतात कारण याचा परिणाम थेट गर्भधारणेवर, प्रजनन क्षमतेवर होतो. तसेच आरोग्यविषयक गंभीर समस्यादेखील यामुळे उद्भवतात) प्रोजेस्टोजेन गोळ्यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच मूड स्विंग्ज आणि मासिक पाळी येण्यापूर्वी होणारा त्रासदेखील या गोळ्यांमुळे कमी होण्यास मदत होते.
तोटे
प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास मासिक पाळीचा कालावधी बदलू शकतो. काही स्त्रियांना हा बदल स्वीकारणे कठीण जाते. प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळेच तुम्ही वेळापत्रक जितके नियमित पाळणार तितकीच गर्भधारणा टाळणे प्रभावी होते. प्रोजेस्टोजेन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास त्वचेवर डाग, स्तन कोमल होणे, डोकेदुखी होणे यांसारख्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. गोळ्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच आपल्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धत योग्य आहे, गर्भधारणा टाळण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा, कुटुंब नियोजन कसे करावे याविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या.
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती

ट्रान्सडर्मल पॅच

ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९१%
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : आठवड्यातून एकदा
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
ट्रान्सडर्मल पॅच - हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती
टीप : हवामानाच्या परिस्थितीचा विचार करून भारतात ट्रान्सडर्मल पॅचची शिफारस केलेली नाही. वातावरणातील तापमान आणि परिणामी घामामुळे त्वचेवर ठिपके खूप कठीण राहतात. तुमची गर्भनिरोधक पद्धत म्हणून ट्रान्सडर्मल पॅच वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ट्रान्सडर्मल पॅच किंवा गर्भनिरोधक पॅच अगदी चकचकीत प्लास्टरसारखे दिसते. हा पॅच ५ सेंटीमीटर x५ सेंटीमीटर आकाराचा लहान, चौकोनी आणि बेज रंगाचा पॅच असतो. साधारणपणे एका पाकिटात तीन पॅच येतात. गर्भधारणा टाळण्यासाठी ही एक सोपी गर्भनिरोधक पद्धत आहे. यामध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्या त्वचेवर हा पॅच चिकटवला जातो. हा पॅच आपले पोट, हाताच्या वरचा भाग, पाठ, नितंब या भागांवर चिकटवावा. जेव्हा हा पॅच चिकटवला जातो तेव्हा त्वचा कोरडी आणि स्वच्छ करून घ्यावी. त्वचेवर कोणतीही क्रीम, लोशन किंवा सौंदर्य प्रसाधन लावू नका. पॅचच्या चिकट भागाला स्पर्श करू नका. पॅच त्वचेवर ठेवल्यानंतर तो दाबा आणि १० सेकंदांपर्यंत धरून ठेवावा. जेणेकरून तो पूर्णपणे चिकटतो. हा पॅच पूर्णपणे चिकटला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. घाम आल्यानंतर किंवा पोहल्यानंतर किंवा अंघोळ करताना हा पॅच निघत नाही. फक्त पॅच चिकटलेला आहे की नाही याची रोज खात्री करावी.
ट्रान्सडर्मल किंवा गर्भनिरोधक पॅचमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोजेन संप्रेरक असतात. हे संप्रेरक स्रियांच्या अंडाशयात तयार होणारे हे समान संप्रेरक असतात. ट्रान्सडर्मल पॅच ही एक संप्रेरक गर्भनिरोधक पद्धत असून या पॅचमधील संप्रेरक त्वचेद्वारे आपल्या रक्तप्रवाहात सोडले जातात. हे संप्रेरक अंडाशयाला स्रीबीज बाहेर सोडण्यापासून थांबवून गर्भधारणा रोखतात. ते गर्भाशय ग्रीवेच्या श्लेष्मादेखील दाट करतात. ज्यामुळे शुक्राणू आणि स्रीबीज यांचे मिलन होणे कठीण होते.
प्रभावीपणे गर्भधारणा टाळणे हे हा पॅच आपण किती अचूकपणे वापरता यावर अवलंबून असते. जेव्हा या गर्भधारणा पॅचचा उत्तमप्रकारे वापर केला जातो तेव्हा हि पद्धत गर्भधारणा टाळण्यासाठी ९९ टक्के प्रभावी ठरते. एक आठवडा संपला की पॅच बदलणे आवश्यक आहे. तसेच ज्या जागी तो चिकटवला आहे तेथे आहे की नाही याची खात्री करीत राहणे गरजेचे आहे. वास्तविक विचार करता कोणतीही गर्भनिरोधक पद्धती परिपूर्ण नसते, त्यामुळे ट्रान्सडर्मल पॅच ९१ टक्के प्रभावी मानला जातो. गर्भनिरोधक पॅचचा प्रभाव काही औषधांमुळे कमी होऊ शकतो जसे की, अँटीबायोटिक्स रिफाम्पिन, रिफाम्पिसिन आणि रिफामेट, अँटीफंगल ग्लिसोफुलविन आणि एचआयव्ही यांसारखी औषधे याचा प्रभावीपणा कमी करू शकतात. गर्भनिरोधक पॅच वापरणे सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे.
आपण पॅच वापरण्यास केव्हा सुरुवात केली यावर त्याचा प्रभावीपणा अवलंबून असते. मासिक पाळी सुरू होण्याच्या पहिल्या पाच दिवसात पॅच चिकटवल्यास तुम्हाला गर्भधारणेपासून त्वरित संरक्षण मिळते. जर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी पहिला गर्भनिरोधक पॅच लावला तर सुरुवातीचे सात दिवस तुम्हाला गर्भधारणेपासून संरक्षण मिळणार नाही. अशावेळी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करावा. जर तुमचे मासिक पाळी चक्र २३ दिवसांपेक्षा कमी असेल अशा परिस्थितीत गर्भनिरोधक पॅच पाचव्या दिवशी लावणे सोयीस्कर ठरत नाही. जर याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. गर्भनिरोधक पॅचचा वापर कधी सुरू करावा, या पॅचमुळे गर्भधारणेपासून संरक्षण मिळते की नाही, तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी इतर काही गर्भनिरोधक पद्धतींचा फायदा होईल का याविषयी देखील डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील.
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतीचे वेळापत्रक
ट्रान्सडर्मल पॅच बदलण्याचा दिवस
पॅच बदलण्याचा दिवस
प्रत्येक पॅच सात दिवसांसाठी प्रभावी असतो. सात दिवस पूर्ण झाल्यानंतर जुना पॅच काढून नवीन पॅच लावणे आवश्यक असते.
ट्रान्सडर्मल पॅचमुक्त आठवडा
पॅचमुक्त आठवडा
तीन आठवडे पॅच वापरल्यानंतर चौथ्या आठवड्यात पॅच वापरायचा नसतो. हा आठवडा पॅचमुक्त असून या आठवड्यात तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित असतात.
ट्रान्सडर्मल पॅच हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतीचा उपयोग मासिक पाळी थांबवण्यासाठी कसा करावा
ट्रान्सडर्मल पॅचचा वापर करून मासिक पाळी टाळू इच्छित असाल तर चौथ्या आठवड्यातदेखील पॅच लावावा. सात दिवस पूर्ण झाल्यानंतर पॅच बदलणे लक्षात ठेवा.
गर्भनिरोधक पॅच पाकिटात तीन पॅच येतात. पहिला पॅच लावल्यानंतर तो तुमचा पॅच बदलण्याचा दिवस बनतो. उदाहरणार्थ, सोमवारी पॅच लावल्यास पुढील सोमवारी पहिला पॅच काठून दुसरा पॅच लावावा. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पॅच ठेवू नका. यामुळे गर्भधारणा रोखणे कठीण होईल. पहिला पॅच लावल्यानंतर तीन आठवडे ठरलेल्या दिवशी बदलण्याची आठवण ठेवा. चौथा आठवडा म्हणजे पॅचमुक्त आठवडा असतो. हे असे सात दिवस असतात की ज्यात तुम्हाला पॅच लावण्याची गरज भासत नाही. या दिवसांमध्ये तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित राहतात आणि या आठवड्यात तुमची मासिक पाळीदेखील येते.. मासिक पाळी टाळायची असल्यास तुम्ही चौथ्या आठवड्यातदेखील पॅच वापरू शकता. तीन आठवड्यांचे पॅच वापरून झाल्यानंतर लगेचच नवीन पॅक वापरण्यास सुरुवात करा. जेव्हा तुम्ही मासिक पाळी टाळण्यासाठी पॅच वापरता तेव्हा पहिल्या सहा महिन्यांपर्यंत कधीकधी रक्तस्राव किंवा हलका रक्तस्राव होऊ शकतो. ही गोष्ट पूर्णपणे सामान्य असून काही दिवसांनी ही समस्या कमी होते.
ट्रान्सडर्मल पॅचच्या ४८ तासांचे महत्व
४८ तासांचे महत्व
४८ तासांपेक्षा कमी [सुरक्षित]
तुमच्या पॅच दिवसादरम्या जर पॅच ४८ तासांपेक्षा कमी वेळ शरीरावर नसेल तर लगेचच नवीन पॅच लावा. ह्या ४८ तासांमध्ये तुम्ही गर्बहुधारणेपासून सुरक्षित आहात.
४८ तासांपेक्षा जास्त [असुरक्षित]
जर पॅच ४८ तासांपेक्षा जास्त काळ शरीरावर नसेल तर नवीन पॅच लावावा. नवीन पॅच बदलण्याचा दिवस ठरवा. नवीन वेळापत्रकाचे काटेकोर पालन करा. पुढील ७ दिवस आपण गर्भधारणेपासून सुरक्षित नाही.
गर्भनिरोधक पॅच खूप चिकट असतो आणि तो सहजासहजी शरीरावरुन निघून जात नाही.. परंतु, हा पॅच शरीरावर काही काळ नसला तर गर्भधारणेपासून तुम्ही सुरक्षित आहात की नाही याबद्दल प्रश्न पडतो. हा पॅच किती काळ तुमच्या शरीरावर नव्हता यानुसार या प्रश्नाचे उत्तर मिळते. शरीरावर पॅच ४८ तासांपेक्षा कमी काळ नसेल तर तुम्ही अद्याप गर्भधारणेपासून सुरक्षित आहात. ४८ तासांपेक्षा कमी काळ पॅच शरीरावर नसल्याचे लक्षात आल्यास त्वरित नवा पॅच शरीरावर चिकटवावा. आपल्या नियमित पॅच बदलण्याच्या दिवशी तुम्ही पॅच बदलत राहिलात, पॅच बदलण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले तर तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित राहतात. जर पॅच ४८ तासांपेक्षा अधिक काळ शरीरावर नसेल तर तुम्हाला पॅचचे नवीन चक्र सुरू करावे लागते. अशावेळी पॅच सायकल पुन्हा सुरू करा. ज्या दिवशी तुम्ही नवीन पॅच शरीरावर लावाल तो दिवस पॅच बदलण्याचा दिवस ठरेल. तसेच आठवड्याच्या वेळापत्रकानुसार पुढील दोन पॅच लावा. जर तुम्ही कोणतेही नवीन पॅचचे चक्र चालू करत असाल तर पुढील सात दिवस तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित नसतात. त्यामुळे या कालावधीत लैंगिक संबंध ठेवताना इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. तसेच तुम्ही पॅच लावण्यास विसरलात तर अशावेळीदेखील इतर गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. जर तुम्ही पॅच लावण्यास विसरलात आणि त्यास ४८ तासांचा कालावधी उलटला नसेल तर त्वरित पॅच चिकटवा. यामुळे गर्भधारणेपासून संरक्षण मिळण्याबरोबर तुमचे पॅच लावण्याचे चक्रदेखील तुटत नाही. शरीरावरील पॅच निघून ४८ तास उलटून गेले असतील तर पॅचचे जुने चक्र तोडून नवीन गर्भनिरोधक पॅच चक्र वापरण्यास सुरुवात करा. तसेच पुढील सात दिवसांत लैंगिक संबंध ठेवताना इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा.
ट्रान्सडर्मल पॅच ही गर्भनिरोधक पद्धती बहुतांश महिलांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित पद्धत असते. परंतु, काही स्रियांमध्ये वेन्स थ्रोम्बोसिस (अशुद्ध रक्तवाहिन्यांचा विकार), आर्टेरिअल थोम्ब्रोसिस (रक्तवाहिनीत गुठळी होणे), हृदयविकाराचा झटका यांसारखे विकार विकसित होऊ शकतात. जर तुम्हाला रक्तवाहिन्यांतील गुठळ्यांचा त्रास असेल तर तुम्ही गर्भनिरोधक पॅच वापरणे टाळायला हवे. सुरुवातीचे एका वर्षात थोम्ब्रोसिसचा धोका जास्त असतो. विशेषतः ज्या स्त्रियांना धूम्रपानाची सवय असते, ज्यांचे वजन जास्त असते, ज्यांची बराच काळ शारीरिक हालचाल नसते, ज्या व्हीलचेअरचा वापर करतात किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस कमी वयात रक्तवाहिन्यांसंबंधी काही विकार असतो अशा स्त्रियांमध्ये हा त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही धूम्रपान करीत असाल, मधुमेही असाल, तणावात असाल, वजन मर्यादेपेक्षा जास्त असेल, अर्धशिशीचा त्रास असेल तर अशावेळी ट्रान्सडर्मल पॅच वापरणे सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, पायांना वेदनादायी सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, खोकल्यातून रक्त येणे, हात आणि पायात वेदना जाणवणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, अर्धशिशी, बेशुद्ध होणे, बोलताना किंवा वाचताना अडथळा येणे, काविळीची लक्षणे दिसणे यांसारखे त्रास जाणवल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. ही सर्व लक्षणे किंवा अशाप्रकारचे विकार फार क्वचित महिलांमध्ये जाणवतात. त्यामुळे ट्रान्सडर्मल पॅच गर्भनिरोधक पद्धत वापरणे सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाने कोणती पद्धत आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवावे.
फायदे
गर्भधारणा टाळण्यासाठी ट्रान्सडर्मल पॅच पद्धती अतिशय सुरक्षित, सोयीस्कर, साधी पद्धत आहे. हा पॅच वापरण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळून अनियोजित गर्भधारणा टाळता येते. गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची रोज आठवण ठेवणे गरजेचे असते. मात्र, या गर्भनिरोधक पद्धतीमध्ये पॅच रोज बदलावा लागत नाही. आठवड्यातून एकदाच पॅच बदलावा लागतो. आपल्याला जेव्हा मूल हवे आहे त्यावेळी हा गर्भनिरोधक पॅच वापरणे तुम्ही बंद करू शकता. हा पॅच वापरणे बंद केल्यावर साधारण एक-दोन महिन्यांत तुमची मासिक पाळी पूर्ववत होऊन तिचा सामान्य कालावधी सुरू होतो. गर्भनिरोधक गोळ्यांसारखे संप्रेरक पोटाद्वारे शोषले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला उलट्या, अतिसार यांसारखा त्रास झाल्यास त्याचा पॅचवर परिणाम होत नाही. गर्भनिरोधक पॅच मासिक पाळी नियमित करण्याबरोबर मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यास मदत करतो. या पॅचचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. मुरुम, हाडे पातळ होणे, स्तन आणि अंडाशयात गुठळी होणे, एक्टोपिक गर्भधारणा, गर्भाशय श्लेष्मा आणि अंडाशयाचा कर्करोग, अंडाशयात गंभीर संसर्ग, अंडवाहक नलिका आणि गर्भाशयात संसर्ग, अशक्तपणा, लोहाची कमतरता, मासिक पाळीपूर्वीची लक्षणे कमी करण्यास किंवा प्रतिबंधित करण्यास मदत करते.
तोटे
गर्भनिरोधक पॅच बदलण्याच्या वेळापत्रकाचे तुम्ही कसे पालन करतात यावर त्याचा प्रभावीपणा अवलंबून असतो. तुम्ही वेळापत्रक जितके नियमित पाळतात तितकेच गर्भधारणेपासून संरक्षण मिळते. हा गर्भनिरोधक पॅच वेळेवर बदलणे आवश्यक असते. गर्भनिरोधक पॅच हा शरीरावर चिकटवलेला असल्याने दिसून येतो त्यामुळे काही महिलांना मोकळेपणाने वावरताना अडचण येऊ शकते. पॅचमुळे मासिक पाळीत बदल होणे, स्तन कोमल होणे, डोकेदुखी, मळमळ आणि कधीकधी रक्तस्राव होणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. काही स्रियांना ज्या जागी पॅच लावला आहे त्या जागी वेदना जाणवतात. परंतु, ही सर्व लक्षणे दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत दूर होणे आवश्यक आहे. पॅच लावलेल्या जागी जळजळ जाणवते. मात्र त्यात घाबरून जाण्याचे कारण नाही. गर्भनिरोधक पॅचमुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळत नाही. लैंगिक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कंडोमसारख्या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करावा.
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती

गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग

गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - प्रकार
प्रकार : संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - प्रभावी
प्रभावी : ९१%
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - किती वेळा वापरावी लागते
किती वेळा वापरावी लागते : तीन आठवड्यातून एकदा
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती - लैंगिक आजारांपासून संरक्षण
लैंगिक आजारांपासून संरक्षण : नाही
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती
गर्भनिरोधक रिंगला योनिमार्गातील अंगठीसदृश्य पदार्थ म्हणूनदेखील संबोधले जाते. ही एक प्लास्टिकची लहान रिंग असते जी गर्भधारणा रोखण्यासाठी आपल्या योनीमध्ये ठेवली जाते. हे पॉलिथिलीन विनाइल एसिटेटचे स्पष्ट व लवचिक वलय असते. ज्याची जाडी ४ मिलीमीटर व व्यास ५.५ सेंटीमीटर इतका असतो. इतर संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणेच, योनीमार्ग रिंगमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोजेन संप्रेरक असतात. हे तेच संप्रेरक असतात जे आपले शरीर तयार करत असते. आपल्या योनीमध्ये एकदा रिंग टाकल्यानंतर ती हळूहळू संप्रेरक सोडते. जे नंतर आपल्या योनिमार्गाच्या अस्तरांद्वारे शोषले जातात. योनिमार्गाच्या रिंगद्वारे सोडलेले संप्रेरक अंडाशयातून स्रीबीजांना बाहेर सोडण्यापासून रोखून गर्भधारणा टाळण्याचे कार्य करतात. अंडाशयातून स्रीबीज बाहेर न पडल्याने शुक्राणू आणि स्रीबीज यांचे मिलन होत नाही. परिणामी स्रीबीज फलित होत नाही व गर्भधारणादेखील होत नाही. हे संप्रेरक गर्भाशयाच्या मुखाजवळ असलेल्या श्लेष्मादेखील दाट करतात. ज्यामुळे शुक्रांणूना स्रीबीजांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. काही शुक्राणू आणि स्रीबीजाचे मिलन झाले तरीही या संप्रेरकांनी गर्भाशयाचे अस्तर पातळ केलेले असते. त्यामुळे फलित अंड्याची वाढ होणे फार कठीण होऊन जाते.
योनीमार्गातील रिंग ही गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक प्रभावी पद्धत आहे. गर्भधारणा प्रभावीपणे कशी टाळायची हे तुमचे वय किती आहे, तुम्ही किती वेळा लैंगिक संबंध ठेवता, गर्भनिरोधक पद्धतींचे वेळापत्रक योग्य प्रकारे पाळता की नाही यावर अवलंबून असते. गर्भधारणा टाळण्यासाठी योनिमार्ग रिंगचा वापर केल्यास ती ९९ टक्के प्रभावी ठरते. म्हणजेच या रिंगचा वापर करणाऱ्या १०० स्रियांपैकी फक्त १ स्री वर्षभरात गर्भवती होण्याची शक्यता असते. खरंतर, गर्भनिरोधक पद्धतींचे वेळापत्रक पाळणे आणि रिंगचा अचूक वापर करणे हेदेखील आव्हानच आहे. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी ही पद्धत ९१ टक्के प्रभावी मानली जाते. अँटीबायोटिक्स रिफाम्पिन, रिफाम्पिसिन आणि रिफामेट, अँटीफंगल ग्रिसिओफुलविन आणि एचआयव्ही औषधे यासारख्या काही विशिष्ट औषधांमुळे गर्भनिरोधक रिंगच्या प्रभावीपणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भनिरोधक रिंगचा वापर सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांविषयी त्यांना माहिती द्या. तुमचे डॉक्टर याविषयी मार्गदर्शन करतील तसेच तुमच्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धती योग्य आहे याविषयी मार्गदर्शन करतील.
आपण गर्भवती नसल्यास किंवा गर्भधारणा टाळण्याची इच्छा असल्यास मासिक पाळी दरम्यान कोणत्याही दिवशी योनीमार्गातील रिंगचा वापर सुरू करू शकता. जर तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत रिंग वापरणे सुरू केले तर गर्भधारणा होण्यापासून तुम्हाला त्वरित संरक्षण मिळते. तसेच इतर कोणत्याही दिवशी रिंग वापरण्यास सुरुवात केली तर गर्भधारणा रोखणे प्रभावी होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी लागतो. या दिवसांमध्ये गर्भधारणेपासून संरक्षण मिळवण्यासाठी इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी २३ किंवा त्यापेक्षा कमी दिवसांचा असेल तर पाचव्या दिवसांपर्यंत रिंग लावण्याची वाट पाहू नका. पाचव्या दिवशी रिंग टाकल्यास गर्भधारणेपासून संरक्षण होण्याची शक्यता कमी होते. रिंग कधीपासून आणि कशी वापरावी याविषयी काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच आपण गर्भधारणेपासून सुरक्षित आहोत की नाही हे जाणून घेण्यासाठी व गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवा.
Cगर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग हार्मोनल किंवा संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतीचे वेळापत्रक
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग वापरण्याचे दिवस
रिंग वापरण्याचे दिवस
ज्या दिवशी योनीमार्गात रिंग टाकली जाते त्या दिवसापासून पुढील २१ दिवस तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित असतात.
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग काढण्याचे दिवस
रिंग काढण्याचे दिवस
२१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर २२ व्या दिवशी रिंग काढावी. पुढील सात दिवस रिंगमुक्त असतात. या सात दिवसांत तुम्ही गर्भधारणेपासून सुरक्षित असतात.
गर्भनिरोधक किंवा योनीमार्गातील रिंग मासिक पाळी टाळण्यासाठी कसे वापरावे
जर तुम्हाला मासिक पाळी टाळायची असेल तर तुम्ही रिंगमुक्त दिवस टाळू शकतात. २१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेच पुढील २१ दिवसांचे चक्र सुरू करण्यासाठी रिंगचा वापर सुरू करू शकतात.
योनीमार्गात एकदा रिंग टाकल्यानंतर, तिचा प्रभाव तीन आठवडे म्हणजेच २१ दिवसांपर्यंत असतो. योनीमार्गात रिंग टाकल्यानंतर त्याला रिंग-इन दिवस म्हणून टिपून ठेवले जाते. त्यानंतर तीन आठवड्यांनी म्हणजेच २१ दिवसांनी रिंग योनीमार्गातून बाहेर काढावी लागते. त्यानंतर पुढील सात दिवस हे रिंग-आऊट दिवस म्हणून टिपून ठेवले जातात. तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतर पुढील सात दिवस रिंगमुक्त दिवस म्हणून मिळतात. या रिंगमुक्त दिवसांत लैंगिक संबंध ठेवताना तुम्हाला कोणतीही गर्भनिरोधक पद्धत वापरण्याची गरज नसते. ह्या सात दिवसात तुम्ही गर्भधारणेपासून पूर्णपणे सुरक्षित असतात. तसेच या सात दिवसांता तुमची मासिक पाळीदेखील येते. रिंगमुक्त सात दिवस पूर्ण झाल्यानंतर, पुढील २१ दिवसांचे नवीन चक्र सुरू होते. सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच नवीन चक्राच्या पहिल्या दिवशी रिंग योनीमार्गात टाकली जाते आणि गर्भधारणा टाळण्यासाठी पुन्हा नवीन चक्राला सुरुवात होते. मासिक पाळी टाळण्याची इच्छा असल्यास तर तुम्ही गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करू शकता. फक्त ही गर्भनिरोधक रिंग योनीमार्गात महिनाभर राहील याची खात्री करा. गर्भनिरोधक रिंग बदलण्याचे वेळापत्रक पाळण्यासाठी तुम्ही एखादी ठराविक तारिख निश्चित करू शकता. उदाहरणार्थ, महिन्याचे किती दिवस आहेत याचा विचार न करता दर महिन्याच्या १ तारखेला रिंग बदलण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तसेच एखाद्या विशिष्ट दिवशी रिंग बदलण्याचे वेळापत्रकदेखील नियोजित करू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या महिन्याच्या चौथ्या शनिवारी तुम्ही रिंग बदलू शकता. मासिक पाळी टाळण्यासाठी योनीमार्गातील रिंगचा वापर केल्यास, पहिल्या सहा महिन्यांपर्यंत कधीकधी रक्तस्राव किंवा हलका रक्तस्राव होऊ शकतो. ही सामान्य बाब असून जर काही दिवस अथवा महिन्यांपर्यंत हा त्रास कमी होत नसेल तर, आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. योनीमार्गातील रिंग पाकीट जेव्हा वापरत नसाल तेव्हा ते सामान्य खोलीच्या तापमानात किंवा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. जर ४ महिन्यांहून अधिक काळ रिंग वापरायची नसेल तर, ते पाकीट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तसेच पाकिटावरील साठवण करण्याबाबत असलेल्या सूचनादेखील काळजीपूर्वक वाचा.
कधीकधी रिंग-इन, रिंग-आऊट आणि नवीन रिंग बदलण्याचा दिवस यांचे वेळापत्रक पाळणे कठीण होऊन जाते. जर तुम्ही तीन आठवड्यानंतर रिंग बाहेर काढण्यास विसरलात तर, रिंग आऊट झाल्यापासून किती दिवस शिल्लक आहेत यावर गर्भधारणेपासून मिळणारे संरक्षण अवलंबून असते. रिंग आऊट काळ सुरू झाल्यापासून सात दिवसांपेक्षा कमी वेळ रिंग आत असेल तर ते लक्षात येताच रिंग काढून टाका आणि उरलेले रिंगमुक्त दिवस सुरू करा. आठव्या दिवशी नवीन रिंग योनीमार्गात टाका. गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करण्याची आवश्यकता नसते. रिंग आऊट दिवसानंतर सात दिवसांपेक्षाही अधिक काळ रिंग काढण्याचे लक्षात राहिले नसेल तर ते आठवताच रिंग काढून त्वरित रिंग नवीन घालावी. हे नवीन रिंग-इन चक्र म्हणून सुरू करावे. पुढील सात दिवस काळजी म्हणून गर्भधारणा टाळण्यासाठी आणखी एक गर्भनिरोधक पद्धती वापरण्याची आवश्यकता असते. ही गर्भनिरोधक रिंग निघून गेल्यानंतर किंवा काढल्यानंतर तुम्ही लैंगिक संबंध ठेवले असतील आणि गर्भधारणेसंदर्भात मनात काही शंका असतील तर अशावेळी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. गर्भधारणा होण्याच्या शक्यतेबाबत किंवा गर्भधारणा चाचणीबाबत त्यांचे मार्गदर्शन घ्या. योनीमार्गातील रिंग ही बहुतांश स्रियांसाठी सुरक्षित असते. परंतु, काही स्रियांना याचा त्रासदेखील जाणवू शकतो. तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा धूम्रपान करण्याची सवय असेल तर अशावेळी योनीमार्गातील रिंग वापरणे योग्य ठरत नाही. तसेच रक्ताच्या गुठळ्या होण्याचा विकार, स्तनाचा कर्करोग, हृदयविकाराचा झटका, हृदयासंबंधित इतर काही व्याधी, अर्धशिशी, अनियंत्रित उच्च रक्तदाब, मधूमेह किंवा यकृताचे विकार यांसारख्या आरोग्याच्या समस्या असल्यास योनीमार्गातील रिंग वापरणे टाळायला हवे.
गर्भनिरोधक रिंग वापरणे खूप सुरक्षित आहे. परंतु रिंग वापरल्याने तुम्हाला आरोग्याच्या समस्येचा धोका किंचित वाढू शकतो. यामध्ये हृदयविकाराचा झटका, रक्ताच्या गुठळ्या होणे, यकृतात गाठ होणे यांसारख्या आजारांचा धोका असतो. या आरोग्य समस्यांची शक्यता खरोखरच कमी असते. म्हणूनच गर्भधारणा टाळण्यासाठी योनीमार्गाच्या रिंगचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही गर्भनिरोधक पद्धत वापरावी की नाही तसेच ती वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर तुम्हाला इतर गर्भनिरोधक पद्धतीच्या आधारे गर्भधारणा कशी टाळावी याचे योग्य मार्गदर्शन करतील.
फायदे
ही गर्भनिरोधक पद्धती योग्यरित्या वापरल्या गर्भधारणा टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक पद्धतींपैकी एक आहे. गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणे रोज ही पद्धत वापरावी लागत नाही. फक्त महिन्यातून एकदा रिंग बदलायची असते. या पद्धतीमध्ये गर्भधारणा होण्यापासून तुम्ही कायम सुरक्षित असतात. तसेच यामुळे लैंगिक संबंधात व्यत्यय येत नाही. या पद्धतीबाबत आपल्या डॉक्टरांकडून पूर्णपणे माहिती घ्या. तसेच आपण एकावेळी एकापेक्षा अधिक रिंगचे पाकीट खरेदी करू शकता. गर्भनिरोधक गोळ्यांसारखे संप्रेरक पोटाद्वारे शोषण्याची आवश्यकता नसते. या पद्धतीमुळे मासिक पाळी नियमित होणे, मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच या पद्धतीमुळे मासिक पाळी येण्यापूर्वी होणारा त्रास कमी होतो व मुरूम येण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा त्रासदेखील कमी करते.
तोटे
प्रभावीपणे गर्भधारणा टाळण्यासाठी योनीमार्ग रिंगचे इन आणि रिंग आऊट वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. हे वेळापत्रक जितके नियमित पाळले जाईल तितकी गर्भधारणेपासून संरक्षण मिळण्याची शक्यता दाट होईल. या वेळापत्रकाचे पालन होण्यासाठी तुम्ही रिमाईंडर म्हणेच स्मरणिकेची मदत घेऊ शकता. काहीवेळा ही रिंग घालणे, काढून टाकणे थोडे त्रासदायक वाटू शकते. तसेच कधीकधी योनीतून स्राव वाढणे, डोकेदुखी, मळमळ, स्तन कोमल होणे, मूड स्विंग्ज होणे यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. तसेच कधीकधी अति रक्तस्राव किंवा हलका रक्तस्राव होऊ शकतो. या सर्व समस्या काही दिवसांत कमी होणे आवश्यक आहे. जर असे घडले नाही तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भनिरोधक रिंग लैंगिक आजारांपासून संरक्षण करत नाही. त्यामुळे लैंगिक आजापारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी कंडोमसारख्या गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करावा. गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक गर्भनिरोधक पद्धती उपलब्ध आहेत. आपल्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धती योग्य आहे याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चर्चा करू शकता. तुमच्या शारीरिक व्याधी, परिस्थितीनुसार ते तुम्हाला कोणती गर्भनिरोधक पद्धती वापरावी याविषयी मार्गदर्शन करतील.
गर्भवती होणे आणि बाळ होणे हा प्रत्येक स्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. परंतु, कधीकधी अनियोजित गर्भधारणा हा आनंद उपभोगू देत नाही. कारण अनियोजित गर्भधारणेमुळे स्रीच्या भविष्यातील योजना, नियोजन हे सर्व विस्कळीत होते. तसेच अनियोजित गर्भधारणेमुळे सामाजिक, आणि आर्थिक पैलुंवर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच मूल कधी व्हावे यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. अनियोजित गर्भधारणा ही योग्य गर्भनिरोधक पद्धतीची निवड, योग्य कुटुंब नियोजन आणि वेळापत्रकाचे पालन यानुसार टाळली जाऊ शकते. तसेच योग्य गर्भनिरोधक पद्धतीमुळे आपल्याला मूल कधी हवे आहे याविषयी नियोजन करणे सोपे होते.
संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती अंतःस्रावी प्रणाली, संप्रेरकांचा समावेश असलेली रासायनिक संदेशवाहक प्रणाली, ग्रंथींचा समूह आणि त्यांची प्रतिक्रिया यावर कार्य करते. या गर्भनिरोधक पद्धतीमध्ये कृत्रिम संप्रेरकांचे विविध प्रकार वापरले जातात जे स्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांच्या उत्पादनाची नक्कल करतात. हे संप्रेरक स्त्रीबीज रोखतात, गर्भाशय ग्रीवाच्या श्लेष्मा घट्ट करतात आणि गर्भाशयाचे अस्तर पातळ करून गर्भधारणा रोखतात. प्रभावीपणे गर्भधारणा टाळणे हे मुख्यतः गर्भनिरोधक पद्धती वापरण्याच्या वेळापत्रकावर अवलंबून असते. गर्भनिरोधक गोळ्या ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी गर्भनिरोधक पद्धत आहे. जगभरातील एकूण १८ टक्के स्रिया संप्रेरक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करतात. संप्रेरक गर्भनिरोधक पद्धती वापरण्याचे काही दुष्परिणाम असून त्यासाठी कोणते संप्रेरक वापरले जातात यावर त्याची अचूकता अवलंबून असते. या पद्धतींच्या वापराने शरीरावर होणारे दुष्परिणाम काही महिन्यांमध्येच दूर व्हायला हवे. तसेच हेदेखील लक्षात घ्या की, या पद्धतींच्या वापरानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या खरोखर किरकोळ असतात किंवा अधिक काळ टिकणाऱ्या नसतात. त्यामुळेच कोणतीही संप्रेरक गर्भनिरोधक पद्धत वापरण्यापूर्वी किंवा तिचा विचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. आपल्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धत योग्य आहे याबाबत विचार करून गर्भधारणा टाळण्यासाठी तिचा वापर करणे गरजेचे आहे.
लक्षात घ्या की, मूल होणे ही खूप आनंद देणारी आणि जीवनात बदल घडवून आणणारी घटना असते. त्यामुळे ही गोष्ट घरात आनंद देणारी ठरायला हवी ना की तणाव आणणारी. त्यामुळे आपल्या बाळाचे येणे अनियोजित ठेवू नका. त्याच्यासाठी योग्य योजना तयार करा आणि त्याच्या येण्याच्या आनंद साजरा करा. गर्भधारणा टाळण्यासाठी अचूक गर्भनिरोधक पद्धत निवडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या. ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य असलेली गर्भनिरोधक पद्धती सूचवतील आणि कुटुंब नियोजनाचे मार्गदर्शन करतील. या गर्भनिरोधक पद्धती आणि कुटुंब नियोजन पद्धतींबद्दल तुम्हाला जितकी माहिती असेल तितके तुम्ही तुमच्या लैंगिक आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता. गर्भधारणा नको असल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. गरोदरपणाचा आनंद घ्या हा सुंदर अनुभव तणावात घालवू नका.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय