डॉ. वर्षाली माळी, एमबीबीएस, डीएनबी - प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.

प्रश्न आहे का?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभव प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांना विचारा आणि त्वरित उत्तर मिळवा.
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यांना संदेश पाठवा - डॉ. वर्षाली माळी
मासिक पाळी म्हणजे काय? तुमच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल जाणून घ्यायच्या गोष्टी.

मासिक पाळी म्हणजे काय

आणि त्याला कसे सामोरे जावे..

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर

एमबीबीएस, डीएनबी (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र)

डिप्लोमा इन स्त्रीरोग एन्डोस्कोपी - जर्मनी

मासिक पाळी म्हणजे काय? तुमच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल जाणून घ्यायच्या गोष्टी.
बालपण संपवून प्रौढ होताना आपल्या शरीरात विविध बदल होत असतात. या बदलांपैकी महत्त्वपूर्ण आणि प्रारंभिक बदल म्हणजे मासिक पाळी येणे. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर बहुतांश मुली घाबरतात. यामागचे कारण असे की, त्यांना या विषयाची पूर्णपणे कल्पना नसते. मासिक पाळी हे तारुण्यात प्रवेश करण्याचे लक्षण असून ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यामुळे मुलींनी अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्या घरातील व्यक्तींसोबत मोकळेपणाने बोलायला हवे. शरीरात होणाऱ्या या बदलामुळे बरेचसे प्रश्नही मनात येऊ शकतात. मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते? त्यामुळे काही त्रास होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक मुलीला असते. या लेखात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुम्ही अनुभव असलेली सर्व परिस्थिती, त्याची कारणे आणि तिच्याशी सामना कसा करावा याची माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. यामध्ये मासिक पाळीवेळी होत असलेला शारीरिक बदल कसा हाताळावा याचे मार्गदर्शन केले आहे.

यौवनावस्था म्हणजे काय?

मासिक पाळी म्हणजे काय याबद्दल तपशीलवार माहिती घेण्यापूर्वी यौवनावस्था म्हणजे काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. यौवन म्हणजे तारुण्यात प्रवेश करणे. अगदी साध्या सोप्या भाषेत याला वयात येणे असेही म्हणतात. या अवस्थेत आतापर्यंत बालिकेचे असलेले आपले शरीर प्रौढ स्त्री किंवा तरुणीच्या शरीरात बदलण्यास सुरुवात होऊ लागते. यौवन ही शारीरिक बदलांची प्रक्रिया असून मुलीचे शरीर प्रौढ व परिपक्व होऊ लागते. या काळात आपल्या शरीरात बरेच बदल होतात आणि जीवनातील इतर कोणत्याही टप्प्यापेक्षा या काळात शरीरात वेगवान बदल घडू लागतात.
यौवनावस्थेसाठी पौगंडावस्था, किशोरवयीन किंवा वयात येणे हे शब्ददेखील वापरले जातात. यौवनात प्रवेश एकाचवेळी होत नाही. ही एक सातत्याने होणारी प्रक्रिया असून काही वर्षे आपले शरीर विकसित होत असते. या अवस्थेबाबत प्रत्येक मुलगा व मुलगी यांचा अनुभव थोडा वेगळा असू शकतो. परंतु, प्रत्येक मुलगा आणि मुलगी या अनुभवांमधून जातो हे नक्की. सरासरी मुली वयाच्या १०-११ व्या वर्षी यौवनात प्रवेश करतात आणि १५-१७ व्या वर्षी त्यांची यौवनावस्था पूर्ण होते. मुले सामान्यतः वयाच्या ११-१२ व्या वर्षी यौवनात प्रवेश करतात आणि १६-१७ व्या वर्षी त्यांची यौवनावस्था पूर्ण होते. काही मुले-मुली यौवनावस्थेत थोडा लवकर प्रवेश करतात तर काही उशीरा प्रवेश करतात. मात्र, अशा परिस्थितीत चिंता करण्याची गरज नाही ही सामान्य स्थिती असून ती शांतपणे हाताळायला हवी.
शरीरातील संप्रेरक (हार्मोन) मुलींमध्ये अंडाशय आणि मुलांमध्ये वृषण यांना जननग्रंथी तयार करण्याचे संकेत देतात आणि यौवनावस्थेला सुरुवात होते. या काळात शरीर थोडे विचित्र पद्धतीने कार्य करते. या काळात संप्रेरकांमधील बदलांमुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. तसेच नेहमीच्या तुलनेत घाम येण्याचे प्रमाणही वाढते. तसेच या काळात काख आणि जांघेच्या भागात केस येण्यास सुरुवात होते. या काळात मुलांचा आवाज फुटू लागतो तर मुलींचे स्तन विकसित व्हायला सुरुवात होते. नितंब (हिप्स) विस्तृत होतात. ही सर्व तारुण्यात पदार्पण केल्याची चिन्हे असतात. प्रत्येक मुलगा आणि मुलीच्या जीवनात हा टप्पा येतो. म्हणून, या काळात भीती न बाळगता या सर्व गोष्टींचे अर्थ समजून घेऊन त्याला सामोरे जा.

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळीला सुरुवात होणे हा प्रत्येक मुलीमधील महत्त्वपूर्ण बदल आहे. मासिक पाळीदरम्यान मुलीच्या गर्भाशयातून रक्तस्राव होत असतो. आपल्या शरीराला आवश्यक नसलेल्या उती (टिश्यु) या काळात बाहेर सोडल्या जातात. आपण शारीरिकदृष्ट्या परिपक्व होण्याचा एक भाग म्हणून या उती आणि काही प्रमाणात रक्त शरीराबाहेर सोडले जाते.

मुलींना मासिक पाळी कधी सुरू होते?

यौवनावस्थेत मुलींना पाळी येऊ लागते. हे चक्र साधारणपणे वयाच्या १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान सुरू होते. बहुतेक वेळा मुलींना स्तनांचा विकास सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मासिक पाळी येणे सुरू होते. तसेच मासिक पाळी सुरू होण्याचे आणखी एक चिह्न म्हणजे अंतर्वस्रांवर आपण पाहू शकू किंवा जाणवू शकू असा द्रव पदार्थाचा स्राव. हा स्राव पहिली पाळी येण्यापूर्वी सुमारे सहा महिने ते एक वर्ष आधी सुरू होतो. काखेत आणि जांघेत केस येण्यास सुरुवात होणे हे मासिक पाळी सुरू होण्याचे संकेत असतात.
प्रत्येक मुलीचे शरीर वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या वयात मासिक पाळी येऊ शकते. साधारणतः १० ते १५ वर्षे वयात बहुतांश मुलींना पाळी येते. पाळी उशीरा सुरू होण्यामागे चिंतेचे कारण नसते. साधारणपणे वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत मुलीची पाळी सुरू न झाल्यास स्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच स्तनाचा विकास, काख आणि जांघेतील केस विकसित होण्यास उशीर झाला असेल किंवा विकसित झाले नसतील तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शरीराचा विकास होत नसेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.

मुलींना पाळी का येते?

मासिक पाळी चक्रावर तुमची पाळी येणे अवलंबून असते. त्यामुळे हे चक्र समजावून घेणे गरजेचे आहे. बाळाला जन्म देणे हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळाच्या संरक्षणासाठी शरीरात अनेक स्तर विकसित होत असतात. गरोदर राहण्यासाठी मासिक पाळी दर महिन्याला स्रीच्या शरीराला तयार करीत असते. साधारणपणे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असून त्यात तीन टप्पे असतात.
मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह

पहिला टप्पा : हा असा टप्पा आहे जेथे रक्तस्राव होतो. साधारणतः हा कालावधी पाच ते सात दिवस असतो. या कालावधीत एंडोमेट्रिअल अस्तराची शेडिंग (बाळाचे संरक्षण करणाचे कवच) तयार केली जाते.

मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह

दुसरा टप्पा : हा तो काळ आहे ज्या दरम्यान संरक्षणात्मक गर्भाशय अस्तर तयार होते. ते साधारण सात दिवस टिकते.

मासिक पाळी - गर्भाशयाचे चिन्ह

तिसरा टप्पा : या काळात आपले गर्भाशय गर्भधारणा होण्याची प्रतीक्षा करते. जर गर्भधारणा झाली नाही तर संरक्षक अस्तर कमी होऊ लागते. शेवटी त्याचे शेडिंग होऊ लागते जेव्हा मासिक पाळीचे नवीन चक्र तयार होते.

तर थोडक्यात सांगायचे झाले तर, आपले शरीर दर महिन्याला गर्भधारणेची तयारी करते. आपल्या गर्भाशयाचे अस्तर बाळाच्या पालनपोषणाची आणि संरक्षणाची तयारी करण्यासाठी जाड होते. जेव्हा मासिक पाळी चक्रादरम्यान गर्भधारणा होत नाही तेव्हा आपल्या शरीराद्वारे तयार केलेले संरक्षक अस्तर दर महिन्याला मोकळे होते यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. ही प्रक्रिया नवीन संरक्षणात्मक अस्तरासाठी मार्ग बनवते आणि आपण गर्भवती झाल्यास आपल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी तयार राहते. आयुष्यात ठराविक वेळी गर्भधारणा होऊ शकते. परंतु, आपल्या शरीराला हे माहीत नसते. त्यामुळे यासाठी शरीर दर महिन्याला तुम्हाला तयार करते. दर महिन्याला तुम्ही ज्या त्रासातून जाता तोच त्रास तुम्हाला ‘आई’ होण्याचा अंतिम आनंद देत असतो.

मासिक पाळीची वारंवारता आणि कालावधी

आतापर्यंत तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय? याची थोडीफार माहिती मिळाली आहे. मात्र, मासिक पाळी कधी येते?, तिचा कालावधी किती असतो? याविषयी आपण समजावून घेऊया. मासिक पाळीचे सामान्य चक्र २८ दिवसांचे असते. त्यामुळे साधारणपणे चार ते पाच आठवड्यांनंतर म्हणजेच २८ दिवसांनंतर मासिक पाळी येते. मासिक पाळीचा कालावधी पाच ते सात दिवसांचा असतो.
वयाच्या ४५ ते ५५ या वयोगटात आल्यानंतर तुम्ही रजोनिवृत्तीच्या अवस्थेत म्हणजेच पाळी बंद होण्याच्या अवस्थेत पोहोचता. या काळात तुमची मासिक पाळी येणे बंद होते. रजोनिवृत्तीदेखील बऱ्याच कारणांवर अवलंबून असते. त्यामुळे रजोनिवृत्तीचे वयदेखील बदलू शकते. गर्भवती असताना आणि बाळाच्या जन्मानंतर काही महिने तुम्हाला मासिक पाळी येत नाही. तसेच काही गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केल्याने मासिक पाळी येण्याचे प्रमाण सुमारे २० ते ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

नियमित आणि अनियमित मासिक पाळी

मासिक पाळी साधारणपणे दर २८ दिवसांनी येते. त्यानंतर सलग ५ ते ७ दिवस रक्तस्राव होऊ शकतो. शेवटच्या एक-दोन दिवसांत हा रक्तस्राव कमी होऊ लागतो. एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही वर्षे ती नियमितपणे येत नाही. पाळीतील ही अनियमितता सुरुवातीचे काही दिवस मान्य करण्याजोगी असते. साधारण दोन ते तीन वर्षांनी मासिक पाळी सामान्य होऊन साधारण २८ दिवसांच्या अंतराने येते.
काही वेळा तुम्हाला असामान्य मासिक पाळीचा अनुभव येऊ शकतो. अशावेळी खालील लक्षणांचा अभ्यास करा.
मासिक पाळी चक्राचा कालावधी २१ दिवसांपेक्षा कमी किंवा ३५ दिवसांपेक्षा जास्त असणे.
सलग तीनवेळा किंवा त्याहून अधिकवेळा मासिक पाळी न येणे.
मासिक पाळी रक्तस्राव अधिक प्रमाणात किंवा अगदीच कमी प्रमाणात होणे.
सात दिवसांपेक्षा अधिक असणारा मासिक पाळीचा कालावधी.
मासिक पाळी कालावधीत उलट्या, मळमळ, पोटात कळ, वेदना यांचा त्रास होणे.
मासिक पाळी कालावधी संपल्यानंतरही रक्तस्राव किंवा हलका स्राव होणे.
मासिक पाळी अनियमित असण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये सतत काही औषधांचे सेवन, प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करणे, शरीराचे वजन खूप कमी किंवा खूप जास्त असणे, पुरेशा प्रमाणात कॅलरीज न खाणे ही कारणे असू शकतात. संप्रेरक असंतुलनदेखील अनियमित पाळीसाठी कारणीभूत ठरू शकतात. उदाहरणार्थ, थॉयरॉईड ग्रंथींची पातळी खूप कमी किंवा जास्त असल्यास त्याचा परिणाम मासिक पाळीवर होऊ शकतो. काही मुलींमध्ये अतिरिक्त एंड्रोजन संप्रेरक असतात. ज्यामुळे चेहरा, हनुवटी, छाती आणि ओटीपोटावर केसांची वाढ होऊ शकते. तसेच शरीरात जास्त प्रमाणात एंड्रोजन असल्यास मुलींचे वजन वाढू शकते आणि पाळी अनियमित होऊ शकते.
पाळी अनियमित असणे ही फारशी चिंतेची बाब नाही. मात्र, सर्व काही सामान्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी स्री रोग तज्ज्ञांची भेट अवश्य घ्या. याआधी सांगितल्याप्रमाणे, अनियमित पाळी येणे सुरुवातीच्या काळात अतिशय सामान्य बाब आहे. तुमचे वय जसजसे वाढत जाते तसतशी पाळी नियमित होत जाते.

मासिक पाळीच्या काळात मी काय करावे?

सर्वप्रथम मासिक पाळी म्हणजे काय हे समजावून घ्या आणि त्याच्या लक्षणांबाबत जागरुक व्हा. पाळी सुरू झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवतात. तसेच काहीवेळा त्रासदेखील होतो. विशेषतः जेव्हा मासिक पाळी येण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते तेव्हाचे ५ ते ७ दिवस त्रासदायक वाटू शकतात. या दिवसांत स्वतःची काळजी घेऊन हा कालावधी आरामदायी केला जाऊ शकतो. खालील काही गोष्टी यामध्ये करता येतात.
पुरेशा सॅनिटरी पॅडचा साठा असू द्या. तसेच प्रवास करणार असल्यास किंवा बाहेर जात असल्यास काही सॅनिटरी पॅड पिशवीत असू द्या.
एखादी कॅरीबॅग किंवा कागदी बॅग सोबत असू द्या. जेणेकरून वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे सोपे होईल.
जर तुम्हाला काही वेदना होत असतील तर गरम पाण्याची पिशवी वापरा किंवा गरम पाण्याने अंघोळ करा.
सकस आहाराचे सेवन करा. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा. मासे, चिकन, अंडी यांसारख्या प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.
कॅफिनचे सेवन करणे टाळा. कॅफिनमुळे पोटात त्रास जाणवू शकतो. या ऐवजी एक कप आल्याचा चहा किंवा ग्रीन टीचे सेवन करा.
मासिक पाळी काळात भरपूर विश्रांती घ्या. या काळात थकवा अधिक प्रमाणात जावणू शकतो. चांगली विश्रांती घेतल्यास शरीर आणि मनाला तजेला मिळतो. रात्रीची झोप कमीत कमी आठ तासांची असू द्या. विशेषतः मासिक पाळी काळात झोप आणि आराम याकडे लक्ष द्या.
कधीकधी अंथरुणावरून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. परंतु, अशावेळी घराबाहेर पडा आणि ताज्या हवेत फिरा. यामुळे मनाला तजेला मिळण्यासाठी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच्या व्यक्तीसोबत मोकळा संवाद साधा. मासिक पाळीदरम्यान होणार त्रास, या काळात येणारे अनुभव आपल्या आईला सांगा. तसेच एखाद्या जवळच्या मैत्रिणीशी याविषयी गप्पा करा. आपण या गोष्टीचा सामना करण्यासाठी सक्षम असतो. परंतु, कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त केल्याने आपल्याला फायदा होतो. तसेच मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीबद्दल कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याला होणारा त्रास हा सामान्य असून यात लपवण्यासारखे काहीच नसते. प्रत्येक मुलीला वेगवेगळा त्रास जाणवतो इतकेच.

पीएमएस म्हणजे काय आणि त्याचा सामना कसा करावा?

‘प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम’, ज्याला पीएमएसदेखील म्हटले जाते, हे मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळीच्या कालावधीत होणारे भावनिक आणि शारीरिक बदल आहेत. पीएमएस हीदेखील साधारण बाब आहे. सुमारे ९० टक्के मुलींना पीएमएस त्रास जाणवतो. काही मुलींना पीएमएसची कोणतीही चिन्हे जाणवत नाही किंवा अत्यंत सौम्य लक्षणे जाणवतात. काहींसाठी पीएमएस लक्षणे इतकी तीव्र असतात की, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागतो.
शारीरिक पीएमएस लक्षणांमध्ये स्तन सूजतात किंवा कोमल होतात. पोट साफ न होणे, पोटात कळ येणे, डोकेदुखी, पाठदुखी, जास्त आवाज किंवा प्रकाश सहन न होणे हा त्रास जाणवू शकतो. तर भावनिक लक्षणांमध्ये चिडचिडेपणा, विचित्र वागणे, थकवा जाणवणे, जास्त किंवा खूप कमी झोप येणे, भूक लागणे, एकाग्रता तुटणे, नैराश्य जाणवणे किंवा दुःखी वाटणे, मूड स्विंग्ज होणे या गोष्टी जाणवतात. पीएमएसचा त्रास होणे ही साधारण गोष्ट आहे. परंतु, जर जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास पुढील गोष्टी तो त्रास कमी करण्यास मदत करतात.
मासिक पाळी येण्यापूर्वी जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास आपल्या स्रीरोग तज्ज्ञांची भेट घ्या. तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी त्या काही औषधे देतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका.
हलक्या स्वरुपाचा व्यायाम करा. जलद चालणे, पोहणे यांसारख्या हृदयाची गती वाढवणाऱ्या गोष्टी करा.
योगासने, प्राणायम, ध्यान यांसारख्या गोष्टी करा.
भरपूर विश्रांती घ्या आणि कमीतकमी आठ तासांची झोप घ्या.
जीवनसत्त्वे, कॅल्शिअमयुक्त आहाराचे सेवन करा. फळे, भाज्या भरपूर प्रमाणात खा. चरबी, मीठ, साखर आणि कॅफिन यांसारख्या घटकांचे प्रमाण कमी करा.
पीएमएसचे नेमके कारण माहीत नसले तरी, हे मासिक पाळीदरम्यान शरीरात होणाऱ्या संप्रेरकांतील बदलांमुळे होते. पीएमएसची चाचणी करण्याची कोणतीही निश्चित पद्धती नाही. तरीही मासिक पाळी म्हणजे काय? पीएमएस म्हणजे काय? त्यांची लक्षणे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी संवाद साधा. गरज पडल्यास ते तुम्हाला औषधोपचार आणि या कालावधीत घ्यायची काळजी याविषयी सल्ला देतील.

पेटके (क्रॅम्प) म्हणजे काय आणि त्याच्याशी सामना कसा करावा?

मासिक पाळीदरम्यान ओटीपोट, कंबर, मांडी येथे वेदना जाणवत असल्यास ही मासिक पाळीतील पेटक्यांची लक्षणे असू शकतात. पेटके येणे सामान्य बाब असून मासिक पाळीच्या साधारण दोन दिवस आधी त्यांचा त्रास सुरू होतो. तसेच मासिक पाळीदरम्यान हा त्रास अधिक जाणवतो. स्नायूच्या आकुंचनामुळे गर्भाशयात पेटके येतात. गर्भाशय आकुंचन पावल्यामुळे अस्तर फाटते आणि पेटके येण्यास सुरुवात होते.
पेटके येणे हे सामान्य लक्षण असून ते काहींसाठी खूप वेदनादायी ठरतात तर काहींसाठी कमी त्रासदायक असतात. जर तुम्हाला सामान्य लक्षणे जाणवत असतील तर, खालील घरगुती उपायांचा वापर करता येऊ शकतो.
आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करा. ते तुम्हाला वेदना कमी करणारी औषधे देतील. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
ओटीपोट आणि कंबर यांना गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या.
गरम पाण्याने अंघोळ करा.
ओटीपोट आणि कंबरेच्या खाली गरम पाण्याची बाटली ठेवा.
पोटावर हलकी मालिश करा.
पुरेसा आराम घ्या.
अक्युप्रेशर किंवा अक्युपंक्चर यांचा आधार घ्या.
हलका व्यायाम, योगासने, चालणे, पोहणे या गोष्टी करा. जेणेकरून रक्ताभिसरण क्रिया उत्तम राहील.
मासिक पाळीदरम्यान पेटके येणे विशिष्ट लक्षण आहे. जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या या वेदना सहन करू शकत नसाल, घरगुती उपायांचा फायदा होत नसेल तर आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांची भेट घ्या. वेदना कमी करण्याबरोबरच तुम्हाला काही वेगळा त्रास होतो आहे का हे जाणून घेण्यासाठी मदत होईल.

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

मासिक पाळी म्हणजे काय? हे जाणून घेण्याबरोबरच, आपण कोणत्या सामान्य लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे याची माहिती असणेदेखील गरजेचे आहे. पाळी येणे ही प्रत्येक मुलीसाठी सामान्य गोष्ट आहे. परंतु, काही अशा समस्या आहेत ज्याकडे आपण लक्ष द्यायला हवे आणि स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
तुम्ही १५ वर्षांच्या आहात आणि तुम्हाला अजून मासिक पाळी सुरू झाली नसेल तर डॉक्टरांची भेट घ्या. साधारणपणे वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत मासिक पाळी सुरू होते.
तुमची मासिक पाळी सुरू झाली आहे मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ ती अनियमित आहे. म्हणजे २८ दिवसांच्या मासिक पाळी चक्रानुसार नसेल तर अशावेळी डॉक्टरांची भेट घ्या.
मासिक पाळीदरम्यान होणार रक्तस्त्राव पाच ते सात दिवसांपर्यंत असायला हवा.
मासिक पाळीदरम्यान येणारे पेटके त्रासदायक होत असतील, या वेदना असह्य होत असतील तर अशावेळी डॉक्टरांची मदत अवश्य घ्या.
मासिक पाळीदरम्यान होणार रक्तस्राव अधिक प्रमाणात असेल, म्हणजे तुम्हाला एक ते दोन तासाला पॅड बदलावा लागत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मासिक पाळीतील रक्तस्राव पाच ते सात दिवसांपर्यंत होतो. तुम्हाला त्याहून अधिक काळ त्रास होत असेल तर डॉक्टरांची भेट घ्या.
लक्षात घ्या बहुतांश मुलींना हा त्रास होतो. या त्रासातून जाणाऱ्या तुम्ही एकट्या नाही. त्यामुळे याविषयी आपल्या जवळच्या व्यक्तीशी मोकळा संवाद साधा. आई, मोठी बहीण किंवा जवळची मैत्रीण यांच्याकडे मन मोकळे करा. जेणेकरून तुम्हाला मदत मिळणे शक्य होईल.
मासिक पाळी म्हणजे काय आणि त्याला सामोरे कसे जावे याबद्दलची तपशीलवार माहिती आपण लेखातून घेतली. मासिक पाळी संदर्भात प्रत्येक मुलीला खूप प्रश्न असतात. तुम्हालादेखील असेच काही प्रश्न असतील तर, स्रीरोग तज्ज्ञांशी निःसंकोचपणे संपर्क साधा. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर किशोरवयीन म्हणून तुम्हाला काही प्रश्न पडू शकतात त्या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे.

किशोरवयीन मुलींना पडणारे प्रश्न

प्रश्न : मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्रावाचा वास येतो का?

होय, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावाचा वास येऊ शकतो. मासिक पाळीमध्ये गर्भाशयाच्या अस्तरामध्ये उतींचा समावेश असतो. या उती आणि रक्त मिसळल्याने त्या स्रावातून थोड्या प्रमाणात वास येऊ शकतो. जर तुम्ही निरोगी असाल तर रक्ताचा फार वास येत नाही. मात्र, त्यात लोह आणि बॅक्टेरिया असल्याने त्याला धातूचा वास असू शकतो. मासिक पाळीतील रक्तस्रावाचा वास इतरांच्या लक्षात येत नाही आणि या तुम्हाला स्वच्छतेची सवय असेल तर या समस्येचा सामना तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. परंतु, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या स्रावाचा तीव्र वास येत असेल तर हे संसर्गाचे लक्षण असू शकते. अशावेळी आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

प्रश्न : मासिक पाळी दरम्यान वेदना होतात का?

मासिक पाळीदरम्यान येणारे पेटके आणि इतर दुखण्यांमुळे मुलींना त्रास होऊ शकतो. वेदनादायी मासिक पाळी म्हणजे ‘डिस्मेनोरिया’ नावाची स्थिती आहे. पाळीदरम्यान हे लक्षण जास्त नोंदवले जाते. मासिक पाळीच्या काळात शरीरातून विविध हार्मोन्स सोडले जातात. ज्यामुळे गर्भाशयाचे अस्तर आकुंचन पावते. यामुळे ही वेदना मासिक पाळीच्या काळात एक किंवा दोन दिवस रहाते.

प्रश्न : माझी मासिक पाळी सुरू झाली आहे, त्याविषयी मी कुणाशी बोलायला हवे का?

पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतरची परिस्थिती थोडी आव्हानात्मक असते. ही काहीतरी विचित्र किंवा वेगळी गोष्ट आणि याविषयी कुणाशी बोलावे अथवा नाही असा प्रश्नदेखील पडू शकतो. परंतु, हे लक्षात ठेवा की मासिक पाळी म्हणजे काय आणि त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदतीची आवश्यकता असते. हा प्रश्न प्रत्येक मुलीला पडू शकतो आणि प्रत्येकीला इतरांसोबत बोलताना अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटू शकते. या काळात आपली आई आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. ती या काळात तुमची सर्वात जवळची आणि विश्वासू मैत्रीण असते. कारण या प्रसंगातून ती आधीच गेलेली असते. त्यामुळे या विषयावर तिच्याशी बोलायला सुरुवात करा. तुमचा त्रास, तुमची मनःस्थिती आईपेक्षा अधिक कुणीच जाणून घेऊ शकणार नाही. त्यामुळे ती या काळात हवी ती मदत तुम्हाला करू शकते. याचबरोबर तुमची मावशी, मैत्रिणीची आई, मोठी बहीण अशा मोजक्याच व्यक्तींसोबत याविषयी बोलण्यासाठी तुम्ही तयार असता. त्यामुळे आईनंतर या व्यक्तींसोबतही मन मोकळे बोला. तसेच आपल्या स्रीरोग तज्ज्ञांकडून तुम्हाला या विषयाचे वैद्यकीय ज्ञानदेखील मिळू शकते. त्यामुळे तुमच्या आसपासच्या परिसरातील चांगल्या स्रीरोग तज्ज्ञांची भेट घ्या आणि आपल्या मनातील प्रश्नांना मोकळी वाट करून द्या.

प्रश्न : मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काय काळजी घ्यायला हवी?

शारीरिक स्वच्छता ही आवश्यक गोष्ट आहे. परंतु, मासिक पाळीदरम्यान याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या शरीरातून रक्तस्राव होत असतो आणि अशावेळी शरीर स्वच्छ असणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे या काळात गरम पाण्याने अंघोळ करावी. तसेच रक्तस्राव होणारी जागा वारंवार स्वच्छ करायला हवी. चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड वापरा व तेदेखील दिवसातून दोन ते तीन वेळा बदलायला हवे. कोणतेही घरगुती पॅड किंवा कपडे वापरणे टाळा.द्या.

प्रश्न : मासिक पाळीदरम्यान माझ्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होईल का?

मासिक पाळी ही पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. मासिक पाळी सुरू असल्यावरदेखील तुम्ही शाळेत जाऊ शकता. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळू शकता. तुम्ही सहसा जे काही दैनंदिन जीवन जगता आहात तसेच या काळातही जगा. मासिक पाळीदरम्यान पेटके येतात किंवा थकवा जाणवतो अशावेळी तुम्हाला काही गोष्टी सोयीस्कर वाटत नसल्यास त्यापासून ब्रेक घ्या. शरीराला आरामाची गरज असल्यास त्याला आराम द्या. जास्त दगदग करू नका.

प्रश्न : मला मासिक पाळी येते हे कुणाच्या लक्षात येईल का?

नाही. तुम्हाला मासिक पाळी येते हे कुणाच्याही लक्षात येणार नाही. जोपर्यंत तुम्ही याविषयी कुणासोबत बोलत नाही तोपर्यंत त्यांना याविषयी कळणार नाही. मात्र, माझ्या मते तुम्ही तुमच्या आईला याबाबत माहिती द्या. जेव्हा केव्हा तुमची मासिक पाळी येत असेल तेव्हा आईला त्याविषयी सांगा. म्हणजे तुम्हाला काही मदत लागल्यास ती तुमच्यासाठी उपलब्ध राहील.
मासिक पाळी म्हणजे काय? त्याला कसे सामोरे जावे? याविषयीच्या काही गोष्टी आपण या लेखात जाणून घेतल्या. मला माहीत आहे की, हा काळ किंवा स्थिती तुमच्यासाठी कठीण असते. परंतु, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. आपल्याला कधी ना कधी पाळी सुरू होणार आहे आणि हा आपल्या जीवनाचा नियमित भाग आहे यासाठी तयार व्हा. मासिक पाळी म्हणजे आपले शरीर ‘आई’ या जगातील सर्वोत्तम देणगीसाठी तयार होते म्हणून ती सकारात्मकपणे घ्या. याविषयी आपली आई, मोठी बहीण, जवळची मैत्रीण यांच्याशी मोकळा संवाद साधा. तसेच काही त्रास होत असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांकडून वैद्यकीय मदत व मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. खंबीर आणि निरोगी जीवन जगा. स्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे मासिक पाळीसंदर्भात काही प्रश्न किंवा शंका असल्यास माझ्याशीदेखील संपर्क साधू शकता. तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.
या लेखाची प्रत डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.

सदस्य व्हा

आणि डॉ. वर्षाली माळी यांच्याकडून आरोग्यविषयक सूचना मिळवा.

तुमची सदस्यता जतन केली जाऊ शकली नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.
तुम्ही डॉ. वर्षालीच्या स्त्रीरोग चिकित्सालयाच्या आरोग्य अपडेट्सचे यशस्वीपणे सदस्यत्व घेतले आहे.

लेखक

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

डॉ. वर्षाली माळी या प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्रात प्रवीण असून या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर डीएनबी (प्रसुतिशास्त्र व स्त्रीरोग शास्त्र) यामध्ये जिहांगीर हॉस्पिटल पुणे येथून पद्व्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच युनिवर्सिटी ऑफ श्लेस्विग होलस्टाइन, जर्मनी येथून गायनेकॉलॉजीकल एन्डोस्कोपी या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांना अनेक वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच या विषयात त्या व्याख्याता म्हणूनदेखील मार्गदर्शन करतात. पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमध्ये त्यांचे चिकित्सालय असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील स्त्रियांना त्या वैद्यकीय सेवा देतात. हसतमुख आणि आश्वासक स्वभाव, प्रसुती आणि स्त्रीरोगांविषयी सखोल ज्ञान यामुळे स्त्रियांना त्यांचे मार्गदर्शन फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वर्षाली या दोन मुलींच्या आई असून मातृत्व ही सर्वांगसुंदर भेट असल्याचे त्या मानतात. आपले ज्ञान आणि शिक्षणाचा स्त्रियांना फायदा व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

प्रश्न?

प्रसूती, स्त्रीरोगविषयक समस्या, आरोग्य किंवा निरोगीपणाबद्दल प्रश्न आहे? अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती डॉक्टरांना विचारा आणि उत्तरे मिळवा.

अपॉइंटमेंट

डॉ. वर्षाली माळी या अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आहेत. तिच्यासोबत भेटीची वेळ बुक करा आणि सर्वोत्तम सल्ला, काळजी आणि उपाय मिळवा.
भाषा बदला. - डॉ. वर्षालीचे स्त्रीरोग चिकित्सालय