डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
तारुण्य म्हणजे काय - वय, टप्पे आणि शारीरिक विकास

तारुण्य म्हणजे काय?

यौवन वय, टप्पे आणि शारीरिक विकास

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

तारुण्य म्हणजे काय - वय, टप्पे आणि शारीरिक विकास
बालपण संपून प्रौढत्वाच्या दिशेने होणारा शारीरिक विकास आपल्या जीवनातील सर्वाधिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या गुंतलेली अवस्था आहे. विचारांमध्ये येणारी परिपक्वता, लक्षणीय मनोसामाजिक विकास आणि शारीरिक विकास अशा अनेक गोष्टी तारुण्याच्या काळात घडतात. बालपणापासून प्रौढत्वाकडे होणाऱ्या स्थित्यंतरातील हा महत्त्वाचा टप्पा असतो. मोठे होण्यातला हा बदल एक सामान्य भाग असला तरी, याविषयी प्रत्येक मुलीचा अनुभव वेगळा असतो आणि बरेचदा आव्हानात्मक व गोंधळात टाकणारा असतो. तारुण्य म्हणजे काय? तारुण्याचे कोणते? या कालावधीत भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या कोणते बदल होतात? हे जाणून घेतल्यास या काळाचा सामना कसा करावा किंवा या कालावधीत कसे वागावे यासाठी तुम्हाला मदत होईल. या लेखात तारुण्य आणि त्याबद्दल असलेल्या शंकाचे निरसन व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तारुण्य म्हणजे काय?

तारुण्य ही शारीरिक बदलांची प्रक्रिया आहे. यौवनावस्थेला साधारणपणे वयात येणे असेही म्हटले जाते. ज्यामध्ये मुलगा किंवा मुलगी यांचे शरीर परिपक्व होते. तारुण्यात शरीर अनेक अंतर्गत आणि बाह्य बदलांमधून जात असते. शारीरिक आणि जैविक बदलांची मालिका या काळात शरीर परिपक्व होण्यासाठी मदत करते. हे बदल मेंदूतील संप्रेरकांच्या संकेताद्वारे सुरू होतात. या संकेतांना प्रतिसाद म्हणून शरीर आपली त्वचा, केस, स्तन आणि लैंगिक अवयवांमध्ये बहुतांश बदल करण्यास सुरुवात करते. तारुण्याच्या पहिल्या सहामाहीत उंची, वजन वेगाने वाढते आणि शरीर विकसित झाल्यावर ही वाढ पूर्ण होते. या काळात दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये विकसित होतात जी मुलगा आणि मुलगी यांच्यातील बदल स्पष्ट करतात.
तर, अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तारुण्य म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या प्रौढ होण्यातील अनेक बदल घडवून आणणारी प्रक्रिया होय.

तारुण्याचे वय?

तारुण्य ही शरीर परिवर्तनाची प्रक्रिया आहे आणि ती एकाचवेळी घडत नाही. यौवन हे टप्प्याटप्प्याने येते आणि ते पूर्ण होण्यास अनेक वर्ष लागतात. यौवन सुरू झाल्यावर होणारे बदल हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात. सर्वसामान्य मुली वयाच्या ११ वर्षी यौवनात येतात. तर, ८ ते १७ या वर्षात शरीरात अनेक बदल घडतात आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा ते सात वर्षे लागू शकतात.
मुलींचे तारुण्याचे वय - तारुण्य म्हणजे काय? - स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी
मुलींचे तारुण्याचे वय
यौवनावस्थेची सुरुवात, त्याचा प्रारंभिक काळ आणि शरीर बदलाचा कालावधी या सर्व गोष्टी अनेक घटकांवर अवलंबून असतात. शरीराचा प्रकार आणि चरबीची रचना तारुण्य वय तसेच त्याचा कालावधी यावर परिणामकारक ठरतात. अनेकदा पर्यावरणीय परिस्थितीदेखील तारुण्य कालावधीचा सुरुवातीचा काळ आणि पूर्ण होण्याचा कालावधी यावर परिणाम करू शकतात. ८ ते १४ या कालावधीत कोणत्याही क्षणी तारुण्य सुरू होणे ही सामान्य बाब आहे. परंतु, जर तारुण्यातील लक्षणे वय वर्षे ८ च्या आधी आणि वय वर्ष १४ च्या नंतर सुरू झाल्यास स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तारुण्याचे पहिले लक्षण

तारुण्याचा काळ बरीच वर्षे असतो. या कालवधीत शरीर विकसित होत असते आणि त्याचे बरेच टप्पेदेखील असतात. परंतु, आपण तारुण्यात प्रवेश करीत आहोत हे जाणून घेण्यासाठी काही प्रारंभिक लक्षणे असतात.
तारुण्याचे साधारणपणे पहिले लक्षण स्तनाचा विकास होणे हे असते. या प्रक्रियेत स्तनांना उभार मिळायला सुरुवात होते. स्तनांचा हा उभार कधीकधी खूप कोमल असतो. तसेच कधीकधी एकावेळी एकाच स्तनाचा विकास होणे अशा गोष्टी घडू शकतात. मात्र या गोष्टी सामान्य असून त्यात चिंतेचे कारण नसते. जांघेजवळील केस वाढणे हेदेखील तारुण्य सुरू झाल्याचे एक प्रारंभिक लक्षण आहे. जांघेत केसांची वाढ होणे हे सामान्यतः स्तनाच्या विकासानंतर सुरू होते. त्यानंतर काखेच्या केसांची वाढ होते. फार कमी मुलींमध्ये स्तनाच्या विकासापूर्वी जांघेत केस येण्यास सुरुवात होते.
जांघेमध्ये केस येण्याबरोबरच काही मुलींच्या पाय आणि हातांवर नेहमीपेक्षा अधिक केस दिसू शकतात. तारुण्याच्या महत्त्वपूर्ण लक्षणांपैकी एक म्हणजे मासिक पाळी सुरू होणे. परंतु, हे सहसा इतर शारीरिक बदलांनंतर सुरू होते. सामान्यपणे तारुण्य सुरू झाल्यानंतर २ ते ३ वर्षांनंतर पाळी येण्यास सुरुवात होते. म्हणूनच जरी तुमची मासिक पाळी सुरू झाली नाही तरीही तुम्ही यौवनाच्या वयात प्रवेश केलेला असतो.

तारुण्यादरम्यान होणारा शारीरिक विकास आणि बदल

तारुण्यात आपले शरीर अनेक भावनिक आणि शारीरिक बदलांमधून जात असते. तारुण्याचे वय सुरू झाल्यावर हायपोथॅलॅमस नावाचे मेंदूचे क्षेत्र उर्वरित शरीराला संकेत देण्यास सुरुवात करते. यामध्ये उर्वरित शरीराला सुचित केले जाते की, आपला प्रौढत्वाकडे प्रवास सुरू झाला आणि त्यानुसार शरीराचा विकास सुरू करण्याची वेळ आली आहे. हे संकेत संप्रेरकांद्वारे पाठवले जातात. ज्यामुळे पुनरुत्पादक अवयव, अंडाशय आणि इतर संप्रेरकांची श्रेणी तयार होते. या संप्रेरकांमुळे शरीराच्या विविध भागात वाढ आणि बदल होण्यास सुरुवात होते.
तारुण्यातील शारीरिक बदल - तारुण्य म्हणजे काय? - स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी
तारुण्यातील शारीरिक बदल

शरीरातील सामान्य बदल

तारुण्यात खालीलप्रमाणे शारीरिक बदल अनुभवास येतात.
चेहऱ्यावर मुरूम किंवा पुटकुळ्या येऊ शकतात.
चेहऱ्याची त्वचा तेलकट होऊ शकते.
तुमच्या घामाच्या ग्रंथीचा विकास होतो, या कालावधीत तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो आणि त्यामुळे शरीराचा वास येऊ शकतो.
तुमचे नितंब (हिप्स) रुंद होऊ शकतात आणि शरीर वक्र होऊ शकते.

मासिक पाळी

तारुण्य सुरू झाल्यानंतर शरीरातील महत्त्वपूर्ण बदलांपैकी एक बदल म्हणजे मासिक पाळी सुरू होणे. मासिक पाळी येणे हे तारुण्याचे लक्षण आहे आणि वयात आल्याचा सामान्य भाग आहे. मासिक पाळी वयाच्या १२ ते १५ व्या वर्षापर्यंत सुरू होते. बहुतांश मुलींना त्यांच्या स्तनाचा विकास सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मासिक पाळी येते.

काख आणि जांघेच्या भागात केस येणे

तारुण्यातील आणखी एक लक्षण (कदाचित थोडे त्रासदायक) म्हणजे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर केसांची वाढ होणे हे आहे. या कालावधीत तुमच्या लक्षात येते की, ज्या भागात पूर्वी केस नव्हते तेथे केस येण्यास सुरुवात झालेली आहे, तसेच हात आणि पायांवरील केसदेखील वाढू शकतात. काखेत आणि जांघेत केस येणे ही यौवनावस्थेची विशिष्ट लक्षणे आहेत.
काखेत केसांची वाढ - तारुण्य म्हणजे काय? - स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी
काखेत केसांची वाढ

हाडांची वाढ

प्रौढावस्थेत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांच्या आकारात बदल होण्याबरोबर ते मजबूत होण्यास सुरुवात होणे. हाडे केवळ लांब आणि रुंद होत नाहीत, तर ती अधिक भरीव होतात. तारुण्यातील हा बदल सर्वाधिक फायदेकारक असतो. स्रियांमध्ये, तारुण्यादरम्यान आयुष्यभरात शरीरातील एकूण कॅल्शिअमपेक्षा अंदाजे ५० टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये जमा होते. यौवनाच्या सुरुवातीला पहिल्या सहामाहीत हाडांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शिअम जमा होत असते. बहुतांश मुलींमध्ये विशीच्या सुरुवातीच्या काळापर्यंत हाडे मोठी आणि भरीव होतात. लहानपणी हाडे मजबूत होणे हे आयुष्यभरासाठी हाडांच्या आरोग्याचा पाया घालते. जेव्हा आपण लहान किंवा किशोरवयीन असतो तेव्हाच हाडांची घनता वाढत असते. यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमयुक्त आहार घेणे आवश्यक असते. तारुण्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी, हाडांच्या वाढीवर होणारा त्याचा परिणाम, निरोगी आहार आणि त्याच्या पद्धतींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उंची आणि वजन वाढणे

तारुण्यात शरीर अनेक बदलांमधून जात असते. आपले शरीर परिपक्व आणि विकसित होण्यासाठी थोडीशी अतिरिक्त चरबी वाढणे हा सामान्य आणि आवश्यक भाग आहे. तर, तारुण्यात बहुतांश मुलींचे वजन वाढते आणि ही पूर्णपणे सामान्य बाब आहे. दंड, मांडी आणि पाठीच्या वरच्या बाजूला चरबी अधिक दिसू शकते. तसेच नितंब वक्र आणि विस्तृत होते आणि कंबर अरुंद होण्यास सुरुवात होते. वयाच्या साधारण नवव्या वर्षापासून ते पौगंडावस्था कालावधी पूर्ण होईपर्यंत मुलींची उंची १७ ते १८ टक्के वाढते. आधी हात व पाय यांची वाढ होते व नंतर शरीराच्या उरलेला भागाची वाढ होते. बहुतांश मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी सहा महिने शारीरिक वाढीचा दर वेगवान असतो. त्यामुळे हा बदल आपल्याबरोबर इतरांना थोडा विचित्र वाटू शकतो. परंतु, तारुण्यात शारीरिक वाढ व बदल वेगाने होणे ही सामान्य बाब आहे. शारीरिक वाढ आणि बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) मोजण्यासाठी वर्षातून एकदा तरी डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. बीएमआयचा उपयोग वाढीचा नमूना तपासणी, आरोग्य तपासणी आणि त्यात सुधारणेची आवश्यकता आहे की नाही हे पाहण्यासाठी केला जाऊ शकतो.
म्हणून, हे आपल्याला आणि इतरांना थोडेसे विचित्र वाटू शकते, परंतु यौवनात शरीरात वेगवान वाढ होणे ही सामान्य बाब असते. शरीराची वाढ तपासण्यासाठी आणि बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) मोजण्यासाठी वर्षातून एकदा तरी डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. बीएमआयचा उपयोग वाढीचा नमुना तपासणी, तुमचे शरीर तंदरुस्त आणि निरोगी आहे की नाही हे पाहण्यासाठी केला जाऊ शकतो.

वयानुसार स्तनाचा विकास

तारुण्यात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या संप्रेरकांमुळे स्तनांचा विकास होतो. या संप्रेरकांमुळे चरबी जमा होते, ज्यामुळे स्तन मोठे होतात. स्तनांच्या विकासाचे पहिले लक्षण म्हणजे स्तनांना उभार येणे, स्तनांना आलेला उभार लहान असणे, स्तनाग्राखाली चकतीच्या आकाराच्या गाठी जाणवणे हे असते. जसे की, स्तन प्रथम वाढू लागतात, तेव्हा ते खूप कोमल आणि वेदनादायक असू शकतात. जर ते वेगाने वाढले तर त्वचेत स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात, परंतु कालांतराने ते फिकट होतात. तारुण्यात आपल्या शरीरात चरबी वाढत असल्याने स्तनांची वाढ होत राहते. तारुण्याच्या शेवटच्या काही वर्षात स्तन गोलाकार आणि परिपूर्ण होतात.
स्तन विकास - तारुण्य म्हणजे काय? - स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी
स्तन विकास
पहिला टप्पा
८ वर्षे
पूर्व किशोरवस्था. फक्त स्तनाग्राचे टोक वर उचलले जाते.
दुसरा टप्पा
९ ते ११ वर्षे
स्तनाला उभार येतो, स्तन आणि स्तनाग्र वर उचलले जातात. स्तनाग्र (एरोला)च्या सभोवतालचे त्वचेचे गडद क्षेत्र आणि मोठे होते.
तिसरा टप्पा
वय वर्षे १२ नंतर
स्तन किंचित मोठे होतात, तसेच ग्रंथींसह स्तनाच्या उती यात असतात.
चौथा टप्पा
१३ व्या वर्षापर्यंत
स्तनाग्रे आणि आसपासचा भाग वर उचलला जातो. त्यानंतर उर्वरित स्तनाचा दुसरा ढीग तयार केला जातो.
पाचवा टप्पा
१५ व्या वर्षापर्यंत
परिपक्व प्रौढ स्तन. स्तन गोलाकार होतात आणि फक्त स्तनाग्रे वर उचलली जातात.
एका स्तनाचा दुसऱ्या स्तनापेक्षा वेगवान विकास होणे सामान्य आहे. कालांतराने दोन्ही स्तन सामान आकाराचे बनतात. स्तनाच्या आकारात थोडासा फरक पूर्णपणे सामान्य असतो आणि कदाचित तो दूर होणाराही नसतो. यासंदर्भात कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पुढील गोष्टींचा अनुभव घेत असाल तर तुम्हाला कदाचित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज भासू शकते.
वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत स्तनाला उभार न मिळणे किंवा स्तन विकसित न होणे.
एका बाजूला स्तनाला उभार आला असेल परंतु, दुसऱ्या बाजूला तीन महिन्यांपर्यंत स्तनाला उभार आलेला नसल्यास.
स्तन उभाराभोवती सूज जाणवत असेल आणि त्यामुळे त्रास होत असेल.
याविषयी तुमच्या मनात काही शंका असल्यास किंवा अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असल्यास डॉक्टरांची भेट घेतली जाऊ शकते.

तारुण्यातील टप्पे – टॅनर टप्पा

तारुण्य हा शरीरात झपाट्याने बदल होण्याचा काळ असतो. टॅनर स्टेजिंग ज्याला सेक्शुअल मॅच्युरिटी रेटिंग (एसएमआर) देखील म्हणतात. हा टप्पा तारुण्य आणि शरीराचा विकास यांना एकाहून अधिक टप्प्यात विभाजित करण्यास मदत करते. १९६९ साली विकसित झालेल्य या प्रणालीला ब्रिटिश बालरोगतज्ज्ञ डॉ. जेम्स टॅनर यांचे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली मुलींच्या स्तनाचा विकास आणि जांघेतील केसांच्या वाढीवर आधारित आहे. प्रत्येक मुलीची तारुण्य वेगळी असली आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात ती पार पडत असली तरीदेखील ही पद्धत शारीरिक विकासाची तुलना करण्यासाठी एक सामान्य मार्गदर्शक म्हणून कार्य करते.

टॅनर टप्पा १

वय: ८ वर्षे
टॅनर टप्पा १ हा जवळजवळ यौवनावस्थेपर्यंत पोहोचलेला काळ असतो. या टप्प्याच्या शेवटी, आपला मेंदू आपल्या शरीराला संकेत पाठवण्यास सुरुवात करतो. तुमच्या आठव्या वाढदिवशी, तुमचे शरीर तारुण्यात प्रवेश करते. तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते परंतु, ते शारीरिकदृष्ट्या तुम्हाला लक्षात येणार नाहीत.

टॅनर टप्पा २

वय: ९ ते ११ वर्षांदरम्यान
तारुण्याचा दुसरा टप्पा शारीरिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या काळात संप्रेरक संपूर्ण शरीराला संकेत पाठवू लागतात. या काळात स्तनांना उभार येणे हे तारुण्यातील पहिले लक्षण आहे. स्तनांना उभार आलेला भाग थोडा खाज सुटणारा किंवा कोमल असू शकतो. या व्यतिरिक्त जांघेच्या भागात केस येण्यास सुरुवात होऊ शकते.

टॅनर टप्पा ३

वय: १२ व्या वर्षानंतर
तारुण्याच्या तिसऱ्या टप्प्यात शारीरिक बदल अधिक ठळकपणे दिसून येतात. या टप्प्यात स्तनांना उभार मिळत राहतो आणि त्यांचा आकार वाढत राहतो. तसेच जांघेतील केस दाट आणि कुरळे होतात. तसेच काखेखालील केस वाढून ते दिसण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर मुरुम येण्यास सुरुवात होते. उंची अधिक गतीने वाढते आणि तुम्ही उंच दिसू लागतात.

टॅनर टप्पा ४

वय: १३ व्या वर्षानंतर
तारुण्य या काळात वेग धरते आणि शरीरात अनेक बदल पाहायला मिळतात. स्तनांचा उभार जाऊन त्यांना आता या काळात परिपूर्ण आकार येण्यास सुरुवात होते. साधारणपणे १२ ते १४ वयोगटात पहिल्यांदा मासिक पाळी येऊ शकते. तसेच मासिक पाळी सुरू होण्याचा काळ थोडा लवकर किंवा उशीरादेखील असू शकतो आणि ही गोष्ट पूर्णपणे सामान्य असते. या काळात जांघेतील केस दाट होऊन त्यांची वाढ थोडी मंदावते.

टॅनर टप्पा ५

वय: १५ व्या वर्षानंतर
हा पाचवा टप्पा तारुण्याचा शेवटचा टप्पा असतो. या टप्प्यात आपल्या शरीराची संपूर्ण वाढ आणि परिपक्वता झालेले लक्षात येते. पुढील काही वर्षे स्तनांची वाढ सुरू राहू शकते. परंतु, या टप्प्याच्या शेवटी ते अंदाजे परिपूर्ण आकारात येतात. पुढील सहा महिने ते दोन वर्षात नियमित मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. तसेच पहिल्या मासिक पाळीनंतर साधारण एक दोन वर्षांपर्यंत उंची वाढत असते. जांघेच्या भागातील केस पूर्णपणे वाढून मांड्यांच्या आतील भागापर्यंत पोहोचतात. नितंब, मांड्या आकाराने भरतात आणि शरीर एका तरुण स्रीच्या शरीरासारखे दिसू लागते.
टॅनर टप्प्यातील शारीरिक विकास - तारुण्य म्हणजे काय? - स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी
टॅनर टप्प्यातील शारीरिक विकास
पहिला टप्पा
८ वर्षे
लक्षात येण्यासारखा शारीरिक बदल नाही. छोटी स्तनाग्रे, स्तन नाही आणि जांघेत केस नाही.
दुसरा टप्पा
९ ते ११ वर्षापर्यंत
स्तनाग्रांखाली उभार येतो. जांघेतील केस वाढण्यास सुरुवात होते. हे केस सरळ, मऊ आणि हलक्या रंगाचे असतात.
तिसरा टप्पा
वय वर्षे १२ नंतर
स्तनाग्राच्या आसपासचा भागाची वाढ सुरू असते, चेहऱ्यावर मुरुम येण्यास सुरुवात होते, काखेखाली केस येण्यास सुरुवात होते. तसेच जांघेतील केस वाढून ते कुरळे होण्यास सुरुवात होते.
चौथा टप्पा
वय वर्षे १३ पर्यंत
मासिक पाळी येण्यास सुरुवात होऊ शकते. स्तनाग्रे वर उचलली जातात आणि स्तनाच्या दिशेने एक सरळ आकार घेतात. या टप्प्यात स्तनांची वाढही थोडी जास्त होते. जांघेतील केस दाट होऊन कुरळे व रंगाने गडद होत जातात.
पाचवा टप्पा
वय वर्षे १५ पर्यंत
स्तनांची पूर्णपणे वाढ होते. जांघेतील केस पूर्णपणे वाढतात. दाट आणि कुरळे केस मांड्यांच्या आतपर्यंत वाढतात.
तारुण्यातील शारीरिक वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते. टॅनरचे टप्पे आणि नमूद केलेले वय सरासरी अभ्यासावर आधारित आहे. जर, तुमच्या शरीरातील बदल यानुसार असेल किंवा याच्या मागेपुढे असतील तर ती सामान्य गोष्ट असून चिंता करू नका. जर तुमच्या शरीरात बदल होत नसेल किंवा या सर्व टप्प्यांमधली बदलांसारखे वाटत नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला याविषयी काही माहिती किंवा मदत हवी असल्यास तुमच्या स्रीरोग तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करा.

अकाली तारुण्य आणि विलंबित तारुण्य म्हणजे काय?

तारुण्य सुरू होण्याचे मुलींचे साधारण वय ११ वर्षे आहे. काही मुलींची तारुण्य लवकर सुरू होऊ शकते किंवा काही मुलींची उशीरा सुरू होऊ शकते. परंतु, सरासरी सर्व मुलींची तारुण्य वय वर्षे ८ ते १७ या कालावधीत असते.

अकाली तारुण्य किंवा लवकर तारुण्य

अकाली तारुण्य म्हणजे तारुण्य लवकर सुरू होणे होय. अकाली तारुण्यात एखाद्या मुलीच्या शरीरात तारुण्याची लक्षणे खूप लवकर दिसू लागतात. तारुण्याच्या वयाबद्दल कोणतेही जागतिक नियम नाही के ते अकाली तारुण्य मानले जाऊ शकतात. मुलींमध्ये वयाच्या ८ व्या वर्षाच्या आधी लक्षणे दिसल्यास तपासणीचा सल्ला दिला जातो. स्तनाचा विकास आणि जांघेतील केस मुलींमध्ये वय वर्ष ८ च्या आधी दिसू लागतात की नाही ही निरीक्षण करण्यासाठी मुख्य लक्षणे आहेत.
अकाली तारुण्याचे दोन प्रकार आहेत.
मध्यवर्ती अकाली तारुण्य: सेंट्रल प्रीकॉशिअस प्युबर्टी (सीपीपी) म्हणून ओळखले जाणारे, मुलींमध्ये दिसणारे हे सर्वात सामान्य अकाली तारुण्य लक्षणे आहेत. हे गोनाडोट्रोपिन-रिलीझिंग हार्मोन (जीएनआरएच) नावाच्या संप्रेरकाच्या लवकर उत्पादनामुळे सुरू होते.
परिघीय अकाली तारुण्य: हे शरीराच्या वेगवेगळ्या भागांद्वारे तयार होणारे एंड्रोजन आणि इस्ट्रोजेनसारख्या उच्च लैंगिक संप्रेरकाच्या लवकर स्रावामुळे होते.
अकाली यौवनावस्थेची काही लक्षणे:
वय वर्षे आठच्या आधी स्तनांचा विकास होणे.
वय वर्षे दहाच्या आधी मासिक पाळीला सुरुवात होणे.
वय वर्षे आठच्या आधी वेगाने उंची वाढणे.
वय वर्षे आठच्या आधी जांघेतील केस, काखेतील केस आणि चेहऱ्यावरील केस येण्यास सुरुवात.
कमी वयात चेहऱ्यावर मुरुम येण्यास सुरुवात.
बहुतांश प्रकरणांमध्ये, अकाली यौवनावस्थेची चिन्हे विशिष्ट असतात आणि त्यांना वैद्यकीय लक्ष देण्याची आवश्यकता नसते. परंतु, सर्वकाही सामान्य आहे याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये अकाली तारुण्य हे आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. जसे की, अनुवंशिक आजार, संप्रेरकांमधील बदल, मेंदुची विकृती किंवा वृषण, अंडाशय किंवा अधिवृक्क ग्रंथीची समस्या. लक्षात घ्या की अकाली तारुण्याचा उपचार केला जाऊ शकतो. त्यामुळे एक मुलगी म्हणून, जर तुम्हाला असे वाटत असेल की गोष्टी खूप आधी किंवा वेगाने घडत आहेत, तर त्याबद्दल आपल्या आईशी, आपल्या जवळच्या लोकांशी बोला. स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घ्या.

विलंबित किंवा लांबलेली तारुण्य

विलंबित किंवा लांबलेली तारुण्य म्हणजे शरीरात विविध बदलांची उशीरा सुरुवात होणे होय. जेव्हा वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत स्तनाचा विकास होत नाही तेव्हा यौवनावस्थेस सामान्यतः उशीर झाला आहे असे मानले जाते. स्तनाला उभार येण्यास सुरुवात झाल्यानंतर अंदाजे दोन ते तीन वर्षानंतर मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली पाहिजे. म्हणून जर तुमची मासिक पाळी वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत सुरू झाली नसेल तर तुम्हाला विलंबित यौवनावस्थेची लक्षणे दिसू शकतात.
एखाद्या मुलीने तारुण्यात उशीरा प्रवेश केला असेल तर यात तिचा काही दोष नसतो. तसेच तिला विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते. परंतु, काही विलंबित तारुण्य या वैद्यकीय विकार किंवा अनुवंशिक विकारांमुळे उद्भवू शकतात आणि त्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक असते. अनुवंशिक कारणामुळे तारुण्य काळ उशीरा सुरू होण्याचा प्रकार फार क्वचित मुलींसोबत होतो. तारुण्यातील घटनात्मक विलंब बहुतांश मुलींमध्ये दिसून येतो. थायरॉइड ग्रंथी, अंडाशय आणि वृषण समस्या यांसह कुपोषण यामुळे यौवनावस्थेला विलंब होऊ शकतो. मधुमेह किंवा सिस्टिक फायब्रोसिस सारख्या व्याधींमुळे यौवनावस्थेची सुरुवात उशीरा होऊ शकते. तसेच ज्या मुली खेळाडू आहेत किंवा कठोर व्यायाम करतात, ज्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण कमी आहे अशा मुलींची तारुण्य उशीरा सुरू होऊ शकते. बहुतांशवेळा तारुण्य विलंबाने सुरू होणे ही सामान्य बाब असते आणि त्यासाठी कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते. परंतु, जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपल्यासोबत घडत असलेल्या गोष्टी सामान्य नाही किंवा वयाच्या १६ व्या वर्षानंतर मासिक पाळी येत नाही तर अशावेळी आपल्या स्रीरोग तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या.

काही वैद्यकीय कारणे

तारुण्यात मुली अनेक शारीरिक बदल अनुभवत असतात. यातील बहुतांश बदल अपेक्षित असतात आणि खंबीर व्यक्ती म्हणून मुली त्यांना सामोरेही जातात. या कालावधीतील काही बदल शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतात. अशावेळी मात्र मुलींना मदतीची गरज भासते. खालील काही उदाहरणे अशी आहेत ज्यांमध्ये मुलींना मदतीची किंवा आधाराची आवश्यकता असू शकते.

रक्तक्षय

रक्तक्षय म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. जेव्हा शरीराला पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा ते हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. शरीरात हिमोग्लोबिन पुरेशा प्रमाणात नसल्याने लाल रक्तपेशी कमी होतात. परिणामी आपल्या पेशी आणि उतींपर्यंत ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. पुरेसा लोहपूरक आहार न घेतल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणावते. मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव झाल्याने हे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात लोहाचे प्रमाण भरपूर असायला हवे. ज्यामुळे मुलीच्या शरीराची वाढ होण्यास मदत होईल.

मुरुम किंवा पुटकुळ्या

चेहऱ्यावर मुरूम किंवा पुटकुळ्या येणे हे तारुण्यातील सर्वाधिक त्रासदायक परिणाम आहेत. चेहऱ्यावर मुरुम येत असतील तर आपण तारुण्यात प्रवेश करत आहोत असे वाटू शकते. त्वचेतील अतिसक्रीय तेल ग्रंथी आणि तेल, मृत त्वचेच्या पेशी आण बॅक्टेरिया यांच्या निर्मितीमुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. ज्यामुळे छिद्रात सूज आणि लालसरपणा जाणवतो. मुरुम किंवा पुटकुळ्या प्रामुख्याने चेहऱ्यावर येतात. त्यानंतर मानेच्या वरचा भाग आणि शरीराच्या इतर भागांवर मुरुम येऊ शकतात. मुरुम सामान्यतः तारुण्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात येतात. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या मुरुमांमुळे चिंता निर्माण होऊ शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
मुरुम किंवा पुटकुळ्या येणे आपण रोखू शकत नाही, परंतु त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी काही उपाय नक्कीच करू शकतो. चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवणे ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब आहे. त्वचा स्वच्छ धुतल्यास अतिरिक्त तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. ज्यामुळे छिद्रे मोकळी होतात. घाम आल्यास किंवा चेहरा खराब झाल्यास चेहरा लवकर साफ करायला हवा.
तुम्ही कोणतेही सौंदर्य प्रसाधन वापरत असल्यास, चेहऱ्यावरील छिद्र बुजवणार नाही याची खात्री करा. तेल, हेअर स्प्रे, हेअर जेल यांना आपल्या त्वचेपासून दूर ठेवा. पाण्याचा वापर करावी लागणारी प्रसाधने वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पाठीवर किंवा छातीवर मुरुम येत असतील तर घट्ट कपडे घालणे टाळा, घट्ट कपडे मुरुमांवर घासले जाऊन त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही मदत लागल्यास त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हाडे व स्नायूंना दुखापत

तारुण्यात शरीराची वाढ अतिशय वेगाने होत असते. या काळात हाडांची वाढ, हाडांमध्ये बळकटी येणे, कॅल्सिफिकेशन होणे, स्नायूंमध्ये बळकटी येणे या सर्व गोष्टी घडत असतात. त्यामुळे या कालावधीत स्नायू आणि हाडांसंदर्भात दुखणे वाढण्याचे प्रमाण जास्त असू शकते.

स्रीरोगविषयक समस्या

मासिक पाळी सुरू होणे तारुण्यातील एक प्रमुख लक्षण आहे. तारुण्याच्या सुरुवातीच्या वयात मासिक पाळी अनियमित असू शकते. मासिक पाळी चक्रानुसार पाळी येत असते. परंतु, मुलींची मासिक पाळी ओव्हुलेशन काळाशी संबंधित नसल्याने अनियमित आणि दीर्घकाळापर्यंत रक्तस्राव होऊ शकतो. जर तुम्हाला मासिक पाळीसंदर्भात काही त्रास चुकीचे वाटत असेल, जास्त त्रास होत असेल तर तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लघुदृष्टिदोष किंवा दृष्टीत बदल

तारुण्यात डोळ्यांचा अक्षीय व्यास विस्तारतो म्हणजे डोळ्यांची रचनादेखील या काळात बदलत असते आणि त्यामुळे अनेक मुलींना दृष्टी बदल झाल्याचे जाणवते. म्हणजे एखादी वस्तू स्पष्ट दिसण्यात अडथळा निर्माण होतो.
या व्यतिरिक्त तारुण्यात शरीराची वेगाने वाढ होणे आणि संप्रेरकांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. तारुण्य म्हजे आपले शरीर प्रौढ शरीरात रुपांतरीत होण्याची प्रक्रिया. त्यामुळे या काळात होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायला हवे. जर हे बदल जाणवले तर आई, आजी, बहीण अशा जवळच्या व्यक्तींना ते सांगणे गरजेचे आहे. तसेच काही गोष्टी विचित्र किंवा वेगळ्या वाटत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

तारुण्य आणि भावना

आपल्या शरीरातील संप्रेरकांमुळे होणारा बदल म्हणजे तारुण्य. तारुण्यातील हे संप्रेरक बदल तुमच्यातील शारीरिक बदलांबरोबरच भावनिक उतारचढावांचा अनुभव देऊ शकतात. या काळात तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक खंबीर, तीव्र होऊ शकतात. या काळात मूड स्विंगचा अनुभवदेखील बरेचदा येतो. हे बदल सगळ्याच मुलींमध्ये सारखे नसतात. ते प्रामुख्याने आपल्या सभोवतालच्या व्यक्ती, वातावरण यांना आपण कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून असतात. तुमच्यात होणारे भावनिक बदल हे कायम नकारात्मक किंवा तुम्हाला अस्वस्थ करणारे असतात असे नाही. तारुण्य असा काळ आहे जिथे तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या आवडीनिवडींबद्दल, तुमच्या ध्येयांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच इतर लोकांशी अधिक समजदारीने आणि परिपक्वतेने बोलण्याचा प्रयत्न या काळात केला जातो. या काळात तुम्ही आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे. कारण, यामुळे ताणतणावातून आराम मिळतो व आपल्याला मिळणारी अतिरिक्त उर्जा मुक्त करण्यात मदत होते. लिहिणे, संगीत, कला किंवा अगदी मित्रपरिवाराशी चर्चा करणे यातून तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येतात. तसेच स्वतःबद्दल सकारात्मक विचार करण्याची संधी यातून मिळते.
तारुण्याचा काळ कधीकधी गोंधळात टाकणारा असू शकतो. वयात येताना तुम्हाला कधीकधी दुःखी वाटू शकते तर कधीकधी तुमची चिडचिड होऊ शकते. तर कधीकधी तुमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. आपण मोठे होत आहोत याची ही विशिष्ट लक्षणे आहेत. सर्व मुली या अस्वस्थेतून जात असतात. लक्षात ठेवा की, आपण एकट्याने या परिस्थितीचा सामना करण्याची गरज नाही. याबद्दल काही शंका वाटत असेल किंवा काही त्रास होत असेल तर अशावेळी तुमची आई, जवळची मैत्रीण, मोठी बहीण यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. तसेच स्रीरोग तज्ज्ञांशीदेखील संवाद साधता येऊ शकतो. डॉक्टर तुम्हाला भावनिकदृष्ट्या सामोरे जाण्यासाठी आणि सर्व आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत मोकळेपणा वाटतो आहे त्या व्यक्तीसोबत तुम्ही चर्चा करू शकता.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय